मुक्ता जोशी – शास्त्रीय नृत्यांगना

एका वेळी अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण करावे लागते. अशा वेळी माझी कला हीच माझ्या ताणमुक्तीचे एक साधन आहे. कलेवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना ताण येणे विरळच असते. मात्र रंगमंचावर आपली कला सादर करताना थोडेसे दडपण असते. अशा वेळी नृत्याच्या तालामध्ये मी स्वत:ला तल्लीन करते. मीरा जसे कृष्णाच्या नावामध्ये तल्लीन होऊन आपला नामजप करते, तसेच कलेचे आहे. जेव्हा मी तल्लीन होऊन कलेचे सादरीकरण करते त्या वेळी नृत्यकलाच मला आलेल्या ताणातून मुक्त करते. आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टीदेखील बऱ्याच वेळा मनाला अस्वस्थता आणतात. त्या वेळी माझ्या गुरू पद्मश्री रोशन कुमारीजी यांच्या नृत्याचे छायाचित्रीकरण बघणे मला खूप आवडते. मन प्रसन्न राहते. ताण घेणे हा तर जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. माझ्याकडे नृत्य शिकायला येणाऱ्या विद्यार्थिनींनादेखील ताण घेऊन नृत्य शिकायला येऊ नका तर ताण हलका करण्यासाठी नृत्य शिका असा संदेश मी देते. कित्येक वेळा मनात अनेक गोष्टी येत असतात. मात्र प्रत्येक वेळी व्यक्त होणे काही कारणास्तव शक्य होत नाही. ते भाव मनात साचून राहतात. त्यामुळे अशा बाहेर न पडणाऱ्या भावनांचा मनावर ताण येतो. नृत्य, संगीत ही एक साधना आहे. ती साधना करताना गाण्याचे आणि नृत्याचे भाव समजून घेणे महत्त्वाचे असते. त्यामुळे त्या त्या प्रसंगानुसार ते भाव व्यक्त होत राहतात.  त्यामुळे रंगमंच हेच माझ्या आनंदमय जगण्याचे मुख्य कारण आहे. मी मला आलेला भावनांचा ताण त्याद्वारे कमी करते. युनेस्कोतर्फे मी अनेक कार्यक्रम करते, चीन, कोरिया येथे जाण्यासाठी जी तयारी करावी लागते तेव्हा मनावर दडपण असतं. त्या वेळी घरात अर्धा तास तरी नृत्याचा रियाज करण्यासाठी मी हमखास वेळ देते. नृत्याबाबत माहिती असणारी जगभरातील पुस्तके वाचते. या पुस्तकातून नृत्यासंदर्भात जाणून घेण्याची उत्सुकता अधिक प्रबळ होते. नृत्य केल्याने आपोआपच शरीरस्वास्थ्यावरही लक्ष दिले जाते.त्यामुळे शरीर लवचीक होते. ताणमुक्तीसाठी घरात मंद आवाजातील संगीताचे सूरदेखील मी ऐकते. ज्या क्षेत्रामध्ये जाऊन आपल्याला ताण येणार नाही असे क्षेत्र निवडावे जेणेकरून त्या क्षेत्राचा वापर ताण हलका करण्यासाठी करता येईल अशाच क्षेत्राची मी निवड केली आहे. रंगमंचावर जाताना थोडासा ताण येणे ही रंगमंचाची पूजा आहे. मात्र अतिरिक्त ताणाने एकही काम नीट होत नाही. त्यामुळे गरजेपुरतीच ताण बाळगणे गरजेचे आहे हे सूत्र मी लक्षात घेऊनच काम करत असते.