मानसी जोशी

अनेक वर्षांपासून ऑफिसमध्ये काम करणारे तरुण व्यावसायिक आणि नवीन स्टार्टअप्स आता कॅफे आणि रेस्तराँ येथे काम करत आहेत. महिन्याला भरावे लागणारे भरमसाट भाडे वगळून आता ‘को वर्किंग स्पेस’मध्ये काम करण्याची संकल्पना तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे. खिशाला परवडणारे दर, चोवीस तास इंटरनेटची सुविधा यामुळे अनेक तरुणांनी कार्यालये कॅफे आणि रेस्तराँमध्ये थाटली आहेत. ऑफिसमध्ये ९ ते ५ वेळेत काम करण्याची प्रथा बदलताना दिसत आहे. याच तरुणांच्या बदलत्या मानसिकतेविषयी अधिक जाणून घेऊ या.

गेल्या काही वर्षांपासून दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्याऐवजी स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याकडे तरुणांचा कल दिसून येत आहे. जागेच्या वाढत्या किमती आणि दर महिन्याकाठी द्यावे लागणारे भरमसाट भाडे प्रत्येक व्यावसायिकाला परवडत नाही. त्यामुळे ऑफिसमध्ये आठ तास नोकरी करण्याच्या प्रथेला फाटा देत काहीजणांनी कॅफे आणि रेस्तराँमध्येच आपले कार्यालय थाटले आहे. चोवीस तास इंटरनेटची सुविधा, आरामदायी वातावरण, लगेच मिळणारे जेवण अथवा कॉफी या गोष्टींमुळे कॅफे आणि रेस्तराँमधील कार्यालये लोकप्रिय ठरत आहेत.

स्टार्टअपसाठी तर ही संकल्पना वरदानच ठरली आहे कारण, नवीन व्यवसाय असल्याने स्टार्टअपचे भांडवल तुलनेने कमी असते. शहरातील जागेच्या किमती सध्या गगनाला भिडल्याने महिन्याचे अवाच्या सव्वा भाडे परवडत नाही. अशा वेळी हे स्टार्टअप्स एखादी कोवर्किंग जागा भाडय़ाने घेतात. कामाची सर्व सूत्रे तेथूनच हलवली जातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, यात वीज-पाणी, जागेची देखभाल करणे या गोष्टींवरील खर्च वाचतो.

सुमील पुनामिया यांची ‘ब्रँड हडल’ नावाची कंपनी असून  आस्थापनांना बाजारात आपली ओळख निर्माण करणे, जाहिरातींचे कॅम्पेन बनवणे यासाठी मार्गदर्शन करते. ‘मी अनेक आठवडय़ांपासून ‘प्रायमस को वर्क’मधील अनेक कॅफे आणि रेस्तराँमध्ये काम केले आहे. या ठिकाणचे वातावरण काम करण्यासाठी पोषक आहे. एक व्यावसायिक म्हणून कामासंदर्भात सहकाऱ्यांसोबत मीटिंग घेणे आणि ग्राहकांना मार्गदर्शन करणे ही कामे करू शकतो’, असे सुमील यांनी सांगितले.

कोवर्किंग स्पेस काम करण्याचा फायदा खाजगी कंपनीलाही होतो. उदाहरणार्थ – काही कंपनीचे कार्यालय बँगलोर, दिल्ली, नोएडा आणि मुंबई अशा शहरांत असल्यास त्यांचे काम इतर ठिकाणाहूनही चालत असल्यास प्रत्येक वेळेस जागा घेणे शक्य होईलच असे नाही. अशा वेळी ही कार्यालये कोवर्किंगची जागा भाडय़ाने घेऊ न काम करतात. यात त्यांना एक जागा अथवा काम करण्यासाठी टेबल देण्यात येतो.

को वर्किंग संकल्पना काय?

को वर्किंग संकल्पनेत व्यावसायिकांना जागा दिली जाते. अशा प्रकारच्या सेवा देणाऱ्या कंपन्यांचे शहरातील लोकप्रिय कॅफे आणि रेस्तराँ यांच्याशी करार असतात. ‘वि वर्क’ आणि ‘प्रायमस को वर्क’ या कंपनी कोवर्किंग स्पेसची  सुविधा ग्राहकांना देत आहेत. यात ग्राहकांच्या गरजेनुसार त्यांना एक केबिन, टेबल उपलब्ध करून दिले जाते. यासाठी दर महिन्याला ग्राहकांकडून विशिष्ट शुल्क आकारले जाते. सध्या दादर, बीकेसी, अंधेरी मरोळ नाका, नरिमन पॉइंट या ठिकाणी असलेल्या कॅफे अथवा रेस्तराँमध्ये कोवर्किंगची सुविधा उपलब्ध आहे.

कॅफे आणि रेस्तराँचा वापर

मी एक फिटनेस कोच आहे. फिटनेस टॉक विथ प्रणीत या नावाने समाजमाध्यमांवर मी आहार आणि आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन करतो. अनेक कलाकारांचाही त्यात समावेश आहे.  ग्राहकांना भेटण्यासाठी या वा बैठक घेण्यासाठी मी कॅफे आणि रेस्तराँची निवड करतो. ग्राहकांच्या सोयीनुसार त्यांच्या आरोग्य, त्यांचे आजार त्यावर केले जाणारे उपाय यावर मार्गदर्शन करण्यात येते.

– प्रणीत शिळीमकर, फिटनेस कोच

कमी दरात दर्जेदार सुविधा

मी एक वर्षांपासून पवई येथील ‘वि वर्क’च्या जागेत काम करत आहे. लोकांना आर्थिक व्यवस्थापन कसे करायचे याबाबत मी मार्गदर्शन करते.  अत्यंत कमी दरात दर्जेदार सुविधा देत असल्याने मी मला कोवर्किंग संकल्पना आवडते. येथे सहकाऱ्यांचीही काळजी घेतली जाते. उत्पादकता वाढवण्यास मदत होते.

– उमा देसाई, आर्थिक सल्लागार

नवीन लेखांचे विषय सुचतात

मी बोरिवलीला राहत असल्याने काही कामांमुळे कार्यालयात जाणे शक्य होत नाही. तेव्हा मी कॅफे आणि रेस्तराँमध्ये जाऊन काम करण्यास प्राधान्य देतो. तेथील वातावरणामुळे कामही होते. त्यामुळे कोवर्किंग स्पेसमध्ये काम करण्यास प्राधान्य देतो. तेथे अनेक सोयीसुविधा असल्याने हसतखेळत काम करता येते. एखाद्या वेळेस मला काही कारणानिमित्त ऑफिसमध्ये जाण्यास जमले नाही तर घराच्या जवळ असलेल्या कोवर्किंग स्पेसचा उपयोग करतो. मी पत्रकार असल्याने रोज नवीन विषयावर लिहावे लागते. अशा वेळेस कोवर्किंग स्पेसमध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित लोक काम करत असल्याने त्यांच्याशी बोलून विषय सुचू शकतात. आणि प्रयोगशीलताही वाढीस लागते. त्यामुळे ऑफिसपेक्षा अशा जागा कधीही चांगल्या आहेत.

– रोहन आंबिके, पत्रकार