|| अलका फडणीस

साहित्य

बासमती तांदूळ १ वाटी, नारळाचे दूध अडीच ते ३ वाटय़ा, गूळ दीड वाटी बारीक चिरलेला, साजूक तूप २ मोठा चमचा, वेलची पूड १ चमचा, बदाम ५-६ तुकडे केलेले, अख्खी वेलची १-२, बेदाणे ८-१०.

कृती

तांदूळ धुऊन चाळणीत निथळत ठेवा. पातेल्यात १ मोठा चमचा तूप घाला आणि त्यावर वेलची फोडून टाका. लगेच धुतलेले तांदूळ टाकून चांगले परता. त्यावर नारळाचे दूध घालून नीट मिक्स करा. मंद गॅसवर भात शिजवून घ्या. नंतर त्यात गूळ घाला आणि हलक्या हाताने हलवत राहा. गूळ विरघळल्यावर १ चमचा साजूक तूप घाला, वेलची पूड, बदाम आणि बेदाणे टाका आणि वाफ आणा. गरम गरम नारळी भाताची चव काही औरच असते.