सुहास जोशी

प्रत्येक देशाची खानपानाची काही खास वैशिष्टय़े असतात. इंडोनेशियात भटकताना लक्षात राहते ती तेथील कॉफी. आपल्याकडे जसा चहा कोठेही मिळतो तशी चहाची सोय या देशात नाही. पण कॉफी मात्र बहुतेक ठिकाणी दिसते. सायकलवर चहा-कॉफीचे स्टीलचे मोठे थर्मास लावून फिरणारे विक्रेते जसे आपल्याकडे हमखास दिसतात, तसेच कॉफी आणि अन्य खाद्यपदार्थ घेऊन बाइकवर फिरणारे तिथे दिसतात. कॉफी मात्र अफलातून असते. जिभेवर बराच काळ चव रेंगाळवणारी ही कॉफी न चुकता प्यायला हवी. दुधाचा वापर तुलनेने कमीच असतो. त्यामुळे काहीशी काळपट दिसते. मात्र, तिचा गंध अगदी लांबूनपण जाणवतो. बालीसारख्या ठिकाणी अनेक फिरते विक्रेते सकाळी नाश्त्याचे पदार्थ आणि इन्स्टंट कॉफीची पाकिटे लटकवून फिरताना दिसतात. तिथे टपऱ्या नसल्या तरी इतर खाद्यपदार्थाबरोबर कॉफी मिळण्याची सोय अनेक ठिकाणी आहे. योग्यकर्ता (जोग्जाकर्ता) शहरातील रेल्वे स्टेशनजवळील चौकात पदपथावर बैठक मारून कॉफीचा आस्वाद घेण्याची सोय आहे. अर्थात जुनेजाणते इंडोनिशयन लोक मात्र या इन्स्टंट कॉफीला नाक मुरडताना दिसतात. त्यांना पारंपरिक पद्धतीने केलेली कॉफीच अधिक आवडते.

इंडोनेशियन खानपानामध्ये मांसाहाराला अधिक प्राधान्य आहे. मात्र त्याचबरोबर काही खास शाकाहारी पदार्थदेखील आहेतच. टोफू हा तेथील सर्वाधिक खपाचा पदार्थ असावा अशा पद्धतीने रस्त्यावर टोफू तळून विकणाऱ्यांचे गाडे सर्वत्र दिसतात. तर भाजलेली कच्ची केळी, तांदळाच्या उकडीसदृश भाजून खायचा पदार्थ असे काही वैविध्यपूर्ण प्रकार पर्यटनस्थळांवर हमखास मिळतात. कॉफीच्या जोडीने यांचा कधीतरी आस्वाद घ्यायला हरकत नाही.