|| नेहा शितोळे

पुण्यातील सर परशुरामभाऊ  महाविद्यालय हे माझं कॉलेज. मी अर्थशास्त्र  या विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी मला जिवाभावाची अदिती नावाची मैत्रीण भेटली. कॉलेज दिवसातली मजा मस्ती करायला, अभ्यासाचे टास्क एकत्र लीलया न्यायला ती नेहमी माझ्यासोबत असायची. आम्ही दोघी नेहमी एकत्र असायचो. त्यामुळे कॉलेजचा पहिला दिवस आमच्या मैत्रीसाठी महत्त्वाचा आणि अविस्मरणीय ठरला. पण काळाने घात केला. कर्करोग होऊन ती गेली. पण तिचं व्यक्तिमत्त्व नेहमीच माझ्यासाठी प्रभावशाली आहे.

माझ्यासाठी कॉलेजचा कट्टा हा कायम नाटक ह्य़ा विषयामुळेच चर्चेत असायचा. मी नाटकात अभिनय करू शकेन की नाही? इथपासून ते नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री इथपर्यंतचा माझा प्रवास कॉलेज कट्टय़ाने पाहिला आहे. अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतल्यावर मी लगेच प्रायोगिक नाटक करणाऱ्या संस्थेत दाखल झाले. मी एक वर्ष कॉलेजकडून फिरोदिया करंडक केला. त्यानंतर नाटय़वर्तुळातल्या राजकारणामुळे मी एकही नाटक कॉलेजकडून केला नाही. पण कॉलेजमधल्या जरी मी नाटय़विश्वचा भाग नसले तरीही माझे मित्र हे नाटय़विश्वातलेच होते. माझ्या कॉलेजमध्ये नाटकाचे ‘आसक्त’, ‘समन्वय’ आणि ‘नाटक कंपनी’ हे ग्रुप होते. जे अजूनही आहेत. आजच्या तरुणाईवर राज्य करणारे अमेय वाघ, निपुण धर्माधिकारी, राधिका आपटे, समीर विद्वंस, अमृता सुभाष हे माझ्या चमूत होते. आता सिनेमाच्या निमित्ताने दौरे होतातच, पण कॉलेजमध्ये असताना प्रायोगिक नाटकाच्या निमित्ताने होणारे दौरे आजही लख्ख आठवतात. दिल्ली, कोलकाता, म्हैसूर आणि थेट इजिप्त एवढे दौरे आम्ही केले. कॉलेजमध्ये असताना दिल्लीला तर आम्ही दरवर्षी जायचो. दौऱ्याचे त्या वयात खूप अप्रूप होते.

कॉलेजमध्ये असल्यापासूनच मी धाडसी होती. माझा एक मित्र माझ्याच मैत्रिणीला बाईक कशी चालवायची याचे धडे देत होता. मलाही तिच्यासोबत शिकव अशी मी त्याला गळ घातली, पण त्याने उगाच नकार दिला. त्याच्या या नकाराचा मी बदला घ्यायचा ठरवला व त्याला चॅलेंज दिलं की, माझ्या वाढदिवसानंतर मी कॉलेजमध्ये माझ्या बाईकवरूनच येईन अन्यथा येणार नाही. माझा वाढदिवस २५ जूनला असतो. नुकतंच कॉलेजचं नवीन वर्ष सुरू झालं होतं. मला बाईकच चालवायला येत नव्हती म्हणून आई बाईक घेऊन द्यायला काही तयार नव्हती. पहिले १० दिवस तिला मनवण्यात गेले. चॅलेंज दिलं होतं म्हणून मी काही कॉलेजला गेले नाही. पण जुलैत माझी हक्काची बाईक आली व ती चालवत मी कॉलेजला नेली व माझं चॅलेंज पूर्ण केलं. तेव्हापासून पुढे तीन र्वष महिला पार्किंगमध्ये केवळ माझीच बाईक असायची. नंतर ही बाईक माझी साथी झाली. नाटकाच्या कामानिमित्त काही काम असेल तर पटकन मीच धावत जाऊन बाईक काढायचे व सुसाट जायचे. पण तेव्हापासून आतापर्यंत मी वाहतुकीचा कोणताच नियम मोडला नाही. कधीच पावती फाडली नाही याचा अभिमान आहे.

कॉलेजमध्ये असताना बाईकवरून मी विशेष खाबूगिरी केली आहे. सिंहगडची पिठलं-भाकरी, खडकवासलाला कणीस खायला मी खास जायचे. माझे स्पॉटस आणि तिथे जाऊन काय खायचंय हे ठरलेलं असायचं. जसं की, कॉलेजच्या बाहेर नागनाथ भुवनच लिंबू सरबत, दुर्गाची कोल्ड कॉफी, डेक्कनची कच्ची दाबेली, माझरेरिनच चिकन सॅण्डविच, रिलॅक्सची जगात भारी पावभाजी आणि दुर्गा भुवनची बिर्याणी इत्यादी. नाटकाच्या तालमी झाल्यावर रात्री-अपरात्री आम्ही सगळे जण एकत्र स्वारगेटला अंडाबुर्जी खायला जायचो.

नाटकाच्या तालमींसाठी लेक्चर बंक करण्यात एक वेगळीच मजा होती. पण मी या सगळ्यात मी अर्थशास्त्र हा विषय घेतला असल्याने मला अभ्यास वेळच्या वेळी पूर्ण करावा लागे. विद्यार्थ्यांची भूमिका चोख पार पाडावी लागे. माझ्या इतर कलाकार मित्रांनी भाषा विषय घेतल्याने ते परीक्षेच्या आदल्या रात्री अभ्यास करून पास व्हायचे. मला मात्र लेक्चरला शिकवलेले सगळे ‘अर्थ’ दररोज समजून उमजून घेऊन अभ्यास करावा लागे. कॉलेजच्या शेवटचा दिवस मला आठवतच नाही, कारण पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही मी कॉलेजच्या आसपास टोळीतल्या सगळ्या मित्रांना भेटायला जायचे.

शब्दांकन : मितेश जोशी