27 January 2021

News Flash

लेक्चर बुडवून थेट तालमीला हजेरी

जोशी बेडेकर कॉलेजमध्ये असताना मी अभिनय कार्यशाळेत सहभागी झाले जिथे अभिनय या तंत्राची माझी तोंडओळख झाली.

कॉलेज आठवणींचा कोलाज : रसिका सुनील, अभिनेत्री

मी अकरावी-बारावी डोंबिवलीच्या पेंढारकर कॉलेजमध्ये होते. पदवी शिक्षणासाठी ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे मी बी.एम.एम. म्हणजेच बॅचलर ऑफ मास मीडिया या विषयात पदवी मिळवली. कालांतराने मी परदेशातसुद्धा अभिनय शिकायला गेले. त्यामुळे माझ्या तिन्ही कॉलेज आठवणींचा कोलाज मोठा आहे.

पेंढारकरमध्ये असताना मी संगीत विशारद झाले. त्यामुळे येथे केवळ अभ्यास आणि संगीत एवढय़ाच माझ्या आठवणी आहेत. कॉलेजचा वारा लागला जोशी बेडेकरमध्ये. आपण आळशी आहोत, आपल्याकडून इतरांसारखा फार तासन्तास बसून काही अभ्यास होऊ  शकत नाही, हे माझ्या लक्षात आल्यावर मी अभिनय क्षेत्राकडे कॉलेजमध्ये असतानाच वळाले. जोशी बेडेकर कॉलेजमध्ये असताना मी अभिनय कार्यशाळेत सहभागी झाले जिथे अभिनय या तंत्राची माझी तोंडओळख झाली. कॉलेजमध्ये असताना तीन वर्षे सलग मी युथ फेस्टिव्हल व आयएनटी एकांकिका स्पर्धेत सहभागी झाले. युथ फेस्टिव्हलमध्ये तर चार ओळींची वाक्ये असलेली माझी सेक्रेटरीची भूमिका होती. डावीकडून प्रवेश केला, वाक्य बोलले आणि उजवीकडून निघूनसुद्धा गेले. गाण्यात मात्र माझा कोणी हात धरू शकलं नाही. तिथे मी लहानपणापासूनच अग्रेसर होते.

जोशी बेडेकरमध्ये असताना, मी एकांकिकेच्या तालमीला एक दिवस काही वैयक्तिक कारणामुळे गेले नाही आणि ते मी फोन करून कोणाला कळवलंसुद्धा नाही. त्या दिवशी तालमीचे तीनतेरा वाजले. दुसऱ्या दिवशी मला दिग्दर्शकाने खूप झापलं आणि मी सगळ्यांसमोर हात जोडून, गुढग्यावर बसून सगळ्या टीमची जाहीर माफी मागितली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, कितीही वैयक्तिक आयुष्यात अडथळे आले तरीही प्रोफेशनल आयुष्यात त्याची सावली पडू द्यायची नाही. ही कॉलेजमध्ये असताना मला मिळालेली मोठी शिकवण आहे.

आमच्या कॉलेजची वेळ सकाळी ७ ते १०, कधी तरी १२ पर्यंत असायची. सुरुवाती-सुरुवातीला मी गुणी बाळासारखी कॉलेजला जायचे. नियमित लेक्चर अटेंड करायचे आणि मग तालमीला जायचे. काही दिवसांनी हे चित्र बदललं. रोज दुपारी २ वाजता थेट तालमीला हजर व्हायला लागले. सबमिशन जवळ आले की सकाळी लवकर यायचे. बऱ्याचदा सबमिशनला माझे मित्रच मला मदत करायचे.

मी कॉलेजमध्ये इतकी अतरंगी होते की, मला वर्गातून बाहेरही काढायचे किंवा लेक्चरला यायला उशीर झाला तर शिक्षक जाहीर अपमान करून बाहेर काढायचे. जोशी बेडेकर कॉलेजची लाइफ फार हलकीफुलकी होती. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी माझ्या डोळ्यांतून एक टिपूसही आला नाही. झी मराठी वाहिनीवर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका करत असताना मी मध्येच बाहेर पडले. तेव्हा माझ्या चाहत्यांना प्रश्न पडला, की हा बच्चा गेला कुठे? तर मी लॉस एजेलीसमध्ये न्यू यॉर्क फिल्म अ‍ॅकॅडमीमध्ये अभिनय शिकायला भरती झाले. अभिनयाचं योग्य मार्गदर्शन इथे मला मिळालं. इथे मी आणि अजून दोघे जण भारतीय होते. बाकी सगळे वेगवेगळ्या देशांतून आलेले होते. कोणी कोरियातून, कोणी ब्राझीलमधून वगैरे.

अवघ्या दोन महिन्यांचं शिक्षण होतं; पण हे दोन महिने माझ्या आयुष्यातले सर्वोच्च दिवस होते.

आमचे रोज वेगवेगळे तास असायचे. मी जास्त व्हॉइस कल्चरवर भर दिला. इथे शारीरिक सुदृढतेला जास्त महत्त्व देण्यात येई. त्यामुळे कॉलेजमध्ये दररोज व्यायाम चालायचा. त्याच अभिनयासाठीच महत्त्व समजावून सांगितलं जायचं. भारतात परतल्यावरसुद्धा मी अविरत व्यायाम चालू ठेवलाय. माझ्या तिन्ही कॉलेजमध्ये खाण्यापिण्याची चंगळ होती. पेंढारकरला असताना डोंबिवलीतले सगळे चवदार अड्डे मी पालथे घातले होते. ठाण्यात कॉलेजच्या समोरची चविष्ट फ्रँकी तर असायचीच. सोबतच कुंज विहारचा आणि जम्बो किंगचा वडापाव हमखास ठरलेला असायचा. कॉलेज सुटल्यावर घरी जात असताना जम्बो किंगचा वडापाव पार्सल घेऊन मी ट्रेनमध्ये एक घास बत्तीस वेळा चावून खायचे. इतका तो मला आवडायचा. न्यू यॉर्क फिल्म अ‍ॅकॅडमीमध्ये तर रोज चंगळ असायची. सगळे जण वेगवेगळ्या देशांतून आपल्या आईवडिलांना सोडून आले होते. त्यामुळे प्रत्येक जण स्वत: वेगवेगळे पदार्थ बनवायचे. त्यामुळे इथली चंगळ तर निराळीच होती. वेगवेगळे कुझिन मला खायला मिळाले. एकंदरीतच इथली कॉलेज लाइफ ही माझ्यासाठी खरी कॉलेज लाइफ होती.

हे कॉलेज सोडताना मी ढसाढसा रडले होते. दोन महिन्यांतच आम्ही इतके एकमेकांशी जुळलो होतो की, कोणालाच अलविदा करावंसं वाटत नव्हतं. कॉलेज संपल्यावर प्रत्येक जण काही दिवसांनी आपापल्या घरी परतले. त्यामुळे प्रत्येकाची फेअरवेल पार्टी असायची आणि प्रत्येक पार्टीत मी मनापासून रडायचे. त्यामुळे जोशी बेडेकरमध्ये न रडल्याचा कोटा इथे मात्र भरून निघाला.

=शब्दांकन: मितेश रतिश जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2019 1:40 am

Web Title: college lifestyle college memories akp 94
Next Stories
1 ‘स्तनपान साक्षर’ व्हा!
2 प्रोस्टेट ग्रंथीची वाढ
3 अपस्मार
Just Now!
X