लीना भागवत

कॉलेजचे दिवसच मस्त होते. गोखले कॉलेज बोरीवली हे माझं कॉलेज. कॉलेजात असताना उन्मेष, आयएनटी आणि हिंदीतल्या एकांकिका स्पर्धाना उतरायचो. माझ्या अभिनयकलेला वाव देणारं पोषक वातावरण तिथे होतं. आमच्या कॉलेजचे प्राचार्य डॉ. गुजराथी सर आम्हाला खूप पाठिंबा देत असत. सुरुवातीला आम्ही मुलंमुलंच जमून नाटक बसवायचो. पण जेव्हा कळलं की मुलं खूप धडपड करताहेत, कॉलेजसाठी बक्षिसं आणत आहेत, तेव्हा आमच्या कॉलेजच्या ड्रामा क्लबकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मग कॉलेजमधील सगळे जण आमच्या मागे उभे राहिले. नाटक बसवताना तेव्हा आर्थिक चणचण असायची. आता त्याविषयी विचार करताना वाटतं, की तेही छान होतं. तेव्हा सगळं सहजासहजी मिळत गेलं असतं, तर आता जे यश मिळालंय त्याची किंमत राहिली नसती.

मी भाग घेतलेली पहिली एकांकिका हिंदी होती. मी अकरावीत असतानाच हिंदी ड्रामा क्लब सुरू झाला होता. नाटकासाठी ‘ऑडिशन’ होती, त्या दिवशी माझी दाढ काढलेली होती. वेदना होतच होत्या. ‘ऑडिशन’ला गेल्यावर मला सरांनी विचारलं, ‘आप क्या कर सकती हो..’ तेव्हा मी उस्फूर्तपणे म्हणाले, फक्त ओरडू शकते. तर ते म्हणाले ओरड.. मग ओके म्हणून जोरात ओरडले. ते अजून आठवतंय. हिंदू-मुस्लीम यांच्यातील दंगलीवर भाष्य करणारी ती एकांकिका होती. हिंदू एक गट, मुसलमान एक गट आणि त्यात मरते ती इन्सानियत.. असा तो विषय होता. आणि त्यात ‘इन्सानियत’च्या मुख्य भूमिकेसाठी माझी निवड एका ओरडण्यामुळे झाली होती. मला ते खूप आवडलं. आयुष्यात माझ्या अभिनयाला मिळालेली पहिली टाळी तेव्हा अनुभवली. तेव्हा माहीतही नसतं, लोकांना काम आवडलं की ते टाळ्या वाजवतात म्हणजे नेमकं काय असतं. ‘मैं करू भी तो क्या करू, मुझे कयामत से पहले, मौत भी नही आती..’ असं वाक्य म्हणून ती इन्सानियत रडत असते. या वाक्याला मला पहिली टाळी मिळाली होती. ती पहिली टाळी मिळाली होती, तेव्हाचं निरागस जग होतं. पण आता माझ्यातली अभिनेत्री एक पाऊल चढून वर गेलीय, तेव्हा आता कळतंय की आता माझं हे टाळीचं वाक्य आहे. तर आता अभिनय करताना मी तो निरागसपणा शोधायचा प्रयत्न करीत असते.

ते कॉलजचे दिवस जसे पुन्हा येणार नाहीत, तसं तेव्हा उच्चारलेल्या वाक्यांमधला निर्मळपणा होता, निरागस भाव होता तो पुन्हा येईल की नाही, याविषयी शंका वाटते. पण मला आजही कॉलेजच्या आठवणींमध्ये रमायला आवडतं.

कॉलेजमधून बाहेर पडल्यावर हिंदी एकांकिकांमधून बऱ्यापैकी काम केल्यामुळे ‘नुक्कड’ या मालिकेचाच पुढचा भाग असलेली ‘नया नुक्कड’ मालिकेसाठी मला विचारणा झाली. पण तेव्हा माझ्या घरच्यांनी आणि प्राचार्यानी समजावून सांगितलं की हे मोठं जाळं आहे. त्यात तू एकदा पाऊल टाकलंस तर तुला परत अभ्यासाकडे वळता येणार नाही. त्यामुळे मी ती मालिका नाकारली. पण मी कॉलेजमध्ये असतानाच ‘मोरूची मावशी’ नाटकात काम करू लागले होते. त्यानंतर दुसऱ्या एका हिंदी मालिकेतही मग काम केलं. त्यामुळे कॉलेजमध्ये असल्यापासूनच मालिका आणि नाटकात व्यावसायिकरीत्या काम सुरू झालं होतं. नंतर मात्र मी काही वेळ थांबले. माझं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. मग पुन्हा नाटकाकडे वळले. त्याच वर्षी मी ‘अधांतर’ या नाटकात काम केलं. आता कॉलेजमध्ये जाणं होत नाही. कारण आता आमच्या वेळचे शिक्षक तिथे नाहीत. पण अजूनही माझं काम पाहिलं किंवा मुलाखत पाहिली की माझे प्रिन्सिपल डॉ. गुजराथी सर अजूनही मला फोन करतात.

कॉलेजच्या काळात केलेला संघर्ष, मेहनत तुम्हाला तुमचे पाय जमिनीवर ठेवायला मदत करतात. त्या वेळी मी कशी ट्रेनने फिरायची. एकेका वाक्यासाठी कशी झगडत होते. तेव्हा फार माध्यमं नव्हती. नाटक एके नाटक होतं. आजही आठवतोय, सकाळी ११ वाजता केलेला प्रयोग. आणि त्यालासुद्धा मिळालेला लोकांचा चांगला प्रतिसाद. आता शनिवार- रविवारवर थिएटर आलं. हा फरक आता दिसतोय. तेव्हाच्या आणि आताच्या लीनामध्ये एक गोष्ट अजूनही कायम आहे, ती म्हणजे रंगभूमीवर दिसायची धडपड. मला मालिकांमध्ये सतत काम करावंस्ं वाटत नाही. नाटक म्हणजेच रंगभूमी हा माझा ऑक्सिजन आहे. ते का ‘शनिवार-रविवार’वर येऊन ठेपलंय, ही खंत वाटते. तेव्हा मला बुकिंगच्या गणिताची फार चिंता नसायची. पण आता लीना भागवत निर्माती आणि अभिनेत्री म्हणून जेव्हा एखाद्या नाटकाकडे बघते, तेव्हा विचार करते की याला बुकिंग मिळेल ना. मग कथा कशी आहे..असा विचार येऊ  लागतो, तेव्हा मी जुने दिवस आठवते, की नाही लीना अभिनयावर लक्ष केंद्रित कर. नंतर यश मागून येईलच. यशासाठी एखादं प्रोजेक्ट (नाटक) करू नकोस. प्रोजेक्ट कर त्यामागोमाग यश येईल. या सगळ्या गोष्टींची जाणीव मला माझ्या कॉलेजचे दिवस करून देतात. ते संस्कार आजही विसरू शकत नाहीत. एकदा माझी ‘बॉम्बे मेरी जान’ ही एकांकिका बघायला विजय केंकरे आले होते, त्यांनी माझं काम बघून ‘हाच खेळ उद्या पुन्हा’ या नाटकात भूमिका दिली. तिथे माझी मंगेश कदम, श्रीरंग गोडबोले यांच्याशी ओळख झाली. कॉलेजमधली ‘बॉम्बे मेरी जान’ ही एकांकिका ते ‘चल, तुझी सीट पक्की’ या नाटकापर्यंतच्या प्रवासात कधी टेन्शन आलं, वा द्विधा मन:स्थिती होते. तेव्हा कॉलेजचे दिवस नक्कीच आठवतात. आता माझे निर्णय मला घ्यायचे असतात, मला येणारे ताण मला निस्तरायचे असतात. तेव्हा एकांकिकेत काम करीत असताना घरून सगळ्या गोष्टी घेऊन जायचो. आता मला या क्षणी एकांकिकांच्या निमित्ताने आमच्यात असलेली सांघिक एकी आठवतेय. अलीकडे आपण फक्त स्वत:चा विचार करू लागलो आहोत. आपण मिळूनमिसळून एखादी गोष्ट करूया, हा विचार मागे पडतोय. मला वाटतं ते दिवस पुन्हा यावेत.

शब्दांकन –  भक्ती परब