कॉलेज आठवणींचा कोलाज : ललित प्रभाकर, अभिनेता

मी मुलुंडच्या वाणी महाविद्यालयात अकरावी-बारावीला होतो. पदवी शिक्षणासाठी कल्याणच्या बिर्ला महाविद्यलयात प्रवेश घेतला. अकरावी-बारावीतल वातावरण कडक शिस्तीत गेल. हजेरीच्या बाबतीत तर कॉलेज फारच शिस्तीचं होतं. त्यात कॉलेजला युनिफॉर्म होता. त्यामुळे रंगीबेरंगी कपडे अंगावर आले ते थेट तेरावीलाच.

वाणी महाविद्यालयात असताना आम्ही मित्र क्रिकेट खेळायचो. त्यामुळे सरडय़ाची धाव कुंपणापर्यंत तशी आमची धाव लेक्चर बंक करून क्रिकेटच्या मैदानापर्यंतच. दोन वर्ष कशीबशी काढली. बारावी पास झालो आणि नंतर बिर्ला कॉलेजला कम्प्युटर सायन्ससाठी प्रवेश घेतला. बिर्ला कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचं माझं नक्की नव्हतंच. बारावीनंतर काय करायचं? या गोंधळात मी कित्येक दिवस घालवले. सर्वात पहिल्यांदा मी इंजिनीअरिंगला प्रवेश घेण्याचं ठरवलं. सीईटीची परीक्षासुद्धा उत्तम मार्कानी उत्तीर्ण झालो. नागपूरला एका कॉलेजमध्ये प्रवेशप्रक्रियादेखील पूर्ण झाली. पण अचानक मी माझा निर्णय बदलला व विद्येच्या माहेरघरी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. पुण्यातल्या मॉडेल कॉलेजमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला. का कुणास ठाऊक मनासारखं सगळं होऊनसुद्धा माझी शिक्षणासाठी पुण्याला जायची इच्छाच होत नव्हती. सरतेशेवटी तिकडचासुद्धा प्रवेश रद्द करून कल्याणच्या बिर्ला कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. खरं तर विचार अचानकच माझ्या डोक्यात आला. आणि अखेर बिर्ला कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्ससाठी मी प्रवेश घेतला.

मला करायचं होतं थिएटर आणि मी शिक्षण घेत होतो कम्प्युटर सायन्सचं. कॉलेज दिवसांमध्ये हे करू की ते करू या मानसिकतेत मुलं वावरत असतात, त्याच मानसिकतेत मीसुद्धा वावरत होतो. थिएटर करणाऱ्या कलाकार मित्रांशी माझी कॉलेजमध्ये ओळख झाली. सुदैवाने या चमूत माझ्यासारखीच, ‘शिकतोय एक आणि करतोय एक’ या पठडीतली मुलं होती. याच महाविद्यालयात असताना माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग आला. ‘मिती चार’ या नाटय़ संस्थेबद्दल मला माहिती मिळाली. मी त्या संस्थेत गेलो. सगळी चौकशी केली व प्रवेश घेतला. या संस्थेने मला अभिनयविश्वाची ओळख करून दिली. माझ्यासोबत कॉलेजमध्ये शिकणारी बरीच मुलं या संस्थेत होती. त्यामुळे बिर्ला महाविद्यालयात असताना मी ‘मिती चार’ संस्थेसोबत व कॉलेजसोबत वेगवेगळी नाटकं केली.

मी बिर्लामध्ये असताना बऱ्याच खोडय़ा केल्या आहेत. मुळातच रुईया, रुपारेल किंवा पुण्याच्या महाविद्यालयात जसं नाटय़वलय असतं तसं वलय बिर्लात नव्हतं. ते नाटय़वलय आम्हा मुलांना तयार करायचं होतं, पण त्यासाठी खूप निराशा आली. नाटकासाठी आम्ही किरकोळ रुपयांची मागणी कॉलेजजवळ करायचो. तेही आम्हाला मिळताना दमछाक व्हायची. आमचे मुख्याध्यापक एखाद्या कागदावर सही शिक्का द्यायला जाम किरकिर करायचे. कागदपत्रं अपेक्षित ठिकाणी दाखल करायची वेळ आली तरीही सही शिक्का मिळायचा नाही. एकदा रागाने मी मुख्याध्यपकांचा शिक्काच पसार केला व कागदपत्रांवर मारला व ती पुढे दाखल केली. कॉलेजचा कॅम्पस नावाला प्रशस्त होता. तालमींसाठी कॉलेजकडे जागाच नव्हती आम्ही भर पावसात गच्चीवरसुद्धा तालमी केल्यात. जशी जागा मिळेल, जिथे जागा मिळेल तशी तालमीची गाडी ढकलली.

एक वर्ष मी ‘सीएल’ या पदावर होतो. त्या वेळी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन फेस्टिव्हलसाठी बिर्लामध्ये आमंत्रित करणं, दुसऱ्या कॉलेजच्या फेस्टिव्हलसाठी आपल्या कॉलेजच्या टीमला बाहेर घेऊन जाणं असे सगळे अनुभव मी घेतले. बिर्लोत्सव व युथ फेस्टिव्हलचं आयोजन केलं. या फेस्टिव्हलच्या आयोजनामध्ये मी सगळ्यात पुढे होतो. एका वर्षी मिस्टर बिर्ला हा किताबसुद्धा मी पटकावला होता. बिर्ला कॉलेजमध्ये असताना नाटकाच्या निमित्ताने मी खूप नाइटलाइफ अनुभवली आहे. कॉलेजमध्ये रात्री एक वर्ग अभ्यासासाठी खुला असायचा. आम्ही नाटक कंपनीवाले त्या वेळी एकत्र यायचो. तिकडे जाऊन बसायचो. अभ्यास सोडून भलत्याच विषयांवर गप्पा मारायचो. रात्रीच्या वेळी आम्ही मैदानात चूल करून चहा पार्टी करायचो. अंडी आणून ती उकडून खायचो. त्यानंतर रात्रीच्या वेळी सायकल काढून मस्त कल्याणदर्शन करायला बाहेर पडायचो. स्टेशनजवळ बुर्जी-पाव खाऊन मग परत कॉलेजमध्ये येऊन झोपायचो. एकदा असेच वर्गात येऊन आम्ही ६-७ जण झोपलो होतो. सकाळी त्या वर्गात ज्यांचे लेक्चर होते, ते प्रोफेसर आणि विद्यार्थी वर्गाबाहेर येऊन उभे होते आणि आम्ही मात्र अतिशय गाढ अशी ब्रह्मानंदी टाळी लावली होती. शेवटी शिपायांना बोलावून त्या प्रोफेसरांनी आम्हाला उठवल्याचे माझ्या आजही लक्षात आहे.कॉलेजमध्ये मी कम्प्युटर सायन्ससाठी प्रवेश घेतला खरा, पण माझ्या आठवणींचा कोलाज हा नाटय़मयच आहे. मला अभ्यासाची विशेष आवड नव्हती. त्यामुळे अभ्यासात खास लक्ष नव्हतं. अभ्यासाचा कंटाळा असल्यामुळे मी कधी जर्नल्स पूर्ण केल्याचं किंवा वेळेवर सबमिशन्स केल्याचं मला आठवत नाही. वर्गातही माझी उपस्थिती फारशी नसायची. मला वाचनाची खूप आवड होती. आणि नेमकं साहित्य विश्वातली पुस्तकं आम्हा कम्प्युटर सायन्सवाल्यांना मिळायची नाहीत. मग मी अशा वेळी आर्टस्मध्ये शिकणाऱ्या मित्रांच्या कार्डवर पुस्तक घ्यायचो.  संभ्रमात प्रवेश घेतलेला मी कॉलेजच्या शेवटच्या दिवशी मात्र आयुष्याची घडी व्यवस्थित बसवून बाहेर निघालो.

शब्दांकन : मितेश रतिश जोशी