शामल भंडारे, सौरव आंबवणे

डिसेंबर महिना म्हटल्यावर महाविद्यालयीन महोत्सवांचा काळ सुरू होतो. मुंबईसह इतर अनेक मोठय़ा शहरांतील नामांकित महाविद्यालयांकडे आपसूकच सगळ्यांचे लक्ष वेधले जाते. तरुणांसाठी आपल्या कलागुणांचे सर्वोच्च प्रदर्शन करण्याचा हा महोत्सव. अगदी महोत्सवाच्या थिमपासून ते व्यवस्थापनापर्यंत आणि सजावटीपासून प्रसिद्धीपर्यंत संपूर्ण प्रवासाची जबाबदारी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या शिरावर एकमेकांच्या साहाय्याने सांभाळलेली असते. प्रत्येक महाविद्यालयात चुरस असते ती यंदा आपल्या महोत्सवात वेगळेपण साधण्याची. अर्थातच सगळ्या नामांकित महाविद्यालयांमध्ये असणारी ही अलिखित अशी स्पर्धा असते. मुंबईतील नामांकित महाविद्यालयांमधील महोत्सवांचा विषय आल्यावर सर्वप्रथम व्हीजेटीआय, पोतदार महाविद्यालय, सोमैया, केळकर महाविद्यालय त्याचबरोबर पुण्याचे स प महाविद्यालय आणि अशा अनेक महाविद्यालयांची वर्णी लागते. या काही महाविद्यालयांचा महाउत्सव त्यांची वेगळी ओळख निर्माण करत असतो. तरुणांना एक वेगळी ओळख निर्माण करून देत असतो.

वाचन जागृती करणारा स.प. महाविद्यालयाचा ‘अक्षरोत्सव’

पुण्यातील स. प. महाविद्यालयातील ‘अक्षरोत्सव’ महोत्सवातही तरुणांची गर्दी असते. ‘आजकालच्या पिढीला वाचनाची आवड नाही’, ‘भाषेचे महत्त्व नाही’, असे म्हणतात, पण पुण्यातील स. प. महाविद्यालयातील विद्यार्थी ही वाक्ये खोडून काढत आहेत. वाङ्मयाशी संबंधित सादरीकरणामध्ये या महोत्सवात ‘अभिवाचन ‘, ‘नाटय़वाचन’, ‘काव्यवाचन’, ‘नाटक’ असे विषय हाताळण्यात येतात. या उत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे ‘शब्दघ्र्य’ कार्यक्रम. तरुणांना शब्दाची ओळख करून देणारा हा महोत्सव. ज्यात तरुणांची शब्दसामग्री ओळखली जाते.

व्हीजेटीआयच्या ‘प्रतिबिंब’मध्ये तरुणांचा उत्साह

व्हीजेटीआय महाविद्यालयाचा सांस्कृतिक आरसा दाखवणारा उत्सव म्हणजे प्रतिबिंब. रंगभूमीवरील नाटकांपासून ते वैयक्तिक कलागुणांपर्यंत सगळ्या गोष्टींना प्रतिबिंबचे व्यासपीठ मोठे ठरते. गेली तीस वर्षे आपली परंपरा जपणारा हा संपूर्ण महोत्सव तरुणांचा समूह मोठय़ा दिमाखात साजरा करत असतो. समाजाच्या आणि संस्कृतीच्या सर्व अंगांची ज्यांना ओळख आहे असे कलाकार, नेतृत्व करू शकतील असे नेते आणि सामाजिक रचनेला सुधारण्यात सक्षम असे अधिकारी येथून बाहेर पडावेत असा प्रतिबिंब चा उद्देश आहे, असे महोत्सवाच्या व्यवस्थापन विभागातून सांगण्यात आले. प्रतिबिंब हा वार्षिक आणि राष्ट्रीय दर्जा असणारा उत्सव म्हणून ओळखला जातो. इथले सर्व व्यवहार रोकडरहित होत असतात. डॉ. अनिल काकोडकर, सिंधुताई सपकाळ त्याचबरोबर कलाकार नेहा कक्कर, रेमो डिसोझा आणि सिनेसृष्टीतील जुही चावला, स्वप्निल जोशी यांची उपस्थिती असेल. रद्दीचे संकलन, स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे.

डायमेन्शनची क्रेझ

वझे केळकर महाविद्यालयाचा ‘डायमेन्शन’ हा २४ वर्षांपासून सुरू असलेला महोत्सव आहे. सकारात्मकता आणि आशावाद हे या महोत्सवाचे मूळ उद्दिष्ट आहे. इतर महाविद्यालयांपेक्षा या महोत्सवाचे ऑनलाइन अस्तित्व मोठय़ा प्रमाणात आहे. विशेष म्हणजे या महोत्सवाचे त्यांचे स्वत:चे वर्तमानपत्र असून त्यात महोत्सवाच्या चित्रफिती प्रसिद्ध केल्या जातात. डायमेन्शन समाचार नावाचे हे पत्रक संपूर्ण महोत्सवाविषयी आणि उपक्रमांविषयी माहिती देत असते. याचे संपूर्ण व्यवस्थापन विद्यार्थ्यांकडून होत असते.

पोदार महाविद्यालयाचा ‘मोनेटा’

त्याचबरोबर माटुंगा, मुंबई येथील आर.ए.पोदार महाविद्यालयाचा मोनेटा भारतातला सर्वात मोठा आर्थिक आणि कॉपोरेट महोत्सव आहे. हा महोत्सव महाविद्यालयीन मुलामुलींसाठी तर असतोच पण त्यासोबत मोनेटा आणि पोदार महाविद्यालयाची खासियत म्हणजे शाळेतील मुला-मुलींनाही सहभागी करून घेतात. मोनेटा महोत्सवात लहान मुलांनी पैसे कसे गुंतवावे, कुठे गुंतवणूक योग्य पद्धतीने करावी, त्याचबरोबरीने बँक खाते किती महत्त्वाचे असते, खात्यातून पैसे कसे काढतात याविषयी माहिती दिले जाते.

अभ्यासाबरोबरच महाविद्यालयीन आयुष्य विविध महोत्सवांतून अनुभवायचे आणि त्यातून समृद्ध व्यक्तिमत्त्व घडवायचे आणि म्हणूनच अकरावीला मी वाङ्मय मंडळाची वाट धरली. ११वी इयत्तेतील मी आणि आत्ताची मी यातला फरक अनुभवत आहे. महोत्सवाच्या व्यवस्थापनापासून, प्रसिद्धीपर्यंत शिकलेल्या सर्व अनुभवांची शिदोरी जमा आहे.

– ईशा कुलकर्णी  (द्वितीय वर्ष कला शाखा, सर परशुराम भाऊ  महाविद्यालय, पुणे)