भक्ती परब, ऋषिकेश मुळे

सध्या सर्व शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी लागली आहे. मात्र या दोन्ही शिक्षणसंस्थांच्या सुट्टीत खूप मोठा फरक आहे. शाळेत असताना छंदवर्ग, बालनाटय़ांमध्ये सुट्टय़ा घालवणारी मुले महाविद्यालयात आल्यावर तरुण झाल्याची जाणीव होते आणि वेगळं करण्यावर भर दिला जातो. तरुणांच्या उन्हाळी सुट्टीच्या काही संकल्पना असतात. या काळात करिअरसोबतच खिशात चार पैसे जमवण्याचा सर्वशक्तीनिशी प्रयत्न केला जातो. त्याविषयी..

बारावीनंतर कोणता कोर्स करायचा आहे यावर सुट्टी कशी आणि कुठे घालवायची हे ठरवले जाते. हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घ्यायचं असेल तर त्याची घरातूनच सुरुवात केली जाते. सकाळी लवकर उठून आईकडून पोळ्या करायला शिकण्यापासून ते अगदी पाटय़ावर वाटण काढण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट स्वत:च करायची अशी सवय अंगी बाणवली जाते.

यूटय़ूबवर बघून नवनवीन ‘रेसिपिज्’ तयार केल्या जातात. कृषिक्षेत्रात करिअर करू इच्छिणारे तरुण शेतीत लक्ष घालतात. त्याचा अभ्यास करण्यात वेळ घालवतात. बीएमएम, सीए होऊन काम मिळवण्यासाठी अनुभवाची गरज असते. त्यामुळे कंपन्या आधी इंटर्नशिप करायला सांगतात. मात्र पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर इंटर्नशिप करण्यासाठी आवश्यक तितका वेळ नसतो. शक्य तितक्या लवकर अर्थार्जन सुरु होणे आवश्यक असते. या सगळ्या गोष्टींचा विचार आधीच करून ठेवणे फायदेशीर ठरते. त्यामुळे एखाद्या सीएच्या, वर्तमानपत्राच्या, वृत्तवाहिनीच्या, ऑनलाइन पोर्टलच्या किंवा पीआरच्या कार्यालयात इंटर्नशिप करण्याला तरुण मुले प्राधान्य देतात. मित्रमैत्रिणींच्या ओळखीतून एखाद्या सिनेमाच्या सेटवर प्रवेश करता येईल का, असाही विचार केला जातो. स्पॉटबॉयपासून, साहाय्यक दिग्दर्शक, कॅमेरा साहाय्यक यांसारख्या कामांमध्ये तरुण मुले स्वत:ला गुंतवून घेतात. यातून थोडय़ाफार पॉकेटमनीची सोय होते. शिवाय सेटवरची धमाल अनुभवता येते. नवनवीन ओळखी होतात. करिअरला दिशा मिळते आणि सुट्टी सत्कारणी लागते. बारावीनंतर किंवा पदवीनंतर सुरक्षा दलांमध्ये सहभागी होण्याची इच्छा असलेली तरुण मंडळी आपल्या सुट्टीचा पुरेपूर फायदा करून घेतात. सकाळी धावायला जाणे, सायकल चालवून किंवा रशीउडय़ा मारुन उंची वाढवणे अशा कृतींमधून शारीरिक क्षमता वाढवली जाते.

काही कामे अशी असतात ज्यात करिअरपेक्षाही इतर गोष्टींना महत्त्व दिले जाते. विशेषकरून संभाषण कौशल्य सुधारण्यावर भर दिला जातो. मॉलमध्ये किंवा रस्त्यावर उभे राहून एखाद्या उत्पादनाची जाहिरात करणे, सीसीडी, मॅकडोनाल्ड यांसारख्या ठिकाणी काम करणे असे अनेक नवनवीन पर्याय तरुण मुले शोधून काढतात. काही जण सकाळी पेपर टाकायला जाण्याचेही काम करतात. गॅरेजमध्ये काम करणे हासुद्धा एक पर्याय आहे. सध्या ग्राफिक डिझाइनिंग, अ‍ॅनिमेशन, साऊंड इंजिनीअरिंग, एडिटिंग या विषयांचे आकर्षण तरुण मुलांमध्ये वाढते आहे. उन्हाळी सुट्टीमध्ये या अभ्यासक्रमांवर विशेष सवलतीही दिल्या जातात. त्यामुळे या गोष्टी शिकून आपला कल समजून घेण्याचीही आवड काही जणांना असते.

काही तरुण मुले-मुली स्वत: काही शिकण्यापेक्षा इतरांना शिकवण्याला महत्त्व देताना दिसतात. चित्रकला, नृत्य, हस्तकला, खेळ, वाद्य वादन, इत्यादी अनेक गोष्टींच्या छंदवर्गाना लहान मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतो. तरुण मुले या वर्गाकडे संधी म्हणून पाहतात. आपल्याकडे असलेली कला लहान मुलांना शिकवण्यात त्यांना आनंद मिळतो. काही जण तर मोफत छंदवर्गही चालवतात. यामुळे स्वत:चा सराव होतो व इतरांना ज्ञान देण्याचा आनंद मिळतो. याशिवाय गिर्यारोहण, खाद्यभ्रमंती करून आपल्या ब्लॉगद्वारे त्याचा प्रसार करण्याची आवडही बऱ्याच जणांना असते. काही असे असतात की, त्यांना उन्हातान्हात बाहेर भटकणं आवडत नाही. पण मग घरातल्या वेळाचा सदुपयोग करण्यासाठी भरपूर वाचन-लेखन केले जाते.

उन्हाळी सुट्टीतील अनुभव हा तरुण मंडळींसाठी जणू एक खजिना असतो. कॉलेज सुरू झाल्यावर विविध औपचारिक-अनौपचारिक चर्चासत्रांमध्ये ही मंडळी आत्मविश्वासाने मुद्दे मांडू शकतात. कारण सुट्टीत त्यांनी नव्या गोष्टी पाहिलेल्या असतात, अनुभवलेल्या असतात. त्यातून त्यांच्या विचारांना दिशा मिळालेली असते.

चंद्रपूरमध्ये युवा छावणी

साने गुरुजी स्मारक ट्रस्टसारख्या संस्थांमध्ये वर्षभर तरुणाईसाठी विविध शिबिरे घेतली जातात. चंद्रपूरच्या आनंदवनमध्ये होणारी युवा छावणी जशी प्रसिद्ध आहे तशीच कोकणातील वडघर येथे होणारी साने गुरुजी स्मारक ट्रस्टची युवा छावणीही प्रसिद्ध आहे. यामध्ये दरवर्षी महाराष्ट्राच्या विविध भागातून तरुण मुले सहभागी होतात. तरुणांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्याच भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न गेली २० वर्षे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या युवा छावणीतून होतो आहे, असे व्यवस्थापक सतीश शिर्के यांनी सांगितले.

सह्य़ाद्रीचं वारं सर्वानाच पेलतं असं नाही. पण ज्याला ते वारं एकदा लागलं त्याला ते कधीच सुटत नाही. गड-किल्ल्यांची भटकंती करायची आणि त्याचे वर्णन नंतर लेखाद्वारे करून सुट्टीत घरात बसलेल्यांनाही वाचनानंद द्यायचा. त्यामुळे त्यांनाही भटकंतीची ओढ लागेल. सुट्टीत फिरायचं, नवीन जागेला भेट आणि त्या जागेची माहिती मिळवणे यात वेगळीच मजा आहे.

– धनंजय आंबेरकर

अभिनय क्षेत्राची आवड असल्यामुळे यंदाच्या उन्हाळी सुट्टीत शिबिरांपुरते मर्यादित न राहता स्वत:चा अभिनय अधिक चांगल्याप्रकारे कसा करता येईल या दिशेने प्रयत्न करेन. अभिनय क्षेत्रात आजवर चांगली कामगिरी केलेल्या कलाकारांची भेट घेऊन त्यांच्याकडून अभिनयाचे धडे गिरवत त्या अभ्यासाचा मानस आहे.

– गार्गी घेगडमल 

आत्मनिर्भर बनवणारी उन्हाळी शिबिरे अनुभवायलाच हवीत. शिबिरात साहस, विज्ञान, कला, मनोरंजन यावर आधारित उपक्रम असावेत. रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, लाठी-काठी, फायर फायटिंग या साहसी प्रकारांबरोबरच मातीकाम, पेंटिंग, नाटय़ असे कलेचे प्रकारही उपक्रम म्हणून ठेवण्यात यावेत. शिबिरांमुळे कल्पनाशक्ती आणि जिज्ञासा वाढते. 

– नाजुका सावंत

शाळेत असताना उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे फक्त गावी जाणे, आंबे-फणस खाणे इतकेच असायचे. मात्र नंतर वेळेचे महत्त्व पटू लागते. तेच महत्त्व मी उन्हाळी सुटीलाही देते. पत्रकारिता विभागाच्या प्रथम वर्षांला शिकत असल्याने प्रत्यक्ष अनुभवासाठी  वृत्तपत्रात इंटर्नशिप करणार आहे.

– मयूरी कदम