22 April 2019

News Flash

वारंवार होणारे सर्दी-पडसे

सर्दी-पडसे हा विकार किरकोळ वाटणारा असला तरीही आपल्याला निश्चितपणे अस्वस्थ करणारा ठरतो.

|| वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक

सर्दी-पडसे हा विकार किरकोळ वाटणारा असला तरीही आपल्याला निश्चितपणे अस्वस्थ करणारा ठरतो. अनेक जण याकडे दुर्लक्ष करताना आढळतात. किरकोळ स्वरूपात सर्दी असतानाच तिचा प्रतिकार करणे हे वस्तुत: आवश्यक असते. सर्दी-पडशाकडे दुर्लक्ष केल्यास याचे चिरकारित्व वाढते आणि अधूनमधून ऋतू बदलण्याच्या वेळेस तसेच काही किरकोळ कारणे घडली तरी हा रोग निर्माण होतो, बळावत जातो.

सर्दी-पडशाची कारणे :

अनेकांना वर्षभर फ्रिजमधील गार पाणी पिण्याची सवय असते. नेहमीची ही सवय सर्दी-पडसे निर्माण करू शकते. आइसक्रीम, शीतपेये यांचा अवेळी किवा वाजवीपेक्षा जास्त वापर केल्यास सर्दी-पडशाचा त्रास होऊ  शकतो. बऱ्याच जणांना रोज डोक्यावरून थंड पाण्याने स्नान करण्याची सवय असते. यामुळेही काहींना वारंवार सर्दीचा त्रास होताना आढळतो. दुपारचे जेवण झाल्यावर लगेच काही वेळ झोपणे यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते. रात्री दही खाण्याची सवय आणि सर्दीचा निकटचा संबंध आढळतो. दही हा आपल्या शरीरामध्ये स्राव वाढवणारा असा पदार्थ आहे. नेहमी रात्री दही खाणे हे सर्दी-पडशाला एक मोठे कारण आहे.

रात्री झोपताना पाणी पिणे आणि सकाळी उठल्यावर अनाशापोटी पाणी पिणे अशी सततची सवयदेखील सर्दीचा त्रास निर्माण करू शकते. थंडीच्या दिवसांत दुचाकीवर बसून प्रवास करताना काळजी न घेतल्यास गार वारा लागून त्याचाही त्रास होऊन सर्दी-पडसे होऊ शकतो.

सतत वातानुकूलित सान्निध्यात राहिल्याने नेहमी सर्दी होते. धुळीला असणारी असात्म्यता (अलर्जी) हेही यामध्ये कारण घडते. अशा प्रकारे नेहमी कारणे घडल्यास सर्दी-पडशाचा विकार नेहमी होतो आणि तो चिरकाल अवस्थेला जातो. सर्दीने बेजार झालेल्या काही व्यक्तींचे नाक चोंदलेले असते. काहींमध्ये सतत नाकातून पाणी वाहण्याचा त्रास आढळतो.

उपचारांची दिशा :

  • आयुर्वेद शास्त्रानुसार या विकारावर योग्य ती चिकित्सा करता येते. मध हे द्रव्य कफदोषामुळे होणाऱ्या सर्दीवर अत्यंत उपयुक्त आहे. त्याचा वापर त्यामध्ये उपयुक्त ठरतो.
  • रात्री झोपताना व सकाळी उठल्यावर अनाशापोटी थंड पाणी पिण्याची सवय ज्यांना आहे आणि ज्यांना सर्दीचा त्रास होतो अशांनी ही सवय हळूहळू बंद करावी.
  • सुंठ हे सर्दीसाठी चांगले औषध आहे. त्याचप्रमाणे आल्याचा रसही यावर उपयुक्त ठरतो. आयुर्वेदशास्त्राने सांगितलेली नागगुटी, त्रिभुवन कीर्ती यांसारखी औषधेही सर्दीवर उपयुक्त ठरतात. अर्थात हे प्रत्येकाची प्रकृती पाहून ठरवावे लागते. तेव्हा ही औषधे घेण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा. जुनाट सर्दी-पडशावर उपयुक्त ठरणारे आणखी दोन प्रकारच्या आयुर्वेदिय चिकित्सांचा उपयोग होतो. पहिले नस्य व दुसरे वमन.यासाठी या सर्व गोष्टींची नीट माहिती करून घेऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा.

ayurvijay7@gmail.com

First Published on February 12, 2019 2:45 am

Web Title: common cold