‘शास्त्र’ असतं ते.. : डॉ. मनिषा कर्पे मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग

वयानुसार केस विरळ होणे, पांढरे होणे/ पिकणे हे सर्वसामान्य लक्षण आहे, परंतु शालेय किंवा महाविद्यालयीन वयात केस पिकणे/पांढरे होणे हे त्रासदायक ठरते. आपल्या त्वचेमध्ये इपीडर्मिस आणि डर्मिस असे दोन स्तर असतात. यापैकी डर्मिस या स्तरामध्ये केसकोशिका (हेअर फॉलिकल) असतात. या हेअर फॉलिकलमध्ये केसांना काळा रंग आणणारे मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य असते. काही कारणांमुळे मेलॅनिन स्रवणे कमी होते किंवा थांबते, परिणामी केस पिकण्यास सुरुवात होते.

आई-वडील, आजी-आजोबा यांचे केस जर त्यांच्या तरुणवयात अकाली पिकलेले असतील तर तो गुणधर्म त्यांच्या पुढच्या पिढीत संक्रमित होतो. रोजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढलेला ताणतणाव, अ‍ॅलर्जी, व्हिटॅमिन ई-१२ची कमतरता, धूम्रपान हीसुद्धा केस पिकण्याची कारणे आहेत.

कुरळे केस की सरळ केस?

आई-वडील यांचे केस सरळ असले तरी मुलांचे केस कुरळे असू शकतात किंवा दोन भावंडांमध्ये एकाचे केस कुरळे तर एकाचे केस सरळ असू शकतात. केसकोशिकेमधून (हेअर फॉलिकल) बाहेर येणारे केस सरळ असणार की कुरळे हे त्या कोशिकांमध्ये असणाऱ्या  ट्रायकोहयालिन, सी यू टी सी प्रथिन (प्रोटीन), केराटीन प्रोटीन या रसायनांवर अवलंबून असते. या रसायनांच्या प्रमाणावर क्रोमोसोमवरील (गुणसूत्रांवरील) जीन्सचे  (जनुकांचे) नियंत्रण असते. आणि ही जनुके एकतर आजी किंवा आजोबा नाहीतर आई किंवा वडील यांच्याकडून मुलांमध्ये येतात.