16 October 2019

News Flash

घरचा आयुर्वेद : मलावरोधाचा त्रास

अनियमित भोजन हेदेखील मलावरोधाचे एक प्रमुख कारण आहे.

वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक ayurvijay7@gmail.com

सकाळी उठल्याबरोबर पोट साफ होत नाही, अशा प्रकारची तक्रार घेऊन अनेक रुग्ण वैद्यकीय सल्लागाराकडे जातात; किंबहुना अनेकदा दुसऱ्याच एखाद्या शारीरिक तक्रारीची प्रश्नोत्तररूपाने तपासणी करताना पोटाची तक्रार ही लक्षात येते. या तक्रारीला मलावरोध असे सर्वसाधारणपणे संबोधले जाते. मलावरोध होण्याची कारणे अनेक आहेत आणि मलावरोध हेदेखील अनेक रोगांना कारण होऊ  शकते. बऱ्याच जणांमध्ये आढळणारा हा मलावरोध प्रत्येकानेच समजून घेतल्यास त्यासंदर्भात टाळता येण्यासारख्या अनेक गोष्टींबद्दल मार्गदर्शन मिळू शकेल.

मलावरोधाची कारणे : काही व्यक्तींमध्ये निसर्गत: मलावरोधाची सवय असते. या व्यक्तींचा कोठा जड आहे, असे म्हटले जाते. अशा व्यक्तींच्या एकूणच शरीरात स्निग्धता कमी असते. त्यांचा कोठाही त्यास अपवाद नसतो. त्यामुळे त्यांच्या मलाला एक प्रकारचा कोरडेपणा येतो. मल आतडय़ातून पुढे नीट सरकत नाही. त्यामुळे मलप्रवृत्तीच्या वेळी बराच वेळ या व्यक्तींना बसावे लागते.

मलावरोधाचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे कोरडे पदार्थ सतत खाण्याची सवय हे होय. कोलेस्ट्रोल वाढेल या वृथाभीतीमुळे साजूक तुपाचा आहारातील वापर कमी होत चाललेला अनेक जणांच्या बाबतीत दिसत आहे. आहारामध्ये योग्य तेवढा स्निग्धांश नसणे हे मलावरोधाचे मोठे कारण आहे. नोकरी करणारी मंडळी दुपारचे जेवण डब्याच्या स्वरूपात ऑफिसमध्ये नेतात, त्या डब्यामध्ये कोरडे पदार्थ अधिक प्रमाणात खाण्यात आले तर त्या व्यक्तींना मलावरोधाचा विकार होण्याचा संभव असतो.

अनियमित भोजन हेदेखील मलावरोधाचे एक प्रमुख कारण आहे. आपल्या भोजनाच्या वेळा नियमित असणे हा केवळ आदर्शवाद नव्हे तर व्यवहारात पाळणेही आवश्यक आहे. भोजनाच्या वेळा अनियमित असल्यास आतडय़ांना शिस्त लागत नाही आणि मलप्रवृत्तीच्या वेळांमध्ये बदल होण्याचा संभव निर्माण होतो. नियमित वेळी मलप्रवृत्ती होत नाही.

कॉफी पिण्याचे अतिप्रमाण हेही काहींमध्ये मलावरोधाचे कारण ठरते. या व्यक्तींना दिवसातून ४-५ कप किंवा त्यापेक्षाही अधिक कॉफी पिण्याची सवय असते. कॉफी हे पेय आपल्या आतडय़ांच्या दृष्टीने तितकेसे चांगले नाही. त्याचे अतिसेवन तर कधीही होता कामा नये.

उपचारांची दिशा : मलावरोधाचा त्रास होणाऱ्यांनी आपला आहार सर्वप्रथम तपासावा. त्यामध्ये स्निग्धांश, कोरडेपणा आणि पाणी पिण्याचे प्रमाण किती असते या गोष्टींचा पडताळा घ्यावा. रात्री एक कपभर गरम दूध आणि त्यामध्ये १ चमचा साजूक तूप घालून सेवन केल्यास मलावरोधाची तक्रार दूर होते. अर्थात कफाचे विकार (उदा. खोकला, दमा इ.) ज्यांना होतात अशांनी या संदर्भात दूध घेताना वैद्यकीय सल्ला घेतल्यास उत्तम.

त्याप्रमाणे त्रिफळा चूर्ण हे अर्धा ते एक गॅ्रम या प्रमाणात रात्री कोमट पाण्यातून घेतल्यासही फायदा दिसतो. अर्थात ही मात्रा वैद्यकीय सल्लय़ाने ठरवून घ्यावी लागते. शक्यतो विरेचन करणारी चूर्ण वैद्यकीय सल्ल्याशिवाय स्वत: घेण्याचे टाळावे. अनेक जणांना कोणालाही न विचारता विविध प्रकारचे चूर्ण पोट साफ होण्यासाठी घेण्याची असलेली विचित्र सवय घातक ठरू शकते. तेव्हा त्याबाबत सल्ला घेणे हे श्रेयस्कर होय.

आयुर्वेदाची बस्ती चिकित्सा : मलावरोधाचा कायम त्रास होणाऱ्यांना बस्ती चिकित्सा ही अतिशय मोलाची ठरते. यामध्ये गुदावाटे काही विशिष्ट औषधी तेल किंवा काढे प्रविष्ट केले जातात, जेणेकरून आतडय़ातील कोरडेपणा नाहीसा होऊन त्यांच्या पुर:सरण गतीला चालना दिली जाते. आतडय़ात मल साठलेला असल्यास तोही बाहेर काढण्यासाठी या बस्ती विधीचा उपयोग होतो.  काही वेळेला मलावरोध ही तक्रार अचानकपणे उद्भवते. आतडय़ाच्या पुर:सरण गतीला अचानक अडथळा निर्माण होतो आणि ५-६ दिवस शौचाला झाली नाही की मग त्याची तीव्रता एकदम ध्यानात येते. बस्ती चिकित्सेने यामध्ये फायदा न झाल्यास शल्यविशारदाचा सल्ला घ्यावा लागतो.

First Published on April 23, 2019 2:59 am

Web Title: constipation causes symptoms and treatments