डॉ. अविनाश सुपे

भारतातील जवळजवळ १५ ते २० टक्के व्यक्तींना बराच काळ बद्धकोष्ठ (क्रोनिक कॉन्स्टिपेशन) असते. जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधीतरी बद्धकोष्ठ झालेला असतो. परंतु तो सहसा गंभीर नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आतडय़ाची हालचाल वेगवेगळी असते. काही व्यक्तींमध्ये आतडय़ाची हालचाल दिवसातून तीन वेळा होते. इतरांमध्ये  दिवसातून फक्त एकदा किंवा दोनदा, तर काहींमध्ये आठवडय़ातून दोन वेळा पण असू शकते. अलीकडे वाढते जंक फूड, दारू, अति खाणे, धुम्रपान इत्यादीमुळे याचे प्रमाण वाढले आहे.

बद्धकोष्ठ म्हणजे काय?

दररोज संडासला न होणे, संडास अतिशय कडक असल्यामुळे तो पुढे न सरकणे, संडास करण्यासाठी कुंथायला लागणे, संडास करून झाल्यावरही संडास करण्याची भावना तशीच राहणे म्हणजे संडास साफ झाली नाही असे वाटणे.

बद्धकोष्ठ होण्यामागची कारणे

* जेवणात तंतुमय पदार्थाचा अभाव असणे.

*  व्यायामाचा अभाव- सर्व भौतिक सुखसोईंमुळे सध्या शारीरिक हालचाली फारच कमी प्रमाणात होतात. त्याला रोज नियमित व्यायामाची जोड देणे आवश्यक आहे. शरीरास व्यायाम नसल्याने पोटातील पचलेले/न पचलेले अन्न पुढे सरकायला खूपच वेळ लागतो आणि बद्धकोष्ठ संभवतो.

*  ताणतणाव- सध्याच्या धावत्या बदलत्या जीवनशैलीमुळे ताण निर्माण होत असून परिणामी शरीरात संप्रेरक (हार्मोन्स) स्रवली जातात. ज्यांचा परिणाम आतडय़ांच्या हालचालींवर होऊन त्या मंदावतात. त्यामुळे पोटात गच्च वाटणे, ढेकर येणे, पोटात गॅस गुरगुरणे इत्यादी तक्रारी सुरू होतात.

*  गरोदरपण- यामध्ये पोटातील जागा ही वाढत्या बाळाने व गर्भाशयाने व्यापली गेलेली असल्याने आतडय़ाच्या कामात थोडा अडथळा उत्पन्न होतो आणि बद्धकोष्ठाचा त्रास सुरू होतो.

*  संडास रोखून धरणे- काही वेळेस अपरिहार्य कारणांमुळे एखादी व्यक्ती शौचाची भावना रोखून धरते. त्यानंतर निर्माण झालेला संडास कडक होऊन बद्धकोष्ठ होऊ  शकते.

*   गुदद्वाराच्या जागी असलेले मोड वा फिशर किंवा मूळव्याध- यामुळे संडास करताना दुखते किंवा रक्तस्राव होतो. त्यामुळे संडास रोखला जातो व बद्धकोष्ठता होते.

काही औषधांचे दुष्परिणाम, अपचनासाठी घेण्यात येणारी औषधे, हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेहाच्या तक्रारीसाठी घेण्यात येणारी काही औषधे, कॅल्शिअम किंवा रक्तवाढीसाठी देण्यात येणारे टॉनिक यामुळे बद्धकोष्ठाचा त्रास होतो.

वयोमानाप्रमाणे किंवा मज्जारज्जू संस्थेच्या आजारामुळे आतडय़ाची हालचाल कमी होते व संडास पुढे सरकत नाही.

*  तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

*  नव्यानेच उद्भवलेले बद्धकोष्ठ.

*  आहारात बदल करून, नियमित व्यायाम करूनही बद्धकोष्ठाचा त्रास सुरूच असणे.

*  कधी कडक तर कधी पातळ संडास लागोपाठ सुरू राहणे.

*  संडासातून रक्त पडणे.

* बद्धकोष्ठाबरोबर पोटात तीव्र कळा येणे.

बद्धकोष्ठावरील उपाय

*  आहार सुधारा- जेवणात भाकरी, चपाती, हातसडीचे तांदूळ, फळ, पालेभाज्या, कोशिंबीर यांचा अंतर्भाव करा. हे तंतूमय पदार्थ पचन सुलभ बनवतात. पाणी शोषून धरतात त्यामुळे संडास मऊ  राहून उत्सर्जनाची प्रक्रिया सुकर होते. चीज, बटाटे, ब्रेड यांसारखे पदार्थ प्रमाणात घ्यावे. आहारात गरम दूध, तूप, फळांचे रस घ्यावेत.

*  नियमित व्यायाम व फिरायला जावे

*  पोटाचे व्यायाम करावेत.

*  भरपूर पाणी प्यावे

*  ताणतणाव टाळा- ध्यान व शवासन यांसारख्या मन व शरीराला विश्रांती देणारे व्यायाम शिकून करावेत.

संडासला मऊ  होण्यासाठी काही औषधे डॉक्टरी सल्ल्याने घ्यावीत. आयुर्वेदामध्ये त्रिफळा चूर्ण, चिंचेचे पाणी व कोरफड, सिलियम यांसारख्या वनस्पती उपयुक्त असतात. अ‍ॅलोपॅथीमध्ये इसाप्गोल, प्याराफिन किंवा इतर औषधे उपयुक्त असतात. बऱ्याचदा ही औषधे नेहमी घेतली जातात व त्याची सवय होते. कालांतराने जास्त डोस घ्यावा लागतो. हे टाळावे आणि अशा वेळी डॉक्टरी सल्ला घ्यावा.