वास्तुरंग : प्राची पाठक

स्वयंपाकघरामध्ये किती भांडी असावीत याचं काही गणित नाही. ‘‘आम्ही चमच्यापासून संसार उभा केला,’’ असे सांगणारे सध्या साठीत असणारे अनेक लोक आहेत. ते त्यांच्या दृष्टीने खरंदेखील असतं. खूप कष्टातून, अभावातून त्यांची घरं उभी राहिलेली असतात. मात्र, आज त्यांच्याच घरांमध्ये डोकावून पाहिलं तर लागतील- लागतील करत भांडीच भांडी घरात जमा झालेली दिसतात. दुसरीकडे, नवीन पिढीत एखाद् दोनच मुलं असल्याने, अगदी तयार घरसंसार त्यांच्यासाठी उपलब्ध असतात. त्यांच्याकडे घरातली जुनाट भांडी काढून किंवा माळ्यावर टाकून आधुनिक पद्धतीची महागडी भांडी घेण्याचा कल दिसून येतो. त्यामुळे होतं असं की, जुनं तेही पडून राहतं आणि नवीन भांडय़ांमध्ये जे तकलादू असतं ते तुटून, फुटून, नादुरुस्त होऊन करू नीट कधीतरी म्हणून साचत जातं. या घरांमध्ये जुने तवे आणि नवे तवे, जुने कुकर ते नवे कुकर इतका जरी आढावा घेतला, तरी लगेच साचत जाणारी भांडी आणि स्वयंपाकघरात येणाऱ्या भांडय़ांचा फॅन्सी ट्रेंड लक्षात येईल. विविध मॉल्स, परदेशी कुक वेअरची सहज उपलब्धता, जाहिरातींचा प्रचंड मारा यामुळेदेखील घराघरातली भांडी बदलत जाताना दिसतात. पातेली, तवे, उलटणे, चमचे, भाताळे, तव्यावर तेल पसरविण्यासाठी आलेले वेगवेगळ्या मटेरिअलचे चमचे असं बरंच काही बदलत जाताना सध्या दिसत आहे.

यातील काही गोष्टी खरोखर खूप कामाच्या असू शकतात. त्यातून जुन्या गरसोयीच्या गोष्टी बदलल्या जातात. कामात सोय वाढते. म्हणजे, एखादी विळी बाजूला पडून कमी वापरली जाऊन जेव्हा चाकू-सुरी सहज वापरात येते, तेव्हा विळी ही अनेक घरी समृद्ध अडगळ म्हणून पडून राहते. त्याला भलेही चिरणे आणि कापणे यात फरक असतो वगरे नावं देता येतील. ‘‘आम्ही कशी आजही विळीच वापरतो’’, असा अस्मिता गट त्यातून तयार होऊ शकतो. तरीही कालांतराने सुरीची सरशी होते, कारण ती जास्त सोयीस्कर असल्याचे घरोघरी रुजत जाते. अर्थात प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा. स्वयंपाकघरात जास्त करून वापरला जाणारा आजचा नाकतोडय़ासमान भासणारा, आडवा वापरायचा चिमटा आणि कालची उभी वापरायची सांडशी यांच्या वापरातदेखील घरोघरी फरक पडलेला जाणवतो. सांडशीचेदेखील दोन्हीकडून गोल, मग एका बाजूने सरळ आणि एका बाजूने गोलाकार असे डिझाइन्स बदलत गेलेले दिसतात. पाण्याची गडवी, तांब्या, जग वगरे भांडी माळ्यावर जाऊन बसतात. कारण फ्रिजमध्ये, स्वयंपाकघराच्या ट्रॉल्यांमध्ये वेगवेगळे फॅन्सी पेले, ग्लासेस, बाटल्या आलेल्या असतात. साधी पाण्याची बाटली. तिच्याही डिझाइन्समध्ये तिच्यातून पाणी पिता येण्याच्या सोयींमध्ये किती वेगवेगळे मॉडेल्स आलेले दिसतात बाजारात. स्वयंपाकघरातली ही बदलत जाणारी भांडी, त्यांचे बदलते आकार-प्रकार आणि रंग गेल्या काही वर्षांमध्ये प्रकर्षांने जाणवत आहेत. भारतात जेवणासाठी स्टीलची ताटं आजही मोठय़ा प्रमाणात वापरली जातात. तुमची वर्दी मध्यमवर्गातून जराशा उच्च मध्यमवर्गात लागली की स्टीलच्या ताटात आपल्याच घरात जेवणं अतिशय डाऊन मार्केट वाटणारी मंडळी तयार होतात. त्यांना हॉटेलसारखं सगळं हवं असतं. भलेही ते हाताळायला, धुवायला, सांभाळायला, ठेवायला कठीण असलं तरी! अर्थात, यात ज्याची त्याची निवड हा मुद्दा आहेच. असं करू नाही, असंही काही नाही. मुद्दा इतकाच आहे की, आधीच्या अंगवळणी पडलेल्या गोष्टी अचानक डाऊन मार्केट वाटून नकोशा होतात. त्या खराब तर नसतात. त्यामुळे, टाकून दिल्या जात नाहीत. नवीन वस्तू आधीच येऊन पडलेल्या असतात. असं करून करून घरात वेगवेगळ्या प्रकारची भांडी वाढतच जातात. जे लोक ते जुनंच वापरत असतात, त्यांच्या स्टेटस्ची जोखणी अशा गोष्टींमुळे होऊन त्यांच्यावरदेखील वस्तूंमध्ये बदल करायचा, नवीन वस्तू विकत घेऊन ठेवायचा दबाव येत जातो. मग ते एरवी स्टीलच्या ताटात जेवतात; परंतु आल्या गेल्याला वेगळ्या पोस्रेलीन, मेलामाईन वगरे मटेरिअलचे डिनर सेट ठेवणीत राखून ठेवतात! एरवी ते वापरायची सवयच नसल्याने सेट्स आल्या गेल्याची वाट पाहत घरात पडून राहतात.

घरात माणसं किती आणि त्याच घरात असलेले प्रेशर कुकर्स आणि त्यांचे वेगवेगळे प्रकार किती, त्यांची भांडी किती, असाही एखादा गमतीशीर सव्‍‌र्हे होऊ शकतो. अनेक घरांमध्ये जराशा कुरबुरींसाठी एकेकदा प्रेशर कुकर्स माळ्यावर टाकले जातात. सुरुवातीला जुजबी दुरुस्त होतात. तरीही सोय झाली नाही तर करू कधीतरी दुरुस्त, सध्या तर वेळ वाचला पाहिजे, करत नवीन वस्तू चटकन घरात येते. जुने कुकर्स पडून राहतात. मग बाजारात आणखीन नवीन काही दिसतं. आपल्याला ते आवडतं. लगेच ते विकत घेतलं जातं. जुन्या कुकरची भांडी, त्यांचे स्पेअर पार्ट्स, तुटलेले हॅन्डल्स वगरे सर्व कुठेतरी कामास येईल म्हणून जपून ठेवलं जातं. ते इतकं जपलेलं असतं की जेव्हा खरोखर कुठेतरी अशी वस्तू लागू शकेल असं वाटतं तेव्हा ती वस्तू काही केल्या सापडत नाही! कुकरच्या शिट्टय़ा, त्यांच्या रिंगस, त्यांचे वॉशरदेखील असेच पडून राहतात. नवीन कुकर्स येत राहतात. काही कुकर्स हे खासकरून जास्त लोकांच्या आल्या गेल्याच्या स्वयंपाकासाठी ठेवलेले असतात. एरवीच्या वापरात लहान कुकर्स घेतले जातात. जे लहान-मोठे कुकर असतात, त्यात जरा काही बिघडलं तर आणखीन नवा कुकर घरात येऊन पडतो. प्रेशर कुकर या शब्दाचा अर्थही जाणून न घेता घरोघरी ज्या कुकरच्या शिट्टय़ांचे आवाज येत राहतात. यामुळे त्याचा शोध लावणारा माणूस कायम दु:खी होत असणार. वाफेवर अन्न शिजवायचं आहे ते वाफ दवडून नाही, हे कितीही सांगितलं तरी थोडक्याच लोकांना कळतं. घरोघरी कुकरच्या शिट्टीच्या रूपाने वाफ बाहेर टाकली जाऊन जास्त गॅस वापरून कुकर लावला जातो हा एक वेगळाच मुद्दा. म्हणजे घरात जी भांडी आहेत, ती नेमकी कशी वापरायची, कशी दुरुस्त करायची, याची फारशी माहिती नसताना केवळ काम अडलं, गरसोय झाली या निकषांवर नवनवीन सामान स्वयंपाकघरात येऊन पडतं. तुमचेही असे अनुभव जरूर लिहा आम्हाला. पुढील भागात स्वयंपाकघरातील आणखीन समृद्ध अडगळीबद्दल वाचू या!

prachi333@hotmail.com