23 January 2021

News Flash

धाक नको, दक्षता घ्या..

नवोदित लेखक निनाद वाघ म्हणतो, की समाजमाध्यमांवर पोस्ट केलेले स्वत:चे लेखन सुरक्षित नाही

भक्ती परब

कुठे मंदिरात, सार्वजनिक ठिकाणी फलकावर ठसठशीत शब्दांत सूचना लिहिलेल्या असतात.. खिसेकापूंपासून सावध राहा. आपल्या मौल्यवान वस्तू जपून ठेवा..इत्यादी, इत्यादी. सध्या समाजमाध्यमांवरील गर्दीत अशी खबरदारी घेण्याची हाळी दिली जात आहे. कारण समाजमाध्यमांवर एखाद्या रुळलेल्या वा नवोदित लेखकाचा लेख वा कविता कधी, कुणी आणि कसे स्वत:च्या नावावर खपवेल याचा नेम नाही. त्यामुळे समाजमाध्यमांवर लिहिणाऱ्यांनी केवळ ‘सी’ कॉपीराइट चिन्हाचा धाक न दाखवता ‘कॉपीराइट रजिस्ट्रेशन’ करण्याचा सल्ला समाजमाध्यमांवरील जाणत्यांनी दिला आहे. त्याविषयी..

अलीकडे समाजमाध्यमांवर एखादा मजकूर शेअर वा फॉरवर्ड करताना ‘कॉपीराइट मार्क’ (स्वामित्व हक्काचे चिन्ह) वापरले जाते. त्याचा अर्थ नेमका काय, त्याचा फायदा कितपत होतो, याविषयी ऑनलाइन माध्यमात जागृती व्हायला हवी. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारखी समाजमाध्यमे आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही संवाद साधायचा असल्यास अतिशय उपयुक्त आहेत. त्याचबरोबर माहितीची आणि विविध विचारांची देवाणघेवाण करण्यातही ही माध्यमे अग्रेसर आहेत. तत्पर आहेत. या माध्यमांवर अनेक छान छान लेख, कविता आपल्याला वाचायला मिळतात. कधी कधी ज्याने लेख वा कविता लिहिली आहे, त्याच्या नावासहित आपल्याला हे फॉरवर्ड (अग्रेषित) केलेले साहित्य वाचायला मिळते. तर कधी कुणाचे नाव वगैरे खाली लिहिलेले नसतानाही अनेक लेख या समाजमाध्यमांवर फिरत असतात. अलीकडे तर ‘सी’ असा उल्लेख केलेले ‘कॉपीराइट मार्क’ समाजमाध्यमांवर पोस्ट करताना वापरले जाऊ लागले आहे.

याविषयी ‘इन मराठी डॉट कॉम’ या ‘डिजिटल मीडिया पोर्टल’चे संस्थापक ओंकार दाभाडकर म्हणाले, कॉपीराइटचा मार्क टाकला की स्वामित्व हक्क कायद्याअंतर्गत संरक्षण मिळाले, असे होत नाही. मी स्वत: अशा माध्यमांतून लेखन शेअर करताना माझे नाव त्या लेखाखाली लिहितो. काही जण तो लेख वाचून तसाच फॉरवर्ड करतात. पण ज्यांना साहित्याचे चौर्य करायचे असते, ते मात्र मी लिहिलेले लेखाखालील नाव किंवा कॉपीराइटचे चिन्ह संकलित (एडिट) करून फॉरवर्ड करतीलच. वा आपले नाव त्याखाली टाकून मग शेअर करतील. अशा पद्धतीने झालेले वाङ्मय चौर्य शोधणे अवघड आहे. कॉपीराइटचे चिन्ह असलेला लेख कोणी फॉरवर्ड केला वा तो लेख आपला आहे, असे लिहून शेअर केला तर त्याला तुम्ही न्यायालयात खेचू शकत नाही. आमच्या संकेतस्थळावरचे लेख इतर काही संकेतस्थळे सर्रास चोरून स्वत:च्या संकेतस्थळावर टाकतात. त्यांच्यावर लक्ष कसं ठेवणार आणि कोणाविषयी तक्रार करणार, अशी स्थिती आहे. ही समस्या सध्या सर्वच डिजिटल माध्यमांना भेडसावते आहे.

व्यावसायिक लेखन करणारे लेखक आणि नवोदित लेखक यांना आपल्यातील लेखनकौशल्य दाखवण्यासाठी तसेच स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमांवर आपले लेखन पोस्ट करावे लागते. परंतु त्यांनाही साहित्य चोरीचा फटका बसतो आहे.

नवोदित लेखक निनाद वाघ म्हणतो, की समाजमाध्यमांवर पोस्ट केलेले स्वत:चे लेखन सुरक्षित नाही. त्यामुळे एखादा लेख वा कविता पूर्ण पोस्ट न करता त्यातील काही ओळीच तेवढय़ा पोस्ट करतो. त्यामुळे माझ्या लेखनाची एक झलक समाजमाध्यमांवरील वाचकांना मिळते. परंतु स्वत:चे लेखन पद्धतशीरपणे नोंदणीकृत करणे आवश्यक असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

समाजमाध्यमांवर बऱ्याचदा कविता चोरल्या जातात. अर्थात ही चोरी लेखांच्या तुलनेत अधिक असते. याचा फटका प्रसिद्ध कवी वैभव जोशी यांना सहन करावा लागला होता. ते म्हणाले, कॉपीराइट म्हणून चिन्ह टाकतो त्याला तसा काहीच अर्थ नसतो. कारण फॉरवर्ड करताना त्याखाली वापरलेले कॉपीराइटचे मार्क वा नाव डिलीट करता येते. दिवसभरात मला असे अनुभव खूपदा येतात. लेखन फॉरवर्ड होते. पण त्याचे क्रेडिट दिले जात नाही. यावर कुणाचेच बंधन नसते. एकदा एका व्यक्तीने माझी कविता पुस्तकात छापून आणली होती. पण ते मला जेव्हा कळले तेव्हा त्याला माझी कविता त्या पुस्तकातून काढून टाकायला मी भाग पाडले. मी कवितांचे जाहीर कार्यक्रम करतो. त्यामुळे मराठी रसिकांना माझ्या कविता ओळखीच्या आहेत. त्यामुळे कोणी माझ्या कवितांचे चौर्यकर्म केले तर काही रसिक ती बाब माझ्या निर्दशनास आणून देतात. परंतु पूर्ण कविताच चोरून कोणी स्वत:च्या नावाने फॉरवर्ड केली तर त्याला आपण काहीच करू शकत नाही.

आपण ‘पीडीएफ’ वा ‘जेपीजीई’ फॉर्ममध्ये टाकली तरीही ती कविता वाचून कोणीही ती कविता टाईप करून स्वत:चे नावे शेअर करू शकतो. त्यामुळे कविता पोस्ट करण्याआधी तिच्या स्वामित्व हक्काची रीतसर नोंदणी (कॉपीराइट रजिस्ट्रेशन) करा. नंतरच समाजमाध्यमांवर शेअर करा वा कविता शेअर करायची असल्यास कवितेतील दोन वा चार ओळीच तेवढय़ा शेअर करा. पूर्ण कविता पोस्ट करू नका, अशा पद्धतीने खबरदारी घ्यायला हवी, असे वैभव जोशींनी सांगितले. पण डिजिटल माध्यमावर चोरी थांबवता येत नाही.

डिजिटल माध्यमांवर लेखन पोस्ट वा शेअर करताना जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. फ्री-लान्सिंग करणाऱ्या लेखकांना स्वत:चे ब्रँडिंग करताना समाजमाध्यमांवर आणि ब्लॉगवर लेखन पोस्ट करावे लागते. अशा लेखकांना साहित्य चौर्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे पोस्ट केल्यावर चौर्यकर्म करणाऱ्यांना वचक बसावा, चोरी करताना थोडी भीती वाटावी म्हणून ‘सी’ हे इंग्रजी अक्षर वापरून लेखन पोस्ट केले जात आहे. पण त्यामुळे लेखनाला संरक्षण कवच मिळाले असे होत नाही, अशी माहिती सोशल मीडिया मार्केटिंग आणि डिजिटल माध्यमात कार्यरत ओंमकार कातुरे आणि राहुल वेळापुरे यांनी दिली.

गुगल सर्च इंजिनचा वापर करा

एखादी बातमी तशीच्या तशी शेअर केली तर चालते. पण माहितीपूर्ण वा ललित लेख आणि कथनात्मक लेख कोणी संकेतस्थळावरून कॉपी-पेस्ट केल्यास गुगल या ‘सर्च इंजिन’मुळे कळू शकते. ज्या संकेतस्थळांवर कॉपी केलेला मजकूर असतो. त्याला गुगल रँकिंग देताना कमी रँकिंग देणे वगैरे अशा पद्धतीने त्याला आळा घालते. तसेच संकेतस्थळांवर आणि समाजमाध्यमांवर पोस्ट करताना सेटिंग हा पर्याय निवडून सिक्युरिटी लावली तर काही प्रमाणात चौर्यकर्माला आळा बसू शकतो. परंतु समाजमाध्यमे ही मोफत उपलब्ध झालेली आहेत. त्यामुळे पोस्ट आणि शेअर होणारा आशयसुद्धा कुठल्याही कायद्याच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे अशा माध्यमांवर लेखन शेअर करतानाच सावधगिरी बाळगावी लागते.

‘कॉपीराइट मार्क’ने काही होणार नाही

‘बहुविध डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे संस्थापक किरण भिडे म्हणाले, समाजमाध्यमावरील लेखनाची चोरी करताना त्या व्यक्तीला घाबरवण्यासाठी कॉपीराइटचे चिन्ह वापरले जाते. पण ते वापरले म्हणजे, लेखन स्वामीत्व हक्कानुसार नोंदणीकृत होत नाही. लेखन समाजमाध्यमांवर आणि डिजिटल माध्यमावर सुरक्षित नाही, ही वस्तुस्थिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 3:11 am

Web Title: copyright registration on social media zws 70
Next Stories
1 स्वादिष्ट सामिष : करंदी डाळ वडा
2 योग : एक आकलन
3 योगस्नेह : शलभासन
Just Now!
X