करोना विषाणूचा प्रसार देशासह राज्यभरात झपाटय़ाने होत असल्याने सामाजिक दुरावा पाळणे, स्वयंकाळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र तरीही प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज काय, रोजच्या दिनचर्येमध्ये नेमके काय बदल करावेत याबाबत ठोस माहिती नसल्याने संभ्रमाचे वातावरण आहे.

करोनाच्या संसर्गाची लागण झालेल्यांपैकी ३० टक्के जणांना अतिदक्षता विभागाची आवश्यकता भासू शकते, असे अनुमान चीन, इटली या हाहाकार उडविलेल्या देशांमधील स्थितीवरून वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. आपल्या सध्याच्या आरोग्य यंत्रणेमध्ये रुग्णांची संख्या वाढल्यास सेवा देणारी यंत्रणा निर्माण करणे आव्हानात्मक आहे. तेव्हा वैद्यकीय उपचारांव्यतिरिक्त सामाजिक दुरावा, रुग्ण, संशयितांचे विलगीकरण, संचारबंदी या उपाययोजनांवर भर देणे आवश्यक आहे.

करोना विषाणू हा हवेत संचार करणारा नसला तरी एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला होऊ  शकतो. समाजामध्ये याचा संसर्ग पसरला असल्याचे पुरावे समोर येत आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांची तातडीने अंमलबजावणी व्हायला हवी.

हा प्रसार कसा होतो?

करोनाबाधित रुग्णाच्या शिंकण्या किंवा खोकल्यामधून बाहेर पडणाऱ्या तुषारांमधून याचा प्रसार होतो. हे तुषार धातूसारख्या कठीण आणि कपडय़ासारख्या मऊ  पृष्ठभागावर काही काळ टिकतात. त्याच वस्तूंना इतर व्यक्तीने हात लावल्यावर त्याच्या हातावर विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता असते. हे हात नाक किंवा तोंडाला लावल्याने विषाणू दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात श्वसनमार्गाद्वारे प्रवेश करू शकतात.

सामाजिक दुरावा पाळणे का आवश्यक

करोनाची बाधा झाल्यानंतर रुग्णांना लक्षणे दिसण्यासाठी किमान चार ते पाच दिवसांहून अधिक कालावधी लागतो. संसर्ग समाजात पसरत असल्याने कोणत्या व्यक्तीला झाला आहे की नाही, हे लक्षणे दिसल्यावरच समजू शकते. परंतु तोपर्यंत बाधा झालेल्या व्यक्तींमार्फत नकळतपणे या विषाणूंचा प्रसार आसपासच्या भागात होत असतो. म्हणून कोणत्याही व्यक्तीपासून शक्यतो १ मीटर दूर राहावे, असा सल्ला डॉ. नायर रुग्णालयाच्या औषधशास्त्र विभागाच्या डॉ. माला कनेरिया यांनी दिला आहे.

हात स्वच्छ ठेवण्याची आवश्यकता

हे विषाणू केवळ श्वसनमार्गातून शरीरात प्रवेश करतात. हाताच्या माध्यमातून हे विषाणू नाक किंवा तोंडावाटे शरीरात जाण्याची शक्यता असते. म्हणून चेहरा, नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नका आणि लावण्यापूर्वी हात स्वच्छ करा, असा सल्ला डॉ. अमिता जोशी यांनी दिला आहे.

हात स्वच्छ करणे हाच योग्य पर्याय

कोणत्याही पृष्ठभागावर करोनाचा विषाणू किती काळ टिकतो याचा ऊहापोह करणे वास्तववादी नाही. कारण आपल्या आजूबाजूला असलेल्या असंख्य वस्तू स्वच्छ करणे शक्य नाही. तेव्हा वरचेवर सॅनिटायझर किंवा साबण-पाण्याने हात स्वच्छ करणे हाच योग्य उपाय आहे.

रुग्ण, संशयितांच्या वैयक्तिक माहितीचा प्रसार करणे अनैतिक

संसर्गाबाबत समाजात असलेल्या भीतीदायक वातावरणामुळे संसर्ग झालेल्या आणि संशयित रुग्णांना वाळीत टाकणे, बहिष्कृत करणे अशा घटना याआधी घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्ण, संशयितांची वैयक्तिक माहिती, नावे जाहीर करणे किंवा समाजमाध्यमांवर संदेश म्हणून आल्यास फॉरवर्ड करणे अनैतिक आहे. या व्यक्तींनी स्वत:ची काळजी घेतली तरच समाज सुरक्षित राहू शकतो. तेव्हा त्यांची माहिती गोपनीय राहील ही नैतिक जबाबदारी समाज म्हणून आपणही घ्यायला हवी.

जोखमीच्या गटातील व्यक्तींनी घ्यावयाची काळजी

  •  गरोदर महिला, ज्येष्ठ व्यक्ती, श्वसनाचा त्रास असणारे, प्रतिकारशक्ती कमी असणारे.
  •  हात सारखे स्वच्छ धुवा : साबण आणि पाण्याने हात वारंवार धुवा किंवा हँड सॅनिटायझरचा वापर करा.
  •  हात न धुता डोळ्यांना, नाकाला आणि तोंडाला स्पर्श करू नका.
  •  जवळचा संपर्क टाळा : गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका आणि आजारी लोकांच्या जास्त संपर्कात येऊ  नका.
  •  तुम्ही आजारी असाल तर घरीच थांबा.
  •  खोकताना व शिंकताना तोंडासमोर रुमाल धरा किंवा मास्क घाला.

घरात अलगीकरणाच्या सूचना दिलेल्या व्यक्तींची काळजी

  •  घरामध्ये हवा खेळती असेल अशा खोलीत या व्यक्तीने राहावे. दुसऱ्या व्यक्तीला या खोलीत राहावे लागत असल्यास या व्यक्तीपासून किमान १ मीटर अंतर ठेवावे.
  •  त्या व्यक्तीने वापरावयच्या वस्तू ताट, ग्लास, कप, अंथरूण-पांघरूण, रुमाल, टॉवेल इत्यादी स्वतंत्र असाव्यात. घरातील इतरांनी त्याचा वापर करू नये.
  • घरातील सर्व व्यक्तींनी उपलब्ध असल्यास सर्जिकल मास्कचा वापर करावा.  दर सहा ते आठ तासांनी मास्क बदलणे गरजेचे आहे. एकदाच वापरायचे (डिस्पोझेबल) मास्क पुन्हा पुन्हा वापरू नयेत
  •  वापरलेले मास्क ब्लीचिंग पावडर किंवा हायपोक्लाराइटने र्निजतुकीकरण करून पेपरमध्ये बांधून त्याची विल्हेवाट लावावी.

ताप, सर्दी, खोकला याचा संसर्ग झालेला असल्यास..

  •  घराच्या बाहेर अजिबात जाऊ  नये.
  •  घरातील इतरांना संसर्ग पसरू नये यासाठी मास्कचा वापर करावा.
  •  वरचेवर हात स्वच्छ करावेत.
  •  शारीरिक बदलांवर लक्ष ठेवून लक्षणे गंभीर होत असल्यास किंवा शंका असल्यास १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर अधिक माहिती घ्यावी.

दुरावा कसा पाळावा?

  •  अगदीच गरज भासल्यास घराबाहेर जावे.
  • घरात आल्यानंतर सॅनिटाझयर किंवा साबण आणि पाण्याने हात स्वच्छ करावेत.
  •  गर्दी किंवा घोळका होईल अशा ठिकाणी जाणे टाळावे.
  •  कोणत्याही सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ  नये.

   संकलन- शैलजा तिवले