करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव..

चाकोरीच्या पलीकडले

 विनोद बिराजदार, सहशिक्षक, सिद्धेश्वर प्रशाला, सोलापूर

आमचे एकूण सहा जणांचे कुटुंब. यामध्ये मी, माझे आईवडील, माझी पत्नी व दोन मुले आहेत. आईवडील निवृत्त झाले असून मी व माझी पत्नी दोघेही शिक्षकी पेशामध्ये कार्यरत आहोत. माझा मोठा मुलगा क्षितिजने नववीतून यंदा दहावीत प्रवेश केला आहे, तर धाकटा मुलगा नीरज पाचवीची वार्षिक परीक्षा देणार होता, परंतु शासनाने पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द केल्यामुळे त्याची परीक्षेतून सुटका झाली आहे.  पण घरात बंदिस्त राहून मी काय करू? या त्याच्या प्रश्नाने आम्हाला भंडावून सोडले आहे. त्याच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून आम्ही घरातला वर्षभर बंद असलेला टीव्ही सुरू केला आणि त्याचा कंटाळा काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केला. क्षितिजसाठी काही पाठय़पुस्तके आधीच घरी आणून ठेवल्यामुळे त्याचा काही वेळ दहावीच्या अभ्यासाची पूर्वतयारी करण्यात जात आहे. मी आणि पत्नी दोघांचे रोजचे आयुष्य घडय़ाळाच्या काटय़ासोबत चालत असते. ते आता काही प्रमाणात बदलले आहे. सकाळी  प्रभात फे रफटका मारायलाही जाणे संचारबंदीमुळे शक्य नाही. त्यामुळे सकाळी निवांत उठून घरातच काही वेळ व्यायाम करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. माझ्या सौ.ने घरातील स्वयंपाकाच्या मावशींना संसर्गापासून रोखण्यासाठी सध्या सुट्टी दिली आहे. ती स्वत: स्वयंपाक करून तिचा वेळ व्यतीत करीत आहे. आईवडील दोघेही गेल्या पाच ते सात वर्षांपूर्वीच निवृत्त झाल्याने त्यांच्या नियमित दिनचर्येमध्ये फारसा फरक पडलेला नाही. मी इयत्ता दहावीचा नियामक म्हणून काम पाहत असल्याने माझ्याकडे या कालावधीत घरातूनच काम सुरू आहे.  मला वाचनाची आवड असल्याने सध्या सवड मिळाल्याने त्याचा पुरेपूर फायदा करून घेत आहे. शाळेच्या ग्रंथालयातून माझ्यासाठी व मुलांसाठी भरपूर पुस्तके आणून ठेवली होती त्यामुळे काही वेळ वाचनामध्ये जात आहे. मुले घरातच दुपारच्या वेळी बुद्धिबळ व कॅरम  यांसारखे बैठे खेळ खेळून आपला वेळ व्यतीत करीत आहेत. मीही माझ्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाचा कंटाळा आल्यावर त्यांच्यासोबत बुद्धिबळ व कॅरम हे खेळ खेळण्यात सहभागी होत आहे. चांगले चित्रपट व नाटक यांचा सध्या मोबाइलवर व टीव्हीवर पाहण्यात आनंद घेत आहे. एरवी मित्रांना, नातेवाईकांना फोन करण्यासदेखील वेळ मिळत नसल्याने सध्या नातेवाईकांना व मित्रांना फोन करून मनसोक्त गप्पा मारीत आहे. सध्या मी घरी असलो तरी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून आलेल्या सूचनांनुसार आम्ही घरी बसून काही शैक्षणिक कामांमध्ये सहभाग घेत आहोत व रोज माझ्या वर्गातील दहा विद्यार्थ्यांशी फोनद्वारे संपर्क साधून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना करोना आजाराविषयी व त्या संदर्भात घ्यावयाची काळजी याबाबत संवाद साधत आहे. विद्यार्थ्यांनी घरीच राहून सामान्य ज्ञान व इतर पुस्तकांचे वाचन तसेच त्यांच्या अभ्यासक्रमातील मूलभूत क्रियांचा सराव करण्याविषयी मार्गदर्शन करीत आहे आणि त्यांना रोज काही स्वाध्याय देत आहे.  माझे वडील हे सोसायटीचे सचिव असल्याने ते सोसायटीतील नागरिकांची माहिती संकलित करीत आहेत आणि महापालिकेत देत आहेत. एकंदरीत आमचे सर्वाचेच आयुष्य घडय़ाळाच्या बंधनातून मुक्त आहे.  माझ्यासारखे शासकीय कर्मचारी व मध्यमवर्गीय तसेच श्रीमंत सध्या आर्थिक अडचण नसल्याने आपापल्या घरात अगदी निवांत जीवन जगत आहेत, परंतु ज्या गरीब लोकांचे पोट दैनंदिन कामे केल्याखेरीज भरू शकत नाही अशा लोकांचा वेळ कसा जात असेल व ते आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह कशा पद्धतीने करत असतील? हा विचार मात्र खरोखर अस्वस्थ करतो.