स्वावलंबनाची पाठशाळा

करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला.

त्यातील काही निवडक अनुभव..

 हृषीकेश कापरे, पुणे</strong>

माझी मुले एकदम लहान आहेत. राधेय पहिलीत आणि वैखरी खेळगटात. दोघेही मराठी माध्यमाच्या शाळेत आहेत आणि सकाळी लवकरच शाळेत जातात. त्याचबरोबर आमचा टीव्ही पण वर्षांत फक्त दोन महिने चालू असतो.

दोघांनाही अभ्यास, परीक्षा अशा कशाचेही गांभीर्य नाही आणि असण्याचे कारणही नाही. पण हीच ती वेळ, हाच तो क्षण असा विचार करुन, कार्यालयातून संध्याकाळी घरी आल्यावर मी आणि हिने आम्ही दोघांचीही त्यांना सर्व काही समजावून सांगितले.  ही नेहमीसारखी सुट्टी नाही आणि कुठल्या कठीण परिस्थितीत ती दिली आहे, हे त्या चिमुकल्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचे भय त्यांनाही अर्धवट समजत होते. ते जरा सोप्या भाषेत सांगून, काय काय खबरदारी आपण घ्यायला पाहिजे हेही त्यांना सांगितले.

दोघांनाही सांगितले की शाळा नसली तरी शाळेच्या वेळेत शाळेसारखेच वागायचे. रोजचा अभ्यास शाळेकडून येत असल्याने, सकाळी सकाळी तो संपवून टाकायचा. आणि मग नंतर काय काय वेगवेगळे करता येईल, यावर विचारमंथन केले. आठ आणि पाच ही वयं जास्त नसली तरी यावयात झालेले संस्कार हीच त्यांची आयुष्यभराची शिदोरी असणार आहे.   दोघांनाही घरातील सगळ्या कामांची सवय लावायचे आम्ही नक्की केले.

याची सुरुवातच सकाळी उठल्या उठल्या पांघरुणाची घडी घालण्यापासून केली. रोज सकाळी लवकर शाळेत जात असल्याने, ही घडी करायचा योगही दोघांना कधी आला नव्हता. पण दुसऱ्या दिवसापासून अगदी ठरवून दोघांनाही स्वत:च्या पांघरुणाची घडी घालायची सवय लावली. त्यानंतर लगेच सगळे आवरुन, शाळेतील प्रार्थना आणि अभ्यास हसतखेळत करून घेतला. हसतखेळत अभ्यास झाल्याने, मुलांनाही त्याचे दडपण आले नाही.

जनता संचारबंदीच्या घोषणेनंतर घरी कामाला येणाऱ्या काकूंनी गावी जाण्याचा निर्णय घेतला. मग काय? घरातील सर्व कामे सगळ्यांनी मिळून करायचे ठरवले. दोघांनाही एक एक खोली वाटून दिली आणि ती स्वच्छ ठेवायची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आणि मुलांनीही ती उत्साहाने स्विकारली. आपल्या खोलीची, खोलीतील वस्तूंची साफसफाई आता मुले एकदम मनापासून करायला लागली. खोलीतला केर काढण्यापासून ते दोन तीन दिवसातून एकदा ती पुसण्याचे कामही मुले आता आनंदाने करतात. स्वयंपाकातील छोटय़ा छोटय़ा गोष्टीही त्यांना शिकवल्या. आता रोजचा कुकर कोण लावणार यावरून दोघांत भांडणे होतात. त्याबरोबरच स्वत:चे ताट स्वत: धुण्यासही मुलांना प्रवृत्त केले. मुलांना त्यात एवढी मजा वाटायला लागली की स्वत:च्या ताटवाटीशिवाय इतरही भांडी घासायला द्या म्हणून दोघे आता मागे लागतात. तिसरी पिढी घरात नसल्याने, काही काही गोष्टी करणे शक्य नव्हते. पण आजकालच्या विभक्त कुटुंबातील मुलांना नात्यांमधली गंमत कळावी म्हणून एक मस्त खेळ सुरू केला. रोज रात्री बाबाच्या आणि आईच्या सगळ्या सख्ख्या, मावस, मामे, आत्ये बहीण भावंडांची, आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांची उजळणी सुरु केली. घरातील जुने आणि भ्रमणध्वनीमधील सगळ्यांची छायाचित्रे बघून त्यांना प्रचंड नवल वाटत होते. आईबाबा, तुम्हाला एवढे कसे बहीण- भाऊ या त्यांच्या प्रश्नाला मात्र आमच्याकडे उत्तर नव्हते.

याबरोबरच रोज रात्रीची शुभंकरोती, नवनवीन स्तोत्र पाठांतर अशा गोष्टी तर सुरुच आहेत. घरातील कुंडय़ांची पण विभागणी केल्याने, त्या त्या झाडांना पाणी घालण्याचे कामही दोघे अगदी आनंदाने करतात. करोनामुळे मिळालेल्या या अनपेक्षित सुट्टीचा स्वावलंबनाची पाठशाळा चालविण्याचा आम्हाला प्रचंड फायदा होत आहे.  स्वावलंबनाचे हे धडे मुलांना आयुष्यभर उपयोगी पडतील हा आम्हाला विश्वास वाटतो.

सवयीच्या गुलामगिरीवर मात

प्रा. मिलिंद जोशी

आपण सारेच सवयीचे गुलाम झाले आहोत. ही गुलामगिरीच आपली जीवनशैली बनली आहे. त्या  गुलामगिरीवर मात करण्याची मानसिकता करोना तयार करतोय. गेल्या काही वर्षांपासून दिवस वेळापत्रकात अक्षरश: बांधलेला आहे. नियोजनाप्रमाणे घडले नाही, तर महाभयंकर अपराध घडतोय असंच वाटायचं. ९ मार्चला पुण्यात करोनाचा पहिला रुग्ण सापडला. जगभर या करोनाने काय थैमान घातलंय हे वृत्तपत्रांतून आणि दूरचित्र वाहिन्यावरून डिसेंबरपासून समजत होतं. जबाबदार अधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदांतून विषयाचे गांभीर्य लक्षात येत होते. ११ मार्चला लोकसत्तेच्या वक्ता दशसहस्र्ोषु या स्पर्धेच्या औरंगाबाद  विभागाच्या अंतिम फेरीसाठीचा परीक्षक म्हणून औरंगाबादला जायला निघालो. वाटेत चहासाठी  थांबलो. सकाळची वेळ असल्याने तिथे बरीच गर्दी होती. त्यामुळे नाकाला रुमाल बांधला. लोक आश्चर्याने बघत होते. पुण्यात रुग्ण सापडल्याने पुणेकरांनीच काळजी घ्यावी असेच इतरांच्या नजरा सूचित करत होत्या. दरम्यान घरातून काम करण्यास विद्यापीठांनी परवानगी दिलेली होती. एक दिवस बरे वाटले. किती तरी महिने शनिवारी रविवारी घरी नव्हतो. धावपळीच्या वेळापत्रकातून सुटका झाल्यासारखे वाटत होते. पण सवयीचा गुलाम झाल्याने मनासारखे काहीच करता येत नाही, असेही वाटत होते. सकाळी बाहेर फिरायला जायची सोय नव्हती. गर्दी टाळायची होती. मग लिफ्टचा वापर न करता जिने चढणे असे प्रकार करून फिरण्याची आणि व्यायामाची हौस भागवली. बाहेरच्या व्यापात गुंतलेलो असलो तरी मी घरात रमणारा आहे. मला घर हे नेहमीच उत्तम विश्रांतीस्थान आहे वाटत आले आहे. पण सक्ती ही न मानवणारी गोष्ट! पहाटे लवकर उठायची सवय, त्यात फिरणे बंद मग काय करायचं? घरातल्या ग्रंथालयाला आवरण्यासाठी कित्येक वर्षे हात लागला नव्हता. संदर्भाचे पुस्तक शोधायचे, काम झाले की ठेवून द्यायचे एवढेच सुरू होते. ग्रंथालय आवरायला घेतले. नवीन आलेली, वाचायची राहिलेली पुस्तकं बाजूला केली, ग्रंथालयांना भेट देण्याची पुस्तकं वेगळी काढली, मासिकं आणि दिवाळी अंक व्यवस्थित लावून ठेवले. या कामी पत्नी आणि मुलीची मदत घेतली. कितीतरी कागदपत्रांचे फायलिंग करायचे होते, ते केले. यात सकाळी दहाअकरापर्यंतचा वेळ उत्तम गेला. दुपारी जेवणं झाली की वाचन आणि विश्रांती. त्यानंतर लेखन, मालिका पाहणं आणि मनसोक्त गप्पा, गप्पांच्या जागा फक्त बदलल्या कधी स्वयंपाक घरात, कधी हॉलमध्य. छोटय़ा रोपांच्या देखभालीपासून किती तरी गोष्टी करायच्या राहिल्या होत्या, त्याची यादी करून त्या सर्वानी  करायला सुरुवात केली. आवडीचे कित्येक दिवसात न बनवलेले जुने आणि नवीन पदार्थ सर्वानी मिळून बनवले. घडय़ाळाकडे सारखं बघायचं नाही हे सूत्र आवर्जून पाळलं. बाहेर फिरायला न जाता, हॉटेलिंग न करता, सिनेमा नाटक न पाहता, लाँग ड्राइव्हला न जाता, माणसांच्या घोळक्यात न रमता, परफॉर्मन्स नावाच्या राक्षसाचा पाठलाग न करता, डायरी न पाहताही, मोबाइल व इंटरनेटचा फारसा वापर न करताही आनंद मिळवला आणि मिळवत आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या परिस्थितीने सवयीच्या गुलामगिरीवर मात करायला शिकवली. आज जगण्याचा जो वेग आहे, तो उद्या नसला तरीही जगण्याच्या आनंदात काहीही फरक पडायला नको, प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेत कसं जगायचं याचं प्रशिक्षण असे प्रसंग नक्कीच देतात तेच सध्या घेतोय.

सकारात्मकतेची जाणीव

दल्ल रागिणी रणपिसे

सध्याच्या परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आपणा सर्वांसाठी खूप आवश्यक आहे. सुरवातीला गोंधळ साहजिकच होता. परंतु आता प्रत्येकाने आपली इच्छाशक्ती प्रबळ ठेवावी आणि करोनाबाबतची सर्व माहिती, उपाययोजना, घ्यावयाची काळजी याबाबत जागरूक राहून त्याची अंमलबजावणी करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

आमच्या वसाहतीमध्ये अनेक लहान मूले असूनही आता कोणीही खेळायला येत नाहीत, एवढेच काय तर मोठी माणसे देखील काम असेल तरच तेवढय़ापुरतीच बाहेर पडतात. शिंक किंवा खोकला कधीही नियंत्रीत करायचा प्रयत्न करू नये. नागरिकही योग्य ती काळजी घेताना दिसत आहेत. ही जागरूकता कायम राहावी. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याऱ्या लोकांवर अतिशय कठोर कारवाई करण्याची गरज होतीच. आणि ही जबाबदारी केवळ पालिकेची नसून प्रत्येकाची आहे. आपले संपूर्ण शहर, राज्य,  देश स्वच्छ असावा हा आपला हक्क आणि जबाबदारी देखील आहे.

सार्वजनिक ठिकाणांवरील निर्जंतूकीकरण कायमस्वरूपी केले जावे. सरकारने टप्प्याटप्प्याने काही गोष्टी बंद केल्यामुळे अचानक होणारा गोंधळ नक्कीच कमी झाला. आता या सेवा सूरू करतानाही टप्प्याटप्प्यात सूरू कराव्या. आपले आरोग्य सुरक्षित तर आपल्या आजूबाजूचे सुरक्षित आणि त्यांच्या आजूबाजूचे देखील सुरक्षित. करोनाविरुद्धच्या युद्धाची युध्दनीती हीच आहे. सकारात्मकतेची,  जबाबदारीची जाणीव कायम ठेवून आरोग्याच्या सुरक्षेची ही साखळी वाढवू या.