उन्हाळी सुट्टीचे सगळे नियोजन कोलमडले आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी घरात बसण्याखेरीज कोणताही पयांय उरलेला नाही. त्यामुळे आता या सक्तीच्या सुट्टीत घरबसल्या करायचे काय, असा प्रश्न तुम्हा आम्हा सर्वानाच सतावत आहे. विशेषत: लहान मुले असलेल्या कुटुंबांसमोर तर हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. पण हा प्रश्न जितका गंभीर वाटतो, तितका तो नक्कीच नाही. याउलट काही छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून तुम्ही या गंभीर प्रश्नावर गंमतीशिर तोडगा काढू शकता.

कला, छंद जोपासा

मुलांच्या अभ्यासात चित्रकला, हस्तकला हे विषय असतात. त्यामुळे रंग, कागद, पेन्सिल, कात्री, गोंद, इत्यादी गोष्टी घरात सहज उपलब्ध असतात. त्या वापरून मुलांना विविध कल्पक चित्रे काढायला आणि वस्तू बनवायला शिकवावे. एखादी गोष्ट सांगून त्या आधारावर चित्र काढण्यास प्रोत्साहन द्यावे किं वा चित्रातूनच गोष्ट तयार करता येईल. दरवर्षी दिवाळीला आणलेली रांगोळी थोडीतरी उरते आणि कोनाडय़ात नाहीतर माळ्यावर पडून राहते. करोना सुट्टीच्या निमित्ताने ही रांगोळी बाहेर काढावी. मुलांना हवी तशी रांगोळी काढून त्यात आवडीप्रमाणे रंग भरू द्यावे. मेंदीचा कोन घरात असेल तर मेंदी काढायलाही शिकवू शकता. कोन नसेल तर कागदावरही मेंदीची नक्षी काढता येईल.

भांडीकुंडी.. खेळ अन् व्यवहारज्ञान

अजूनही बऱ्याच घरांमध्ये मुलींचे आणि मुलांचे खेळ ठरलेले असतात. मुलांना गाडी, रोबोट, चेंडू यांच्याशी खेळण्याची सवय लावली जाते तर, मुली बाहुली, भांडी-कु ंडी यांच्याशी खेळत बसतात. यंदाच्या सुट्टीत तरी हा नियम मोडायला हवा. मुलानाही भांडी-कु ंडी यांच्याशी खेळण्याची सवय लावणे आवश्यक आहे. यातून स्त्री-पुरूष समानतेचे मूल्य नकळतपणे रूजवले जाईल. किचन सेट घरात उपलब्ध नसेल तर बाजारातून आणण्याची सोय सध्या नाही. त्यामुळे घरातील कमी वजनाची, पटकन न फु टणारी खरी भांडी वापरावीत. शक्य असेल तर खेळण्यात बाहुलीला सहभागी करून घ्यावे. यामुळे आपल्या आजूबाजूच्या मुलींशी कसे वागावे, त्यांना कसे समजून घ्यावे हे मुलांना कळेल.

कामातून विरंगुळा

दिवसभर मुलांसोबत खेळत बसणे पालकांना शक्य नाही. त्यांना घरातील कामेही करावी लागतात. अशावेळी मुलांना घरच्या कामांमध्ये सहभागी करून घ्यावे. उदाहरणार्थ – पालक भांडी घासत असतील तर घासून झालेली भांडी पुसून, लावून ठेवण्यास मुलांना सांगावे. सुकलेले कपडे घडी करून ठेवण्यास सांगावे. पुस्तकांचे आणि कपडय़ांचे कपाट लावण्यास सांगावे. रद्दीतील वृत्तपत्रे काढून त्यातील कोडी पालक आणि मुलांनी मिळून सोडवावीत. सँडवीच, भेळ यांसारखे सोप्पे पदार्थ मुलांकडून करून घ्यावेत. आपण कार्यालयात काय काम करतो याची माहिती सोप्या भाषेत मुलांना द्यावी.

मुलांना लिहिते करा!

कॅ रम, बुद्धिबळ, सापशिडी, पत्ते असे बैठे खेळ मुलांसोबत खेळता येतील. शाळा सुरू असताना निबंध लिहायला सांगितला असेल तर घाईघाईत इंटरनेटवरून किं वा निबंधाच्या पुस्तकात बघून लिहिला जातो. पालकांकडेही फार वेळ नसल्याने पालक मुलांना हवे ते करू देतात. यामुळे मुलांच्या कल्पकतेला वाव मिळत नाही. निबंधाचे मूळ उद्दिष्ट असलेले लेखनकौशल्य आत्मसात होत नाही. यावर उपाय म्हणून एक नवा प्रयोग करावा. मुलांना एखादा विषय देऊन त्यावर लिहिण्यास सांगावे. लिहिलेले सर्व विचार मुलांचे स्वत:चे असतील याची काळजी घ्यावी. त्यांना काही सुचत नसेल तर प्रश्न विचारून विचारप्रवृत्त करावे. मुलांना लिहायचा कं टाळा येत असेल तर ठरवलेल्या विषयावर बोलण्यास सांगावे. मात्र विषय मुलांच्या आवाक्यातला म्हणजेच त्यांच्या भोवताली सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींशी संबंधित असावा. जवळच्या व्यक्तींविषयी बोलताना मुलांनी चांगलेच बोलावे असा आग्रह धरू नये. त्यांच्या मनात असेल ते बोलू द्यावे. मुलांनी सुचवलेल्या विषयावर पालकांनीही बोलावे.

ऑनलाइन पर्याय

युटय़ूबवर मुलांसाठी अनेक खेळांच्या चित्रफिती उपलब्ध आहेत. फे सबुकवर ‘अ‍ॅक्टिव्हिटिज फॉर किड्स‘ नावाचे पेज पाहिल्यास यावर अतिशय सोप्प्या कलाकृती दिलेल्या आहेत.  ‘स्टोरी रेनबो – डिस्कव्हर द स्टोरीटेलर इन यू‘ या फे सबुक समूहात सामील होऊन कथाकथनाचा खेळ खेळू शकता. यात लॉकडाऊनच्या २१ दिवसांसाठी विविध विषय दिले जातील. मात्र सर्व ऑनलाईन पर्याय थेट मुलांच्या हाती देऊ नयेत. यामुळे पालक आणि मुलांमध्ये काही संवाद राहणार नाही. सर्व गोष्टी पालकांनी पाहाव्यात, समजून घ्याव्यात आणि भ्रमणध्वनी, लॅपटॉप बाजूला ठेवून मुलांसोबत कराव्यात. आपल्या पालकांना बऱ्याच गोष्टी माहीत आहेत हे पाहिल्यावर मुलांमध्ये पालकांविषयी विश्वास निर्माण होईल.

हेही काही पर्याय

  •  मुले खूपच लहान असतील तर त्यांनी जमतील असे खेळ खेळावे. मुळाक्षरे लिहिलेले पत्ते तयार करावेत. त्यातील एखादा पत्ता निवडायला सांगावा. त्या पत्त्यावर लिहिलेल्या अक्षरापासून नावे सुरू होतील अशा वस्तू आणण्यास सांगावे. एखादा रंग कोणकोणत्या वस्तूंना आहे ते ओळखण्यास सांगावे.
  •  लहान मुलांची गाणी भ्रमणध्वनी लावू शकता. पण भ्रमणध्वनी मुलांच्या हातात देणे टाळावे. मुले मोठी असतील तर भरपूर वाचन करून घ्यावे, पालकांनीही वाचावे. वाचलेल्या साहित्याविषयी चर्चा करावी. घरात पुस्तके  उपलब्ध नसतील तर रद्दीतील वृत्तपत्रे काढून त्यातील लेख वाचावे.
  • बऱ्याचदा पालकांना आपल्या बालपणीचे खेळ मुलांना शिकवण्याची इच्छा असते. असे खेळ शिकवावेत, मात्र ‘आमच्या काळातले खेळ’ असे म्हटलेले मुलांना आवडेलच याची खात्री नाही. त्यामुळे नवा खेळ म्हणून तो शिकवावा आणि मुलांना आवडू लागला की त्याच्या आठवणी सांगाव्यात.