बाटलीतील पेय संपले की ती भंगारवाला किंवा राद्दीवाला यांच्याकडे जाते. त्याचे फारसे पैसेही मिळत नाहीत. काही बाटल्यांचे आकार एवढे सुंदर असतात की त्या फेकाव्याशा वाटतच नाहीत. पण घरातील अडगळीत भर घालणेही योग्य नसते. अशा द्विधेत अडकला असाल, तर आजची कलाकृती खास तुमच्याचसाठी.

साहित्य : सुतळ, कात्री, गम, पिस्त्याची साले, गुंजाच्या बिया अथवा आवडीनुसार इतर सुशोभनाचे साहित्य.

कृती

*  पूर्ण बाटलीला स्टिकर असल्यास गरम पाण्यात बुडवून ते काढून टाका.

*  बाहेरील बाजूस फेविबाँड लावून सुतळ घट्ट गुंडाळून घ्या.

*  पूर्ण वाळल्यावर सुतळीवर गुंजाच्या बिया फुलांच्या आकारात चिकटवा.

*  उरलेल्या भागात पिस्त्याची साले पाने म्हणून चिकटवा.

*  वाटल्यास अ‍ॅक्रेलिक रंगाने रंगवा. न रंगवता नैसर्गिक स्वरूपात ठेवली, तरी छान दिसतात.

*  इतर सुशोभानाचे साहित्य वापरून सजावट करता येईल.

*  बाटली गळकी असल्यास कोरडय़ा वस्तू ठेवण्यासाठी वापरता येईल. सुस्थितीत असल्यास पाणी भरून फुलदाणी म्हणून वापर करता येईल.

apac64kala@gmail.com