शेतीचे  प्रयोगवंत : कल्पेश भोईर

आधुनिक तंत्रज्ञान आणि पद्धतींचा वापर करून अर्नाळय़ातील भूषण पाटील या तरुण शेतकऱ्याने शेतात ऑर्किड या परदेशी फुलाची लागवड केली. आकर्षक दिसणाऱ्या या फुलांना बाजारपेठांमध्ये मागणी वाढली आणि पाटील यांना या शेतीतून नफा मिळू लागला.

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
another sort of freedom 2
काळाबरोबर वाहणं..

निसर्गरम्य असलेल्या वसई परिसरात विविध प्रकारची शेती केली जात आहे. मात्र सध्याच्या घडीला फुलशेतीतून फुलणाऱ्या फुलांना मोठय़ा प्रमाणात मागणी असल्याने वसईच्या बहुतांश भागात फुलशेतीची लागवड केली जात आहे. या फुलशेतीमध्ये केवळ देशी फुलांची लागवड न करता परदेशी फुलांचीही लागवड होऊ  लागली आहे.

अर्नाळा येथे राहणाऱ्या भूषण पाटील या युवा शेतकऱ्याने आपल्या शेतात सजावटीसाठी लागणाऱ्या ऑर्किड या फुलांची शेती फुलवली आहे. सुरुवातीच्या काळात पारंपरिक शेतीकडे जास्त कल होता. परंतु मजुरांची रोडावलेली संख्या त्यामुळे पारंपरिक शेती करण्याचे प्रमाण कमी झाले आणि अशातच नवी वाट म्हणून काही तरी करता यावे यासाठी भूषण यांनी प्रयत्न सुरू केले. यानिमित्ताने विविध ठिकाणी भरणाऱ्या कृषी प्रदर्शन व मार्गदर्शन शिबिरांना भेटी देण्यास सुरुवात केली होती. मागील तीन वर्षांपूर्वी पुणे येथील एसीसी सेंटरला त्याने आपल्या मित्रासमवेत भेट दिली आणि त्या वेळी व्यवसायाच्या अनुषंगाने करण्यात येण्यासारखी ऑर्किड या फुलांची शेती आहे, असे त्याच्या निदर्शनास आले आणि हाच प्रयोग आपल्या शेतात करता येऊ  शकतो याच उद्देशाने भूषण याने ऑर्किड फुलांची लागवड करण्याचे ठरवले.

आर्किडची लागवड करण्यासाठी दमट वातावरणाची गरज आहे. तसे वातावरण वसईतही चांगल्या प्रकारचे असल्याने भूषणने आपल्या १६.५ गुंठे जागेत शेड तयार करून ऑर्किड फुलांच्या रोपांची लागवड करण्यासाठी लोखंडी अँगल आणि नेटचा वापर करून जमिनीपासून दीड ते दोन फूटवर ३३ बेड तयार केले. त्यावर नारळाच्या झावळय़ा पसरवून एकूण १५ हजार फुलांची रोपे लावण्यात आली आहेत.  या फुलांची लागवड करण्यासाठी जवळपास २५ लाख रुपये खर्च झाला आहे. परंतु ही रक्कम मोठी असल्याने शासनाने हा प्रयोग तपासून योग्य ते अनुदान देण्यात यावे यासाठी मागणी करण्यात आली होती आणि शासनानेही या शेतीच्या प्रयोगाला ५० टक्के अनुदान देऊन चांगले अर्थसाहाय्य मिळाले आहे.

दीड वर्षांनंतर ही फुलबाग वसईच्या वातावरणात चांगल्या प्रकारे बहरू लागली आहे. पांढऱ्या व जांभळ्या रंगांची ही फुले दिसण्यासाठी आकर्षक व जास्त काळ टिकणारी असल्याने सजावटीसाठी या फुलांचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जात आहे. मुंबईच्या दादर येथील फुलबाजारात आर्किडच्या फुलांना अधिक मागणी असल्याने इतर कोणत्या ठिकाणी फुले पाठवण्याची गरज पडत नसल्याचे भूषण पाटील यांनी सांगितले.

दिवसेंदिवस या फुलांचे चांगले उत्पादन निघू लागले आहे. यासाठी या फुलांच्या रोपावर कोणत्याही प्रकारचा रोग पडू नये यासाठी द्रवरूप खतांची आठवडय़ातून दोन वेळा फवारणी केली जात आहे, तर सूर्याच्या किरणांपासून बचाव होण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागत आहे. कारण जास्त उष्ण तापमान असेल तर ही फुले तयार होऊ  शकत नाही म्हणून दिवसातून दोन ते तीन वेळा या बागेत फेरफटका मारून लक्ष देऊन मशागतीकडे द्यावे लागत आहे. सध्याच्या घडीला या फुलबागेतून महिन्याला २५० बंडल इतका माल काढला जातो म्हणजेच जवळपास ४० ते ५० हजार रुपये किमतीचा माल यातून निघू लागला आहे. यामुळे वर्षांला सर्व खर्च वगळता यातून पाच लाख रुपये नफा मिळू लागला आहे. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने ऑर्किड फुलांची शेती चांगली आहे. वसईचे वातावरणही त्याला पूरक असल्याने तरुणाईने अशा प्रकारच्या व्यावसायिक शेतीकडे वळले पाहिजे, असे मत भूषण पाटील यांनी व्यक्त केले.