मुलांना डब्यात काय रोज द्यायचे हा एक मोठा प्रश्नच असतो. पोळी-भाजी, परोठे, डोसे, इडली नेहमीचीच. तसेच सँडविचही. पण मग द्यायचे तरी काय? तर उत्तर आहे, हेच पदार्थ द्यायचे पण वेगळ्या रूपात, वेगळ्या नावाने. सँडविच करताना आपण ते एका ठरावीक पद्धतीने करतो. म्हणजे बटर, चटणी, बटाटे, काकडी.. हेच द्यायचं आहे. पण त्याचं रुपडं थोडं पालटवायचं आहे.

साहित्य –

मुख्य साहित्य आहे, दह्य़ाचा चक्का. (आदल्या दिवशी आठवणीने दही चाळणीवर ओतून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. दुसऱ्या दिवशी मस्त मुलायम चक्का मिळतो.)

हा चक्का एका मोठय़ा वाडग्यात घ्यायचा आणि त्यात आपल्याला आवडतील असे खालीलपैकी कोणतेही पदार्थ घालायचे. त्याचे प्रमाण आपल्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे.

कोबी आणि गाजर जाडसर किसून, उकडलेला बटाटा आणि बिट किसून, उकडलेले मटार, किसलेली शिमला मिरची, पालक किंवा लेटय़ूस, उकडलेला मका, उकडलेली अंडी, उकडलेले चिकन, कांदा बारीक चिरून, आवडेल त्याप्रमाणे हिरवी चटणी, चिली सॉस, किंचित मध, बटर, मिरपूड, ड्राय हब्र्ज, रेड चिली फ्लेक्स, मोहरी, मीठ, चाट मसाला.

कृती :

दह्य़ाचा चक्का एका मोठय़ा वाडग्यात घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्या आवडीनिवडीप्रमाणे वरील पदार्थ घालून छान मिसळून घ्यायचे. नेहमीप्रमाणे बटर, चटणी लावून ब्रेडच्या मध्ये हे सारण भरायचे. अगदी ब्रेड वापरायचा नसेल तर पोळीसुद्धा झक्कास लागेल. चटणी मात्र भरपूर लावायची नाही. फक्त यात काकडी घालू नये. कारण पाणी सुटण्याची शक्यता असते. मेयोनिजचा वापर शक्यतो टाळावा, कारण प्रिझव्‍‌र्हेटिव्ह द्रव्य असलेले पदार्थ मुलांसाठीच नव्हेत तर आपल्या स्वत:साठीही टाळायलाच हवेत.