30 September 2020

News Flash

आजारांचे कुतूहल : कुशिंग्ज सिंड्रोम

क्षार आणि पाण्याच्या पातळीचे नियंत्रण करून रक्तदाब योग्य पातळीत राखणे.

डॉ. अविनाश भोंडवे

मानवी शरीरात मूत्रपिंडांच्या वरच्या बाजूला अ‍ॅडरीनल ग्रंथी असतात. या ग्रंथींपासून कॉर्टिसॉल नावाचे संप्रेरक उत्सर्जित होते. रक्त प्रवाहाबरोबर ते सर्व शरीरात पसरत असते. शरीरातील बहुतेक अवयवांच्या पेशींमध्ये कॉर्टिसॉलला प्रतिसाद देणाऱ्या पेशी असतात. या संप्रेरकाद्वारे खालील महत्त्वाची कार्ये होतात.

* रक्तामधील शर्करा योग्य पातळीत राखणे.

*  चयापचय क्रियेचे नियंत्रण करणे.

* शरीरांतर्गत दाह (इन्फ्लेमेशन) कमी करणे.

* स्मृतीच्या आस्थापनेत मदत करणे.

*  क्षार आणि पाण्याच्या पातळीचे नियंत्रण करून रक्तदाब योग्य पातळीत राखणे.

*  गर्भवती स्त्रियांच्या उदरातील बालकांच्या वाढीचे नियंत्रण करणे.

कॉॅर्टिकोस्टीरॉइड्स- शरीरातील नैसर्गिक  कॉर्टिसॉल संप्रेरकाची रासायनिक  पद्धतीने केलेली औषधी प्रतिकृती म्हणजे कॉॅर्टिकोस्टीरॉइड्स किंवा सामान्य भाषेत स्टीरॉइड्सची औषधे. सांध्यावरील सूज, दमा, अंगाला खाज सुटणे, त्वचेचे काही अ‍ॅलर्जिक आजार, रक्तदाब कमी होणे अशा वेळेस मर्यादित काळासाठी स्टीरॉइड्सची औषधे गुणकारी आणि अनेकदा प्राण वाचवणारी ठरतात.

नैसर्गिक अथवा कृत्रिम स्वरूपातल्या कॉर्टिसॉलची शरीरातील पातळी खूप जास्त प्रमाणात वाढल्यामुळे शरीरावर बाह्य़ आणि अंतर्गत स्वरूपात त्रासदायक  बदल होतात. यालाच कुशिंग्ज सिंड्रोम म्हणतात.

कारणे –

* १. औषधांचा परिणाम- ज्या वेळेस औषधाच्या स्वरूपात कॉर्टिसॉल संप्रेरक वापरले जाते, त्या वेळेस शरीरातील नैसर्गिक  कॉर्टिसॉल संप्रेरक दबला जाऊन त्याचे उत्सर्जन कमी होते. अशा वेळेस स्टीरॉइड्स औषधे जास्त काळ अथवा जास्त प्रमाणात दिली गेली, तर शरीरातले कॉर्टिसॉल वाढते.

* २. मेंदूतील पिच्युटरी ग्रंथीच्या तसेच अ‍ॅडरिनल ग्रंथींच्या टय़ुमरमध्ये नैसर्गिकरीत्याच कॉर्टिसॉल संप्रेरकाची निर्मिती मोठय़ा प्रमाणात होते. त्यामुळे रक्तातील कॉर्टिसॉलची पातळी दीर्घकाळ वाढलेली राहते.

लक्षणे-

*  यामध्ये शरीरावर चरबीचे थर निर्माण होतात. चेहऱ्यावर चरबी जमा होऊन तो गोलाकार बनतो. याला ‘मून फेस’ म्हणतात.

* खांद्यावर आणि मानेवर मागील बाजूस चरबीचे गोळे निर्माण होऊन गुरांना वशिंड असावे तसा उंचवटा दिसू लागतो.

* कंबरेभोवती चरबी जास्त प्रमाणात जमा होऊन शरीर गोलाकार दिसून वजनवाढ होते.

* पोटावर, मांडय़ांवर, दंडावर आणि स्त्रियांमध्ये स्तनांवर स्ट्रेचमार्क्‍स म्हणजे पांढऱ्या रेषा दिसतात. चेहऱ्यावर मुरुमे निर्माण होतात.

* स्त्री-पुरुष दोघांमध्येही चेहऱ्यावरील केस वाढतात.

* स्त्रियांची मासिक पाळी अनियमित होते किंवा बंद होऊ शकते.

* त्वचा पातळ बनून तिला सहजासहजी इजा होते आणि या जखमा लवकर भरत नाहीत.

* पुरुषांमध्ये लैंगिक  कामना कमी होते, नपुंसकता येऊ  शकते.

* याशिवाय खूप थकवा येणे, स्नायूंच्या वेदना होणे.

* नैराश्य, चिंता, चिडचिड, भावनांवर ताबा न राहणे, आकलनशक्ती कमी होणे असे मानसिक  त्रास वाढतात. रक्तदाब वाढणे, सतत डोके दुखत राहणे, अंगावर काळे-लाल चट्टे येणे असे त्रास दिसून येतात.

उपचार

* औषधांमुळे उद्भवणाऱ्या कुशिंग्जमध्ये स्टीरॉइड्स जास्त काळ न देणे. आवश्यक असल्यास दिली तर त्यांची मात्रा हळूहळू कमी करत नेऊन मगच ती बंद करावीत.

* टय़ुमरमुळे होणाऱ्या कुशिंग्जमध्ये त्याची शस्त्रक्रिया हाच उपाय असतो. मात्र त्यानंतर कायमस्वरूपी आवश्यक  त्या मात्रेत कॉर्टिसॉल व इतर हार्मोन द्यावे लागतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2019 2:55 am

Web Title: cushing syndrome symptoms and causes zws 70
Next Stories
1 योगस्नेह : शवासन
2 आरोग्यदायी आहार : आवळा कँडी
3 ‘एसयूव्ही’ कारचे वर्ष..
Just Now!
X