26 October 2020

News Flash

निर्धारात संयम हवा..

मुख्य उत्सवाच्या आधी काही ठिकाणी चोर दहीहंडी म्हणजेच सराव शिबिरांचे आयोजन केले जाते.

नमिता धुरी

गोकुळाष्टमीचा दिवस जसजसा जवळ येतोय तशी गोविंदांच्या मनातली धाकधूक वाढतेय. कोणी सहा थरांचं टार्गेट ठरवतंय तर कोणी सात थरांचं. यांच्यात खरी चुरस रंगेल ती दहीहंडीच्या दिवशी. पण या एका दिवसाचा राजा म्हणून मिरविण्यासाठी गोविंदा कसून तयारीला लागलेत. मानवी मनोऱ्यांच्या या साहसी खेळाप्रती गोविंदांची खरी निष्ठा दिसून येते ती महिना-दोन महिने चालणाऱ्या तालमींमध्ये. विक्रमी थरांचं ध्येय मनाशी बाळगून गोविंदा मैदानावर पाऊल ठेवतात. खरंतर पाऊल ठेवण्याच्याही आधी तालमीच्या मातीला वाकून नमस्कार केला जातो. कारण हीच ती माती आहे जिच्यात पाय रोवून संयमी गोविंदा आजही उभा आहे.

तालमीच्या पहिल्या दिवशी मैदानावर नारळ वाढवला जातो. पुढील वेळापत्रकाचे नियोजन होते आणि हळूहळू नियमित तालमींना सुरुवात होते. मैदानात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गोविंदाची रीतसर हजेरी लावली जाते. सगळ्यांचे मोबाइल एका पिशवीत कोंबून ती पिशवी एका कोपऱ्यात ढकलली जाते. कारण आता पुढचे काही तास म्हणजे किमान रात्री १२ वाजेपर्यंत तरी गोविंदा मोबाइलच काय पण अख्खं जग विसरणार असतो. मैदानात आल्या आल्या प्रथम व्यायाम केला जातो. यामुळे दिवसभराच्या दगदगीने थकलेल्या शरीराला पुन्हा तजेला मिळतो. थर लावण्याआधी प्रत्येक पथकाची एखादी ठरावीक प्रार्थना असते.  ही प्रार्थना पथकातल्या प्रत्येकामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. मग एक एक थर चढवायला सुरुवात होते. चढणाऱ्या थरांसोबत गोविंदांचा उत्साहही चढत असतो. पडण्या-झडण्याची पर्वा नसते. गोविंदा महिला असो वा पुरुष अर्ध्या बाह्यांचं टी-शर्ट आणि हाफ पॅन्ट हा पेहराव ठरलेला असतो. भीती आणि लाज या दोन्ही गोष्टी मैदानाच्या बाहेर सोडलेल्या असतात.

मुख्य उत्सवाच्या आधी काही ठिकाणी चोर दहीहंडी म्हणजेच सराव शिबिरांचे आयोजन केले जाते. यात निरनिराळया भागांतल्या गोविंदा पथकांमध्ये स्पर्धा रंगते. या सराव शिबिरांमधून नवोदित गोविंदांना अनुभवी गोविंदा पथकांकडून बरेच काही शिकण्याची संधी मिळते. सुरुवातीला गल्लीतल्या स्थानिक पोरा-पोरींना घेऊन सुरू झालेले पथक हळूहळू नावाजू लागले की शहराच्या विविध भागांतून आलेले हौशी गोविंदा पथकात प्रवेश करू लागतात. त्यामुळे तालमींदरम्यान मैदानावरच एकत्र नाश्त्याची सोय केली जाते. दहीहंडीच्या दिवशीचा आहारही ठरावीक असतो. यामध्ये केळी, ग्लुकॉनडीचं पाणी अशा गोष्टींना प्राधान्य असतं, जेणेकरून शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहावी. हंडीच्या दिवशी अचानक कोणी आजारी पडले तर काय करायचे? हा प्रश्नच कधी उभा राहात नाही. कारण प्रत्येक थरासाठी ३-४ जणांनी तयारी केलेलीच असते. गोविंदा पथकं आणि कबड्डी यांचं एक वेगळंच नातं आहे. हे दोन्ही मातीशी जोडलेले खेळ आहेत. या खेळांमध्ये ताकद आणि एकाग्रतेचा कस लागतो.  त्यामुळे बहुतेक गोविंदा पथकांमध्ये कबड्डीच्या खेळाडूंची संख्या जास्त असते.

गोविंदा पथकांसाठी दहीहंडी हा फक्त एक सण नाही तर त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. दहीहंडी कोणत्या तारखेला आहे, तालमी कधी सुरू होत आहेत यावर गोविंदा अगदी आपल्या लग्नाच्या तारखाही ठरवतात. महिला गोविंदांची तर कथाच वेगळी. लग्नानंतर काही दिवस तरी नववधूला घराबाहेर पडणे कठीण होऊन जाते. याचाच विचार करून काही महिला गोविंदा शक्य तितक्या लवकर लग्न करून मोकळ्या होतात, जेणेकरून दहीहंडीपर्यंत त्यांची नववधूच्या टॅगपासून सुटका होईल आणि तालमींना उपस्थित राहता येईल. हे इतक्यावरच थांबत नाही तर, पुढे जाऊन बाळंतपणाचं प्लॅनिंगही दहीहंडीच्या तारखा बघूनच केलं जातं. एखाद्या पथकात मुलं-मुली अशा दोघांचाही समावेश असेल तर मुलींच्या पथकाच्या सुरक्षिततेची जबाबदारी मुलांवर असते. हंडीच्या दिवशी इतर टपोरी गोविंदांपासून आपल्या पथकातल्या मुलींचं संरक्षण करणे आणि गरज असल्यास त्यांना बाइकवरून स्वच्छतागृहांपर्यंत घेऊन जाणे ही कामे पथकातली मुले अतिशय जबाबदारीने पार पाडतात.

दहीहंडीच्या खेळामध्ये सर्वात महत्त्वाची असते सुदृढता. त्यासाठी गोविंदा वर्षभर एखाद्या खेळामध्ये सहभागी होत राहतात. सुरक्षिततेचा उपाय म्हणून काही पथकांमध्ये तालीम सुरू होण्याआधी प्रत्येक गोविंदाची वैद्यकीय चाचणी केली जाते. शिवाय हंडीच्या दिवशी प्रथमोपचार पेटी आणि एक डॉक्टर पथकासोबत असतो. मुंबईतल्या नव्या-जुन्या सगळ्याच पथकांच्या तालमी आता जवळजवळ पूर्ण झाल्यात आणि त्यांना ओढ लागलीय ती फक्त हंडीच्या दिवसाची. दरवर्षीप्रमाणे या वर्षीचा गोविंदाही या पथकांना वर्षभर जगण्याची ऊर्जा देऊन जाईल यात शंका नाही.

सोबत प्रथमोपचार पेटी

आमच्या पथकात सर्व वयोगटांतील मुली आहेत. काही महाविद्यालयीन आहेत, तर काही गृहिणी. त्या सर्वाच्या वेळा सांभाळून आम्ही दहीहंडीचा सराव करतो. बऱ्याचदा मुलींना अशा गोष्टींसाठी घरातून परवानगी मिळत नाही. पण दहीहंडी हा देवाचा सण असल्यामुळे का होईना मुलींना परवानगी मिळते. नागपुरात इतवारी बाजारातील मानाची हंडी फोडल्यानंतरच आम्ही इतर हडय़ांकडे वळतो. सोबत प्रथमोपचार पेटी असते.

-स्वाती खेता, राधा-कृष्ण मंडळ, नागपूर

ध्वनिवर्धक बंद ठेवतो

उत्सवाच्या साधारण एक महिना आधीपासून आम्ही सरावाला सुरुवात करतो. सुरक्षेची सर्व सामग्री सोबत ठेवून आणि सर्व कायदे पाळून आम्ही सराव करतो. मुख्य उत्सवाच्या दिवशी हंडी फोडताना आम्ही आयोजकांना स्पीकर बंद ठेवायला सांगतो. जेणेकरून अतिशय शांततेत एकाग्रतेने वर चढता आणि उतरता येईल. यामुळे अपघात टळतील. उत्सवाला विनाकारण गालबोट लागू नये, हा उद्देश असतो. मिळालेल्या पैशांतून आम्ही वर्षभर सामाजिक कार्ये करतो.

– प्रकाश राऊत, शिवतेज गोविंदा पथक, पुणे

थरांचा अतिरेक नाही

दहीहंडी उत्सवाच्या तीन महिने आधीपासून आमच्या सराव शिबिरात उत्सवाचं वातावरण असतं. एरव्ही टवाळकी करणारी मुलंसुद्धा हंडीच्या निमित्ताने मनापासून कामाला लागतात. वेळेवर येणे, व्यायाम करणे असे काही नियम आखून दिलेले असतात. जेवढे जमतील तेवढेच थर आम्ही लावतो. उगाच अतिरेक करत नाही. यामुळे अपघात टळतात. कोणती हंडी फोडायला कधी जायचं हे सगळं आमचे वरिष्ठ ठरवतात.

– धनंजय पांचाळ, जय जवान गोविंदा पथक, मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2019 4:37 am

Web Title: dahi handi practice dahi handi celebration zws 70
Next Stories
1 मला सर्वागाने घडवणारी वास्तू
2 स्वादिष्ट सामिष : मटन कुर्मा
3 वजन कमी करण्याचा वसा!
Just Now!
X