29 February 2020

News Flash

अंतरंग योग

आपण चित्त इकडे तिकडे विचलित न होऊ देता त्या एका विशिष्ट गोष्टीकडे केंद्रित करणे म्हणजेच धारणा होय.

डॉ. आशीष फडके, (आयुर्वेद आणि योगतज्ज्ञ)

ayurinstitute@yahoo.com

मागील लेखामध्ये आपण अष्टांग योगाच्या यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार या पाच अंगांबद्दल, ज्याला बहिरंग योग असे म्हणतात, त्याबद्दल माहिती घेतली. या लेखामध्ये योगाची शेवटची आणि महत्त्वाची तीन अंगे-धारणा, ध्यान आणि समाधी याबाबत चर्चा करणार आहोत. धारणा, ध्यान आणि समाधी या तीन अंगांनाच एकत्रितपणे अंतरंग योग असे म्हणतात.

जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचे निरीक्षण करत असतो, तेव्हा त्याच्या आजुबाजूच्या गोष्टींपेक्षा आपण त्या गोष्टींवरच आपलं लक्षं केंद्रित करीत असतो. ‘या संदर्भात अर्जुन, द्रोणाचार्य आणि पोपटाचा डोळा याबद्दलची गोष्ट आपणा सर्वानाच ठाऊक असेल. तेथे आजूबाजूला रम्य हिरवागार परिसर, वृक्ष वनराई, यापेक्षाही ज्या झाडावर पोपट बसला ते झाड आणि झाडापेक्षाही पोपट आणि त्यातही पोपटाचा डोळा यावर अर्जुनाने केंद्रित केलेले लक्ष, आपल्याला ‘धारणा’ म्हणजे काय? हे जाणण्यासाठी उपकारक ठरते. पातंजल योगसूत्रामध्ये पतंजली मुनीनी ‘देशबंध चित्तस्य धारणा।’ अशी धारणेची व्याख्या केली आहे. आपण चित्त इकडे तिकडे विचलित न होऊ देता त्या एका विशिष्ट गोष्टीकडे केंद्रित करणे म्हणजेच धारणा होय.

जेव्हा योगसाधक धारणेचा अभ्यास करू लागतो वा अधिकाधिक काळ धारणेमध्ये घालवतो, तेव्हा ज्या गोष्टीकडे चित्त केंद्रित करणे अपेक्षित आहे, ती गोष्ट पूर्णपणे चित्तामध्ये उतरते. थोडक्यात काय तर त्या विषयवस्तू आणि चित्ताची एकतानता होते. या अवस्थेलाच पतंजलीमुनी ‘ध्यान’ असे संबोधतात.

पुढे जाऊन जेव्हा साधकाच्या आणि विषयवस्तूमध्ये ‘मी’ आणि ‘तू’ हा फरक उरतनाही, ते पूर्णपणे एकरूप होऊन जातात अशा अवस्थेस ‘समाधी’ असे म्हणतात.

पातंजल योग सूत्रांच्या संदर्भाप्रमाणे ढोबळ मानाने दोन प्रकार संभवतात. पहिल्या अवस्थेत समाधी अवस्थेत जाणाऱ्या साधकाला स्वत:चे भान असते आणि तो स्वत: विचार, वितर्क, अस्मिता आणि आनंद या विविध स्तरांवर त्या अवस्थेची अनुभूती घेत असतो. त्याला संप्रज्ञात समाधी असे संबोधतात. जेव्हा त्या योगसाधकाला स्वत:चे भानच उरत नाही, तो पूर्णत: त्या विषयवस्तूंशी एकरूप होतो, तल्लीन होऊन जातो तेव्हा त्याला ‘असंप्रज्ञात समाधी’ असे संबोधतात.

बरेचदा आपल्याला अनुभव येतो की आपण पुस्तक वाचण्यात मग्न असतो किंवा एखादं गाणं ऐकण्यात गुंग असतो वा एखादा चित्रपट बघण्यात गर्क असतो आणि जवळच आपला मित्र किंवा नातेवाईक आपल्याला हाक मारत असतो आणि  आपले लक्षच नाही हे पाहून तो शेवटी आपल्याला हलवून म्हणतो, ‘‘अरे किती वेळा हाका मारल्या तुला, पण लक्षच नाही तुझे. समाधी वगैरे लागली की काय?’’ त्या वेळेस आपण त्या चित्रपटाशी वा गाण्याशी वा पुस्तकाशी पूर्णपणे एकरूप होऊन गेलो असतो. व्यावहारिक पातळीवरची तीही एक प्रकारची समाधीच म्हटली तरी वावगे ठरू नये.

योगामुळे शरीर आणि मनाचे स्वास्थ्य चांगले होते. खासकरून योगाच्या विविध प्रकारांपैकी हठयोग पद्धतीमध्ये विविध आसने आणि त्यांचे रोगांवरील उपयोग यांचे वर्णन आढळते. प्राणायाम आणि श्वसनक्रिया आणि तद्संबंधीचे अस्थमा इत्यादी रोगासाठी उपयोगही सर्वश्रुतच आहे. योगाचा उपयोग हा ताणतणावर आणि त्याने उत्पन्न होणाऱ्या  घातक परिणामांवर काम करण्यासाठी केला जातो. पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर हा साधारणत: मोठय़ा प्रमाणात आढळणाऱ्या रोगातही योगाचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. विद्यार्थी आणि मोठमोठय़ा कंपन्यांमध्ये काम करणारे उच्चपदस्थ अधिकारी यांची एकाग्रता वाढवण्यासाठी, तसेच तणाव कमी करण्यासाठी योगाचा उपयोग होताना आढळतो. विविध दुर्धर रोगांमध्ये जसे कर्करोग, संधिवात, एचआयव्ही / एड्स हे रोग झालेल्या रुग्णांचे जीवनमान गुणात्मक स्तर उंचावण्याचे आणि सुधारण्याचे कामदेखील योग करतो.

भारतात कैवल्यधाम, लोणावळा येथे गेल्या वर्षी डिसेंबर २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय योग थेरपी (योग चिकित्सा) परिषदेचे आयोजन केले होते, ज्यामध्ये विविध देशांतून आणि भारतातून अनेक योगतज्ज्ञ / योगचिकित्सकांनी आपले संशोधनांचे वाचन सादरीकरण केले. विविध संस्थांमध्ये सध्या योग प्रशिक्षण आणि योग चिकित्सा आणि तत्संबंधीचे संशोधन सुरू आहे. इंडियन योगा असोसिएशनच्या छत्राखाली भारतातील योगप्रशिक्षक आणि योग चिकित्सक एकत्र झाले आहेत आणि कार्य करीत आहेत.

नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय योगदिनी अनेक जणांनी योगासने केली. पण केवळ योगदिनाच्या निमित्ताने एक दिवस योगासने आणि प्राणायाम न करता पद्धतशीर योग शिकू या आणि शारीरिक व  मानसिक स्वास्थ्य सुधरवू या.

First Published on July 9, 2019 7:54 am

Web Title: dharana meditation and samadhi in yoga zws 70
Next Stories
1 राहा फिट : वर्षां ऋतू आणि आरोग्य
2 काळजी उतारवयातली : पावसाळ्यात आरोग्याची काळजी
3 योगस्नेह : पश्चिम नमस्कारासन
X
Just Now!
X