26 February 2021

News Flash

मधुमेह आणि आहार

आहार हा मनुष्याच्या जीवनाचा महत्त्वाचा, आनंददायी आणि अविभाज्य भाग आहे. मधुमेह हा चयापचयाचा आजार असल्याने त्याचा आहाराशी जवळचा संबंध आहे.

डॉ. वृषाली देशमुख, मधुमेहतज्ज्ञ 

बदलत्या जीवनशैलीशी निगडित आजारांमध्ये मधुमेहाचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. मधुमेह झाला की काय खावे आणि काय खाऊ नये याची मोठी यादीच आपल्या अवतीभवतीचे लोक ऐकवत असतात. आहाराचे नियम पाळल्यास मधुमेह आटोक्यात ठेवणे कसे शक्य आहे हे येत्या १४ नोव्हेंबर या जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने समजून घेऊ या.

 

आहार हा मनुष्याच्या जीवनाचा महत्त्वाचा, आनंददायी आणि अविभाज्य भाग आहे. मधुमेह हा चयापचयाचा आजार असल्याने त्याचा आहाराशी जवळचा संबंध आहे. आपण जे काही खातो, त्याचे रूपांतर साखरेत आणि चरबीत होण्यास इन्सुलिन या संप्रेरकाचा जवळचा संबंध आहे. इन्सुलिनची कमतरता असल्यास अथवा इन्सुलिनचे कार्य बिघडल्यास रक्तातील साखरेचे व चरबीचे प्रमाण वाढून मधुमेह होतो.

मधुमेह नियंत्रणासाठी समतोल आहार व नियमित व्यायाम गरजेचा आहे. आहाराचे मुख्य घटक उदा. कबरेदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थ यांचा समतोल असणे गरजेचे आहे. असा आहार घेतल्यास शरीराची सर्व गरज भागते व थकवा टळतो. आपल्याला कबरेदके पिष्टमय पदार्थातून, धान्य, डाळी व कडधान्यांतून मिळतात. प्रथिने दूध, दुधाचे पदार्थ, डाळी, कडधान्ये, अंडी व मांसाहार यातून मिळतात. स्निग्ध पदार्थ तेल, तूप व तेलबियांमधून मिळतात. या घटकांतून आपल्याला ऊर्जा, प्रथिने, क्षार व जीवनसत्त्वे मिळत असतात; पण याच घटकांचा अतिरेक झाल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास व वजनवाढीस कारणीभूत ठरते म्हणूनच मधुमेही रुग्णांनी या सर्व घटकांचे सेवन आपल्या साखरेच्या पातळीनुसार, वजनानुसार, व्यायामानुसार आणि आपल्या औषधोपचारानुसार करणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या डॉक्टर, आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आहाराविषयी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यावी, ती म्हणजे आहारात भरपूर प्रमाणात चोथायुक्त (फायबरने समृद्ध) पालेभाज्या, कोशिंबिरी, अंकुरित कडधान्ये घेणे गरजेचे आहे. याने रक्तातील साखर व चरबी या अनुषंगाने वजन कमी राहण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते.

सर्वसाधारण व्यक्तीने व मधुमेही रुग्णांनी ५-३-२ हे सूत्र लक्षात ठेवावे. यात पाच भाग तंतुमय पदार्थ (हिरवे पदार्थ) ३ भाग पिष्टमय पदार्थ आणि दोन भाग प्रथिने असे प्रमाण सर्व वेळच्या जेवणात ठेवल्यास मधुमेह टाळण्यासाठी व नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते.

यासाठी रोजच्या आहारात पालेभाज्या, फळे, कोशिंबिरी व हिरव्या भाज्यांचा समावेश वाढवावा. पांढरे पदार्थ (उदा. भात, रवा, पोहे, साखर, मैदा, ब्रेड, इडली, डोसा, बेकरीजन्य पदार्थ व तूप) यांचे सेवन नियमित ठेवावे.

खाताना आपल्या शरीराला किती अन्नाची गरज आहे हे जाणून व समजून घेणे आवश्यक आहे. रोजच्या जेवणानेही आपले वजन सतत वाढत असल्यास हे अन्न आपल्या गरजेपेक्षा जास्त आहे असे समजावे. आपल्याहून कोणी जास्त खाते तरीही त्याचे वजन वाढत नाही, याकडे लक्ष न देता आपल्या शरीराला अन्नाची किती गरज आहे याचा विचार करावा. वजन वाढत असेल तर अन्नाचे प्रमाणासोबतच पदार्थाच्या निवडीवरही भर देणे आवश्यक आहे. उदा. भात खाल्ल्याने वजन वाढते, मधुमेह असेल तर रक्तातील साखर वाढते, म्हणून बरेच लोक साखरेचे प्रमाण वाढले किंवा वजन कमी करायचे असेल तर भात सोडतात; पण मग कमी खाल्ल्याने पोट भरत नाही म्हणून पोळीचे प्रमाण वाढवतात. पण असे करताना पोळी व भाताच्या सेवनाने साखर वाढते, वजन वाढते. त्यामुळे पोळी जास्त घेण्यापेक्षा सॅलड, भाजी, आमटी यांचे प्रमाण वाढवावे

किंवा दही, उसळ यांचे प्रमाण वाढवायला पाहिजे. त्याचबरोबर आहाराबद्दलचे गैरसमजही समजून घेतले पाहिजेत. उदा. मधुमेहींनी साखर खायची नाही; परंतु नैसर्गिक असे गूळ किंवा मधसुद्धा चालतो. हा फार मोठा गैरसमज आहे. शरीरात साखर, गूळ व मध हे सर्व एकाच प्रकारे काम करतात व सम प्रमाणात साखर वाढवतात. त्यामुळे हे तीनही पदार्थ टाळावेत.ह्ण मधुमेही रुग्णांनी काही सूत्रे पाळायला हवीत.

  • १) कमी प्रमाणात जेवा.
  • २) पथ्याचे खा.
  • ३) समतोल खा.
  • ४) घरचे ताजे अन्न खा.
  • ५) आपल्या भुकेनुसार खा.
  • ६) विचारपूर्वक खा.
  • ७) आणि जेवढे खाल ते पचविण्यासाठी रोज ३०-६० मिनिटे मनाचा व शरीराचा व्यायाम करा.

काही स्निग्ध पदार्थ मधुमेहींसाठी हानीकारक आहेत. ट्रान्सफॅट हा सर्वाधिक घातक आहे. डालडा, मार्गरीन इत्यादी पदार्थामध्ये हे मोठय़ा प्रमाणात असते. या प्रकारचे स्निग्ध पदार्थ वापरूनच मिठाई किंवा तत्सम गोड पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळावेत. त्याचप्रमाणे इतर स्निग्ध पदार्थसुद्धा कमीत कमी प्रमाणात वापरावेत. अति उकळले किंवा तापविले की त्यात ट्रान्सफॅट तयार होतात. हे तेल परत वापरले तर हे ट्रान्सफॅट तयार केलेल्या पदार्थात येतात आणि त्यामुळे मधुमेहीला त्रास होऊ  शकतो. स्निग्ध पदार्थात इतर अन्नपदार्थापेक्षा ऊर्जा अधिक प्रमाणात असते आणि त्यामुळे त्यांच्या सेवनाने वजन लगेचच वाढते. म्हणूनच स्वयंपाक करताना तेल, तूप, लोणी, ओले-सुके खोबरे, दाण्याचे कूट याचा वापर कमीत कमी प्रमाणात करावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 2:01 am

Web Title: diabetes and diet akp 94
Next Stories
1 हुलग्याचे सूप
2 अर्धचंद्रासन
3 गुडघेदुखी
Just Now!
X