12 July 2020

News Flash

मधुमेहाचे निदान

मधुमेह म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होणे किंवा वाढणे.

काळजी उतारवयातली : डॉ. नीलम रेडकर

मधुमेह म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होणे किंवा वाढणे. आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण स्वादुपिंडात पाझरणाऱ्या इन्शुलिन संप्रेरकामुळे नियंत्रित राहाते. इन्शुलिनचे महत्त्वाचे कार्य म्हणजे अन्नावाटे शरीराला मिळालेल्या ग्लुकोजचा वापर करणे आणि शरीराच्या पेशीत सामावून घेणे.

साधारणत: चाळिशीनंतर आढळून येणारा हा आजार आहे. मधुमेहाच्या इतर प्रकारांपैकी ‘टाइप २ मधुमेहा’चे प्रमाण उतारवयात अधिक प्रमाणात आढळून येतो. ‘टाइप २ मधुमेह’ हा इन्शुलिनचा प्रभाव कमी झाल्यामुळे होतो, ज्याला इन्शुलिन रेझिस्टन्स असेही म्हणतात. टाइप २ मधुमेहामध्ये इन्शुलिनचे प्रमाण सामान्य असू शकते. तर तरुणांमध्ये होणारा टाइप १ मधुमेह इन्शुलिनच्या कमतरतेमुळे होतो. मधुमेहामुळे अंधत्व, हृदयविकार, मूत्रपिंड किंवा मज्जासंस्थेचे विकार उद्भवू शकतात.

मधुमेहाची तपासणी-

  • मधुमेहाचे निदान करण्यासाठी फार खर्चीक चाचण्या कराव्या लागत नाहीत. मधुमेहाचे निदान करण्यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण सकाळी उपाशीपोटी (फास्टिंग शुगर) आणि जेवल्यानंतर दोन तासांनी मोजले जाते.
  • फास्टिंग शुगर किंवा उपाशीपोटी केलेल्या साखरेचे प्रमाण ७० ते ९९ मिलिग्रॅम/ डेसिलिटर
  • पी पी शुगर किंवा जेवल्यानंतर दोन तासांनी केलेल्या रक्तातील साखरेचे प्रमाण – १४० मिलिग्रॅम / डेसिलिटरपेक्षा कमी असले पाहिजे.
  • मधुमेहाचे निदान करण्यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण खालीलप्रमाणे असते-
  • उपाशीपोटी केलेल्या साखरेचे- १२६ मिलिग्रॅम / डेसिलिटरपेक्षा जास्त असते.
  • जेवल्यानंतर दोन तासांनी केलेल्या रक्तातील साखरेचे प्रमाण :- २०० मिलिग्रॅम/डेसिलिटरपेक्षा जास्त असते.
  • मधुमेह पूर्व अवस्था – (प्रिडायबेटिस) ही अवस्था मधुमेह होण्यापूर्वीची आहे.

मधुमेहाचे निदान होण्यापूर्वी साधारणत: तीन ते पाच वर्ष ही अवस्था असू शकते. रक्तातील साखरेचे प्रमाण या अवस्थेत सामान्यपेक्षा जास्त पण मधुमेहाचे निदान करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रमाणापेक्षा कमी असते. ही मधली अवस्था आहे. या अवस्थेत सकाळी उपाशीपोटी केलेल्या साखरेचे प्रमाण १०० ते १२६ मिलिग्रॅम / डेसिलिटर असते तर जेवल्यानंतर दोन तासांनी केलेल्या रक्तातील साखरेचे प्रमाण १४० ते २०० मिलिग्रॅम / डेसिलिटर असते. या अवस्थेत आहार आणि जीवनशैलीत योग्य तो बदल केला नाही तर रुग्णांना मधुमेहाचा विकार होतो.

 नियमित चाचण्या

  • मधुमेह रुग्णांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे तपासले पाहिजे. साखरेची पातळी कमी होणार नाही किंवा प्रमाणापेक्षा वाढणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. आजकाल ग्लुकोमीटरमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण मोजणे सहज शक्य झाले आहे. म्हणून प्रत्येक मधुमेही रुग्णांनी ग्लुकोमीटर जवळ बाळगणे गरजेचे आहे. त्यामुळे ते स्वत: साखरेचे प्रमाण पडताळून पाहू शकतात आणि त्याप्रमाणे आहारात बदल करू शकतात.
  • ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबीन- ही चाचणी मधुमेही व्यक्तींनी साधारणत: दर तीन महिन्यांनी केली पाहिजे. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये याचे प्रमाण ६.५ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर रक्तातील साखरेचे प्रमाण चालू असलेल्या उपचार पद्धतीनुसार नियंत्रित आहे असे म्हटले जाते. या चाचणीचे वैशिष्टय़ म्हणजे आपल्याला रक्तातील साखरेचे प्रमाण गेले दोन- तीन महिने कसे होते याचा अंदाज येतो. मधुमेहपूर्व अवस्थेत (प्रीडायबिटिस) हे प्रमाण ५.७ ते ६.४ टक्के इतके असेत. मधुमेह नसलेल्या रुग्णांमध्ये ४ ते ५.६ टक्के असते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असण्याचा धोका जास्त असतो. नियमितपणे रक्तदाब आणि ईसीजी तपासणे आवश्यक आहे. मधुमेहाच्या व्यक्तींनी मूत्रपिंड विकाराच्या चाचण्या, रक्तातील कोलेस्टरॉल आणि ट्रायग्लिसराइड प्रमाणसुद्धा नियमितपणे केले पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2019 2:42 am

Web Title: diabetes diagnosis akp 94
Next Stories
1 शीर्षांसन
2 भांडय़ांचा  हव्यास!
3 सदनिकेचा आकार आणि देखभाल शुल्क
Just Now!
X