22 October 2019

News Flash

घरचा आयुर्वेद : मधुमेह

विविध नैसर्गिक घटकांचा उपयोग करून मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास आयुर्वेदशास्त्र सांगते.

वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक ayurvijay7@gmail.com

गेल्या अनेक वर्षांपासून मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये मधुमेहाचे सविस्तर वर्णन केलेले आहे. मुळात ‘मधुमेह’ हा रोग मूत्राशी संबंधित आहे. मूत्राला माधुर्य येते आणि मूत्रप्रवृत्ती अनेक वेळा आणि मोठय़ा प्रमाणात होते. प्रमेह या रोगात मूत्राच्या स्वरूपात आणि प्रमाणात वाढ होते. प्रमेहाचे वात, पित्त आणि कफ या तीन दोषांनुसार २० प्रकार आहेत. कफदोषामुळे दहा, पित्तदोषामुळे सहा आणि वातदोषामुळे चार प्रकारांचा यात समावेश आहे. ‘मधुमेह’ हा प्रकार वातदोषामुळे होणाऱ्या प्रमेहाच्या चार प्रकारांपैकी एक आहे.

प्रमेह कसा होतो?

वर सांगितलेली कारणे घडल्यामुळे शरीरामध्ये ‘विकृत’ कफदोष निर्माण होतो. त्याला ‘क्लेद’ अशी संज्ञा आयुर्वेदाने दिली आहे. या क्लेदामुळे शरीरामध्ये जडत्व येते. कोणत्याही कामामध्ये उत्साह वाटेनासा होतो. हा क्लेद मूत्रवहन संस्थेमध्ये जाऊन त्या ठिकाणी विकृती निर्माण करतो आणि विविध प्रकारचे मेह उत्पन्न होतात. त्यापैकी एक ‘मधुमेह’ होय. मधुमेही व्यक्तींमध्ये क्लेद वाढल्याने हळूहळू धातू शिथिल व्हायला लागतात. मूत्राला माधुर्य येते. पुढे पुढे तर शरीरातील सातही धातूंचे ‘ओज’ शरीराबाहेर जाऊ  लागते आणि म्हणूनच मधुमेही व्यक्ती चिडचिड करताना आढळतात. काहींमध्ये एखाद्याविषयीची भीती निर्माण होते. ही लक्षणे ‘ओज’ कमी झाल्याने होतात. या रोगात एकूणच शरीराचे ‘माधुर्य’ वाढते. बऱ्याच रोग्यांमध्ये तळपाय, तळहाताची आग होते. काही मधुमेहीच्या हातपायाला मुंग्या येतात, ते बधिर होतात अशी तक्रार घेऊन येतात.

विविध नैसर्गिक घटकांचा उपयोग करून मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास आयुर्वेदशास्त्र सांगते. केवळ रक्तातील साखर कमी करणे हा या चिकित्सेचा उद्देश नाही तर त्याचबरोबर शरीराच्या झिजत चाललेल्या धातूघटकांची झीज थांबवून त्यांचे सारत्व वाढवणे हादेखील चिकित्सेचा उद्देश आहे. आवळा आणि हळद ही दोन औषधे मधुमेहात श्रेष्ठ आहेत. असे ‘वाग्भट’ या ग्रंथकाराने म्हटले आहे. या दोन औषधांचे चूर्ण प्रकृतीनुसार वैद्यकीय सल्ल्याने योग्य प्रमाणात घेतल्यास फायदा होतो. शिलाजीताचाही मधुमेहात काही प्रमाणात उपयोग होतो. मधुमेहामध्ये प्रामुख्याने कडू चवीच्या वनस्पतींचा उपयोग केला जातो. शरीरातील माधुर्य यामुळे काही प्रमाणात कमी होते. यामध्ये गुळवेल, गुडमार, काडेचिराईत, मेथी-बीज, जांभूळ-बीज आदी अनेक द्रव्यांचा समावेश होतो. मात्र त्या व्यक्तीस कोणते द्रव्य चिकित्सेसाठी वापरायचे हे मात्र त्या व्यक्तीची तपासणी करून ठरवावे लागते. केवळ ही सर्व द्रव्ये एकत्र करून ती कुणाही मधुमेही व्यक्तीने वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेणे हिताचे नाही. याखेरीज खैर व सुपारी यांचा काढा मधुमेही रुग्णांना प्रशस्त सांगितलेला आहे. प्रमेहगजकेसरी नावाचे एक औषधही मधुमेहासाठी सांगितलेले आहे. या औषधाबरोबरच गोड पदार्थाच्या खाण्यावर आपले संपूर्ण नियंत्रण असणे आवश्यक असते. वैद्यकीय सल्लागाराने दिलेल्या सल्ल्यानुसार साखरेचे, गुळाचे पदार्थ, मिठाई आदी टाळणे हिताचे ठरते. त्याचप्रमाणे योग्य प्रमाणात व्यायाम करणे, फिरायला जाणे या गोष्टीही चिकित्स्येला नक्कीच पूरक ठरतात. मधुमेही रुग्णांमध्ये ‘थकवा’ हे लक्षण खूप मोठय़ा प्रमाणावर आढळते. यासाठी अश्वगंधा, शतावरी आदी वनस्पतीजन्य औषधांचा उपयोग केल्यास थकवा कमी होतो. आवळा चूर्ण आणि हळद यांचे मिश्रण करून रात्री झोपण्यापूर्वी काही वेळ घेतल्यास त्यामुळे रात्री लघवीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे तेलिया असाणा ही वनस्पतीही मधुमेहात चांगली उपयोगी पडते.

First Published on September 17, 2019 4:05 am

Web Title: diabetes symptoms causes treatment and prevention zws 70