|| बापू बैलकर

कधीकाळी स्वप्नरंजन वाटणारी सेल्फ ड्रायव्हिंग म्हणजे स्वयंचलित मोटार आता प्रत्यक्षात उतरली आहे. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेतील फिनिक्स शहरात गुगलच्या स्वयंचलित मोटारच्या कार्यक्रमातून तयार झालेली वॉयमो या कंपनीने या ठिकाणी व्यावसायिक सेवा देण्यास सुरुवात केली आहे. भारतात अद्याप ही स्वयंचलित मोटार आली नाही, मात्र नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून स्वयंचलित मोटारीच्या दिशेने वाहनांचा प्रवास सुरू आहे.

 

लोक प्रवास करण्यासाठी आता यंत्रमानवाला पसंती देऊ लागले आहेत. त्यामुळे अनेक वाहन कंपन्या आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या स्वयंचलित मोटारींकडं गांभीर्याने पाहात आहेत. या स्वयंचलित कारमध्ये अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर असते. यात मुख्यत्वे पाच यंत्रणा एकत्रित काम करतात. कॉम्प्युटरव्हिजन, सेंन्सर फ्युजन, लोकलायझेशन, रस्ते नियोजन आणि नियंत्रण..

या सर्व यंत्रणा सध्या भारतात आलेल्या कारमध्ये अद्याप विकसित झाल्या नाहीत, मात्र ऑटोमोबाइल कंपन्या यावर मोठय़ा प्रमाणात काम करीत आहेत. आता ‘बोलती कार’ म्हणजे इंटरनेट कार ही संकल्पना आपल्याकडे रुजू लागली असून विविध प्रकारच्या सेन्सर व नेव्हिगेशनचा वापर कारमध्ये होत आहे.

व्हिजन आय संकल्पना ‘जगातील पहिली ५जी झिरो-स्क्रीन स्मार्ट कॉकपिट’ म्हटली जाते. ही संकल्पना वाहनाची नवी श्रेणी व्याख्यायित करणारी संकल्पना म्हणून विकसित करण्यात येत आहे, अशी श्रेणी जी ५जी ट्रॅव्हेलिंगच्या दुनियेत सर्वोत्तम असेल. या भविष्यवेधी कन्सेप्ट कारमधील ऑग्मेंटेड रियालिटी मॅप नेव्हिगेशन अधिक अचूक करते आणि दृश्य रूपातही दिसते. ज्याद्वारे वाहन स्वत:च पार्किंगची जागा शोधून पार्क होते. तसेच यात एज्युकेशन, लीझर, ड्राइव्हिंग, स्लीपिंग किंवा मीटिंग असे अनेक ड्राइव्हिंग मोड आहेत.

आर्टिफिशियल इंटिलेजन्स म्हणजे एआय आणि मशीन लर्निग याच्या मदतीनं ऑटोमोबाइल कंपन्या हे नवीन तंत्रज्ञान विकसित करीत आहेत. भारतीय वाहन बाजारात उतरलेल्या जगातील मोठय़ा वाहन कंपन्या ग्रेट वॉल मोटर्स, एमजी मोटर्स, मर्सिडीज, फॉक्सवॅगन आणि स्कॉडा या कंपन्यांनी गाडय़ांतील तंत्राबाबत आपली एक ओळख निर्माण केली आहे. या कंपन्यांनी वाहन प्रदर्शनात सादर केलेल्या काही कन्सेप्ट कारमध्ये या ऑटोनॉमस तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

दिल्लीत झालेल्या वाहन मेळाव्यात देशी व विदेशी वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या काही संकल्पित कार सादर केल्या आहेत. या वाहनांमध्ये वापरलेल्या तंत्राचा विचार करता आपल्याकडील वाहनांमधील सुरक्षा आणि सुविधांचे मानक बदलत आहे, असे म्हणावे लागेल. सुरक्षाप्रणालीचा विचार करता आतापर्यंत कारमधील एअरबॅग ही एक महत्त्वाची सुरक्षाप्रणाली. अपघातप्रसंगी वाहनचालक किंवा प्रवाशाला गंभीर इजा होण्यापासून वाचविणे हे या एअरबॅगचे काम. मात्र आता अपघातासारखे प्रसंगच घडू नयेत यासाठीच्या सुरक्षाप्रणालींवर भर दिला जात आहे.

वाहन कंपन्या यासाठी नव्या ऑटोनॉमस तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत असल्याचे दिसते. यात वाहनाचा अपघात टाळणे शक्य होणार आहे तसेच गाडी वाहतूक कोंडीत अडकली असेल तर ऑटो मोडमध्ये टाकल्यानंतर चालकांना स्टेअरिंग पकडून ठेवण्याची अथवा क्लच किंवा ब्रेकवर पाय ठेवण्याची गरजच राहणार नाही. गाडी आपोआप समोरील गाडय़ांच्या हरकतीनुसार चालत राहील. प्रसंगी चालक अशावेळी आपली इतर कामेही करू शकता. उदाहरणादाखल तो वर्तमानपत्रही वाचत बसू शकतो.

अपघात रोखणार

एमजी मोटर इंडियाने वाहन मेळाव्यात जागतिक पातळीच्या उत्पादनांची एक मोठी मालिका सादर करून मोबिलिटीचे भविष्य प्रस्तुत केले. या उत्पादनांच्या श्रेणीत ग्लोस्टर आणि माव्‍‌र्हल एक्सचा समावेश आहे, जे तिसऱ्या स्तराचे इंटेलिजंट ड्रायव्हिंग साध्य करण्यासाठी बनवलेले जगातील पहिले मास प्रॉडक्शन मोडेल आहेत. इंटरनेट, इलेक्ट्रिक आणि ऑटोनॉमस क्षमता यांचा समन्वय असलेली अत्याधुनिक उत्पादने विकसित करण्यावर एमजीचा भर असून ‘माव्‍‌र्हल एक्स’ त्याचाच एक भाग आहे. गाडीतील कॅमेरा आणि सेन्सरमुळे गाडीचा अपघात होण्यापासून रोखणार असून चालकाने दिलेल्या अनेक सूचना पाळणार आहे. तसेच गाडी चालकाला त्याच्या त्या दिवसातील कामांची आठवणही ती करून देणार आहे.

अ‍ॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट यंत्रणा

वाहन मेळाव्यात पहिल्या दिवशी माध्यम सत्रामध्ये रिलायन्स जिओ ‘अ‍ॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट यंत्रणा’ सादरकेली. ही यंत्रणा गाडीत बसविल्यास चालकाला वाहन चालविण्यास योग्य ते मार्गदर्शन व साहाय्य करणार आहे. तसेच वाहन चालविताना धोक्यांबाबत चालकाला सतर्क करणार आहे. या यंत्रणेशिवाय कंपनीने ‘ऑनबोर्ड डायग्नोटिक कार कनेक्ट’ हे डिव्हाईस सादर केले. ते चालकाला मोबाइलच्या माध्यमातून संभाव्य धोक्यांपासून वाचविण्यास मदत करणार आहे.

बटनावर दरवाजा उघडणार

गेल्या वर्षांत भारतीय वाहन बाजारात प्रवेश केलेल्या किआ या वाहन उत्पादक कंपनीने सेल्टॉस ही अत्याधुनिक कार बाजारात उतरवत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ही कंपनी आपल्या काही नवीन कार कार्निवल आणि हॉर्नबिल या गाडय़ा पुढील काळात आणत आहे. या कारमध्ये या ऑटोनॉमस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. गाडीचा दरवाजा बटन दाबल्यानंतर उघडतो, तर आसन बदल करण्यासाठीही बटनाचा वापर करण्यात आला आहे. मोबाइल इंटरनेटवर कारवर नियंत्रण आणता येते. पुढील वर्षभरात या कार बाजारात उतरविण्याचा कंपनीचा मानस आहे.

सेन्सरद्वारे कारवर नियंत्रण

ग्रेट वॉल मोटर्स ही परदेशी वाहन कंपनी. तिने भारतात वाहन उद्योगात मोठी गूंवणूक जाहीर केली असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत कार बाजारात आणणार आहे. कंपनीने आपल्या हॉवल या कारची झलक वाहन मेळाव्यात दाखवली असून या गाडीतही ऑटोनॉमस तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. कारमधील सेन्सरमुळे कार नियंत्रित करता येणार आहे. त्यामुळे अपघातावर नियंत्रण येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. पुढील वर्षांत ही कार बाजारात येईल.

bapu.bailkar@gmail.com