News Flash

सजण्याचा उत्सव

नवरात्री म्हटले की डोळ्यांसमोर येतात ते रंगीबेरंगी तारुण्याच्या उत्साहात सजलेले नऊ  दिवस. तरुणांना वेड लावणारा हा एक उत्सव.

|| देवेश गोंडाने

दांडिया मंदिरातून मैदानात आला व त्यात झालेले बदलही लोकांनी उत्साहाने स्वीकारले. त्यातूनच आज निर्माण झाले ते ‘डिस्को दांडिया’चे स्वरूप. वेशभूषा, रंगभूषा आणि दागिन्यांनी सजून तरुणाई जणू नयनोत्सव साजरा करीत आपल्यासोबत घेऊन आली ते नवे अर्थकारण. एकूणच तरुणाईला चैतन्य व ऊर्जा पुरविणारा हा देवीचा उत्सव आज अनेक तरुणांच्या हाताला मोठय़ा प्रमाणावर रोजगारही देत आहे हे विशेष.

नवरात्री म्हटले की डोळ्यांसमोर येतात ते रंगीबेरंगी तारुण्याच्या उत्साहात सजलेले नऊ  दिवस. तरुणांना वेड लावणारा हा एक उत्सव. भारतीय सणावारांमध्ये तरुण पिढीला रस नाही असे वाटत असले तरी या दिवसात जरूर बाजारात आणि दांडिया मैदानांवर फेरफटका मारला असता नऊ  दिवसांचे प्लॅनिंग करून ही मंडळी तयार असतात. मुख्य म्हणजे नुसते गरबा-दांडिया खेळण्यापुरता त्यांचा हा उत्साह नसतो, तर पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्यावर अनेकांचा भर असतो. त्यामुळे नवरात्रीच्या काळात नऊ  दिवस उपवास करणारी, पायात चप्पल न घालणारी व अशाच इतर काही गोष्टी करणारी तरुण मुले बहुसंख्येने दिसून येतात. भारतीय संस्कृतीवरला त्यांचा विश्वासच यातून दिसत असतो. पुढील नऊ  दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी ठरावीक अशा रंगांचे कपडे घालायला मिळावेत यासाठी तरुणाईने बाजारात गर्दी केली आहे.

एरव्ही पाश्चिमात्य कपडय़ांकडे झुकलेली नवी पिढी मोठय़ा हौसेने भारतीय वेषभूषेत या दिवसात नटून सजून फिरताना दिसते. तसेच दररोज नवनवीन काय करावे याचंही बेत तरुणांमध्ये चालत असतात. मुलींना नऊ  दिवसांत नऊ  रंगांचे कपडे परिधान करायचे असतात. मात्र आजकालची तरुण मुलंही हा ट्रेंड फॉलो करत आहेत. ज्यांचे नववर्षांचे संकल्प मोडकळीस निघालेले असतात, अशांना त्यांचे संकल्प या नऊ  दिवसांत पूर्ण करण्याची संधी असते. त्यामुळे एकमेकांनी काय संकल्प केला आहे याची चर्चाही सुरू झाली आहे. गरब्याला असणारे धार्मिक पवित्रतेचे वलय बाजूला पडून त्या जागी एका ‘मस्त मस्त डिस्को दांडिया’ने ती जागा घेतली हे खरे असले तरी बेरोजगारीच्या छटा सोसणाऱ्या तरुणाईच्या हाताला यानिमित्ताने रोजगार मिळत आहे. साध्या टॅटू काढण्यापासून ते गरब्याचे शिकवणी वर्ग घेण्यापासूनच्या कामात तरुणांचा सहभाग असतो. त्यामुळे तरुणांच्या नवरात्रीच्या उत्साहाने नवे अर्थकारण निर्माण केले हेही तेवढेच खरे. राज्याच्या उपराजधानीचे शहर असलेल्या नागपूरसह पुणे, मुंबई अशा शहरांमध्येही तरुणाईला हे नवे रोजगार देत आहेत. टॅटू काढणाऱ्यांना वर्षभराचा व्यवसाय या नऊ दिवसांत मिळत असल्याचे यांनी सांगितले. तर गरब्याची शिकवणी घेणाऱ्यांसह डी.जे. वेषभूषा व विविध आभूषण तयार करणाऱ्यांनाही रोजगार मिळत आहे.

उपवासाचा संकल्प

संकल्पांशिवाय देवीवर भक्ती असणारी तरुण मंडळी आवर्जून तासन्तास रांगा लावून विविध मंदिरांमध्ये देवीचे दर्शन घेताना दिसतात. गणपतीच्या सणातही हीच मंडळी रात्रभर जागून विविध मंडपांमध्ये गणपतींचे दर्शन घेतात. नवरात्रीमुळे त्यांच्या या उत्साहाला अधिक जोम चढतो. अगदी वैष्णोदेवीला गेल्याचा उत्साह तेव्हा मुलामुलींमध्ये असतो. मग अगदी उपवास केलेला असला तरी त्याची फिकीर न करता तरुण मुले रांगा लावतात. नवरात्रींमध्ये अनेक प्रौढ माणसे उपवास करतात, पण आजकाल उपवास करण्याचा नवा ट्रेंड तरुणांमध्येही दिसतो आहे. ग्रुपच्या साथीने नऊ दिवसांचे उपवास करण्यात एक वेगळीच मजा असते, असे काही तरुणी सांगतात. अर्थात ‘डाएट कॉन्शस’ असणाऱ्या तरुण मुलांना या उपवासाचा फायदाच होतो.

ब्युटी पार्लर व्यवसाय 

गरब्यामध्ये केशरचना हा तितकाच महत्त्वाचा घटक आहे. केसांची बांधणी आणि त्यांना व्यक्तिमत्त्वानुसार आकार दिल्यास उठावदार व्यक्तिमत्त्व दिसते. त्यामुळे गरब्यासाठी ब्युटी पार्लरच्या व्यवसायालाही उभारी येते. अनेक ब्युटी पार्लर नवरात्रीच्या काळात ‘गरबा लुक’साठी सवलती देतात. त्यामुळे जर शक्य असल्यास अशा सवलतींचा फायदा घेता येतो, असे प्रसाधना ब्युटी पार्लरच्या मंजूषा यांनी सांगितले.

एक पेन, एक वहीचे आवाहन

नागपूरच्या लक्ष्मीनगर परिसरामध्ये युवा मंडळींच्या ग्रुपकडून मोठय़ा उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यानिमित्त दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी असते. परंतु हे सगळे करत असताना या मंडळातील तरुणाई सामाजिक भानही जपते. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्यांना प्रसाद, हार-फूल आणण्यापेक्षा एक वही आणि एक पेन दान करण्याचे आवाहन केले जाते. या माध्यमातून वह्य़ा पेन जमा करून त्या समाजातील गरीब विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्याचे काम या मंडळाचे तरुण करतात.

अनेकांचा पेहराव त्याच ढंगाचा

विविध संकल्पनांवर आधारित ‘गरबा नाइट’ महाविद्यालयांमध्ये आहेत. अनेकांचा पेहराव त्याच ढंगाचा असतो. काहींनी कपडे खरेदी न करता घरात कपाटात पडून असलेल्या कपडय़ांचे ‘फ्यूजन’ साधले आहे. यातून वेगळे दिसणे हा उद्देश साधला जात आहे. ‘रेशम धागा’च्या स्टाइल डिझायनर पूजा सांगतात, भरजरी घागरा वर्षांतून एकदाच परिधान केला जातो. यासाठी साडी हा उत्तम पर्याय असतो, असे पूजा म्हणाल्या. जुनंच आहे, पण नव्याने दिसण्याचा प्रयत्न असेल तर काठापदराची साडी घागरा म्हणून नेसता येते. त्यावर भरजरी जामेवार कापडाचा दुपट्टा, याशिवाय साडीच्या घागऱ्यावर पूर्ण लांबीचे जॅकेटही उत्तम पर्याय असेल. गरबा मराठी असतो, ही संकल्पना त्यात आताशा रूढ झाली आहे. पाश्चिमात्य गरबा कपडय़ांमधून दिसतो. जीन्स आणि केडिया स्वरूपाचा टॉप नजाकतदार पर्याय आहे. यात तरुण आणि तरुणींसाठी पर्याय आहेत. मुलांसाठी जॅकेट उपलब्ध आहेत. मराठी गरब्यात दागिन्यांचा आविष्कार तितकाच महत्त्वाचा आहे. यात केवळ जाडदार ठुशी घालण्याचा पर्याय मुलींसाठी आहे, असे त्यांनी सांगितले. वेगळे दिसणे आहेच, पण त्यासोबत आत्मविश्वासही मिळतो, असेही त्या म्हणाल्या.

गरब्याच्या शिकवण्या

उठावदार दिसण्यातच सर्व काही सामावलेले असे नाही. नृत्य हा त्याचा अविभाज्य भाग आहे. दांडियाच्या आणि रास गरब्याचे पदलालित्य शिकून घेणे आवश्यक आहे. ते जमल्यास अनेकांना त्याची भुरळ पडेल. गरबा नृत्य शिकवणे सध्या सुरू आहे. यातील पदलालित्य शिकण्यासाठी सध्या शहराच्या अनेक भागांत शिकवणी वर्ग सुरू आहेत. सुरू असलेल्या शिकवणी वर्गाने सांगितले की, ही नवरात्र उत्सवाच्या महिन्याभराआधीच आम्ही शिकवणी वर्ग सुरू करतो. सध्या तरुणाईचा ओढा गरब्याकडे चांगलाच वाढला आहे. त्यामुळे शिकवणी वर्गात गर्दी वाढली असून आम्हालाही चांगला रोजगार मिळत आहे.

विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात शिक्षण घेत असल्यामुळे येथे गरबा नाही, पण बाहेरील आयोजनात सहभागी होण्याचा विचार आहे. तिथे मित्र-मैत्रिणी असतीलच. नृत्याचे धडे घेतलेच आहेत. पहिल्यांदाच गरबा आयोजनात जात असल्याने उत्साह आहे. मराठी गरब्याला साजेल अशा पेहरावावर भर आहे. – रोहिणी चव्हाण, रातुम नागपूर विद्यापीठ

रायसोनी अभियांत्रिकीकडून दरवर्षीच गरबा उत्सव साजरा केला जातो. यात मी मागील वर्षांपासून सहभागी होत आहे. यंदाही गरब्यात सहभागी होण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. या वर्षांला घरातील काही जुन्याच कपडय़ांमधून वेशभूषा तयार करण्याचा विचार सुरू आहे. – तृप्ती मेश्राम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2019 2:55 am

Web Title: disco dandiya jewellery navratri utsav akp 94
Next Stories
1 कुल्फी कबाब
2 कॉलेज आठवणींचा कोलाज : अर्थशास्त्र ते अभिनय
3 अर्धागवायू
Just Now!
X