|| वैद्य विनीता कुलकर्णी

मस्त पावसाळी हवा, हिरवागार निसर्ग आणि अशा वातावरणात गरम कांदाभजी, मक्याचे कणीस मनाला अगदी प्रसन्न करते. पण नेमका इथेच गोंधळ होतो, पावसाळी हवा, चमचमीत पदार्थाचा घेतलेला मनसोक्त आस्वाद बऱ्याचदा आरोग्य बिघडवणारा ठरतो. म्हणूनच आपले आरोग्य उत्तम असेल तरच आपण पावसाचा आनंद घेऊ  शकतो हे लक्षात ठेवून काही गोष्टी पाळायला हव्यात.

थंड हवा, मधूनच येणारा दमटपणा यांमुळे सर्दी, डोकेदुखी, खोकला हे त्रास होतात. घसा बसला, सर्दीची सुरुवात झाली की गरम पाणी प्यावे. गरम पाणी हे कफासाठी उत्तम औषध आहे.

  • त्रिफळा चूर्ण हे जंतुघ्न म्हणून कार्य करते. दोन ग्लास पाण्यात दोन चमचे त्रिफळा चूर्ण घालून पाणी उकळावे. या पाण्याने गुळण्या केल्या तर जंतुसंसर्ग कमी होतो.
  • सितोपलादी चूर्ण, पिंपळी पावडर, सूक्ष्म त्रिफळाच्या गोळ्या, ज्येष्ठमध पावडर ही औषधतज्ज्ञांना विचारून घेतल्यास उत्तम काम करतात.
  • दालचिनी, लवंग, गवती चहा, ज्येष्ठमध, सुंठ पावडर पाण्यात घालून उकळून घेतल्यास सर्दी लवकर आटोक्यात येते.
  • पारिजातकाच्या पानांचा काढा २-३ वेळा दिल्यास ताप, अंगदुखी लवकर कमी होते. पानं न मिळाल्यास पारिजातक वटी २-३ वेळा गरम पाण्यासह घेतल्यास आराम मिळतो.
  • पावसाळ्याच्या दिवसात आहारात दही, ताक घेऊ नये. गरम सूप, गरम कढण घेतल्यास घशालाही बरे वाटते.
  • बाहेर जाताना कानटोपी/ स्कार्फचा उपयोग करावा. पावसाळ्यात डोके जड होणे, सर्दी बाहेर न पडल्यामुळे डोके दुखणे या तक्रारी फार जाणवतात. अशा वेळी तव्यावर कापड गरम करून शेकावे. लवकर आराम मिळतो.
  • पावसाळी हवेत पाणी दूषित असते. शिवाय चमचमीत पदार्थाचा मोह टाळताही येत नाही. परिणाम म्हणजे जुलाब, आव पडणे, पोटदुखी या तक्रारी आढळतात. त्यासाठी घ्यायची महत्त्वाची काळजी म्हणजे पाणी उकळून पिणे. एक ग्लास पाण्यात चमचाभर बडीशेप आणि पाव चमचा सुंठ पावडर घालून उकळावे. हे पाणी पोटदुखी, मुरडा येणे अशी लक्षणे कमी करते.
  • ओवा ५-६ दाणे त्यात चिमूटभर मीठ घालून चावून खावा. त्याने पोटदुखी, अजीर्ण लवकर कमी होते.
  • जेवणामध्ये गरम पाणी प्यायल्यास पोटात वायू होणे, पोट जड होणे या तक्रारी उद्भवत नाहीत. पोटावर एरंडेल तेल लावून शेकवल्यास किंवा हिंगाचा लेप लावल्यास लहान मुलांना विशेष उपयोग होतो. शंखवटी, सूतशेखर यांसारखी अनेक औषधे उपयुक्त असतात, पण त्यांचा डोस मात्र व्यक्तीपरत्वे भिन्न असतो. पोटाची तक्रार निर्माण झाल्यास आहार पचण्यास हलका हवा.
  • मुगाचे वरण, मुगाची खिचडी, धिरडे (घावण), सूप, उपमा, तांदळाची उकड, भाताची पेज अशा स्वरूपाचा आहार पौष्टिक आणि पचायलाही हलका असतो. नोकरदार व्यक्तींनी धिरडे, राजगिरा लाडू, उपमा डब्यात घेऊन जावा.
  • थर्मासमध्ये सूप नेता येऊ शकते. पचनशक्ती मंदावल्याने रोजची पोळी भाजी ब्रेड वगैरे पचत नाही आणि वारंवार त्रास होत राहतो. म्हणून आहाराचे पथ्य औषधांइतकेच महत्त्वाचे आहे.
  • पावसाळ्यात त्वचेची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे असते. उन्हाचा पत्ता नसल्यामुळे कपडे दमट राहतात. सतत पाण्यात राहिल्याने पायाच्या त्वचेवर चिखल्या होतात. बऱ्याचदा त्वचेवर पित्त उठतं म्हणजे खाज येऊन गांधी उठतात. यासाठी काळजी घ्यायची म्हणजे कपडे नीट सुकवावेत. पावसात भिजल्यास पायाच्या बोटांचा मधला भाग नीट कोरडा करावा.
  • थंड वाऱ्यात जाताना स्वेटर घालावा. गांधी उठल्यास आमसुलं पाण्यात भिजवून ते पाणी चोळावं. डायबेटिस असणाऱ्या व्यक्तींनी संसर्ग होण्यापासून विशेष जपावे. बंदिस्त अवयवांवर पावडर घालून ठेवावी. उदा. जांघेचा भाग, काख, पोट, पाठ या ठिकाणी पावडर लावावी.
  • साथीच्या रोगांपासून दूर राहण्यासाठी स्वच्छता पाळणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी उकळलेले असावे. शक्यतो घरून घेऊन यावे. बाहेरची फ्रूट डिश (कापून ठेवलेली फळं), ज्यूस, लस्सी, मिल्कशेक टाळावेत.
  • उघडय़ावरचे अन्न टाळावे. रोज नियमित व्यायाम, योगासने, प्राणायाम करावा. त्यामुळे प्रतिकारक्षमता वाढते.