|| देवेश गोंडाणे

‘दिवाळी’ हा शब्द उच्चारला, तरी आपल्या अंगात उत्साह संचारतो, मन हर्षोल्हासित होते. नवी खरेदी, फराळाचे नानाविध पदार्थ, रांगोळी-रोषणाई, भेटवस्तू आणि आनंदीआनंद अशा वातावरणाची आस आपल्याला लागते. घरातील साफसफाईची लगबग सुरू होते. ‘दिवाळी पहाटे’च्या कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची मनोमन तयारीही होते. सध्याच्या डिजिटल युगात पारंपरिक दिवाळीलाही आधुनिकतेचे परिमाण लाभले आहे. दुसरीकडे, मंदीचीही किनार या दिवाळीला आहे. या पाश्र्वभूमीवर, महागाई आणि दिवाळीचा बाजार, पारंपरिक बाजारपेठांवर ऑनलाइन मार्केटची कुरघोडी, भेटवस्तूंचे बदलते ट्रेंड, गडकिल्ले बांधणीची लयास जाऊ  लागलेली परंपरा हे सर्व आलेच. प्रकाशाचा हा उत्सव उंबरठय़ावर उभा आहे. रंगात रंगून रांगोळ्या अंगणात सजण्यासाठी तयार आहेत.

पण आपले अनाथ बांधव, पुढारलेपणाच्या उन्मादात विसरत गेलेला आपला ऐतिहासिक वारसा? त्याचे काय?.. या नकारात्मकतेला सकारात्मक कृतीत उतरवीत प्रकाशाचे हे पर्व वंचितांचे चेहरे उजळविणारे ठरावे या उद्देशाने समाजाचे देणे म्हणून काम करीत असलेल्या संस्थांचा घेतलेला हा आढावा..

दुर्लक्षित ऐतिहासिक मंदिरांमध्ये ‘अरण्य’चा दीपोत्सव

उपराजधानीतील ‘अरण्य’ नावाची संस्था काही वर्षांपासून करीत आहे. शहरामध्ये असणाऱ्या ३०० ते ४०० वर्षे ऐतिहासिक पुरातन मंदिर आणि किल्ल्यांची दिवाळीमध्ये स्वच्छता करून दोन ते तीन हजार दिव्यांनी लख्ख उजळून काढते. मुळात पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या राज मदनकर यांच्या ‘अरण्य’ या संस्थेने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही वर्षांआधी दीपोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला. पण हे करीत असताना काही तरी कार्यक्रम घेणे, गोडधोड, भेटवस्तू देणे या चाकोरीबद्ध मार्गाचा अवलंब न करता आपली संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचा निर्धार केला. आणि शोध सुरू झाला शहरातील शेकडो वर्षे पुरातन असणाऱ्या शहरातील वास्तूंचा. आपल्याकडे शेकडो वर्षे जुने असणाऱ्या जुन्या वास्तूंचे जतन होताना दिसत नाही. त्या दुर्लक्षित असतात. शहरातील ऐतिहासिक मंदिरे, किल्ले यांची यादी केली. त्यांचा इतिहास आणि महत्त्व समजून घेतले आणि यातील एका मंदिराची निवड करीत तेथे दीपोत्सव साजरा करण्याचा प्रवास सुरू झाला. दुर्लक्षित असणाऱ्या या ऐतिहासिक मंदिरांची स्वच्छता आणि रोषणाई करून उजळून काढले. मागील वर्षी ३५० वर्षे जुने कास्ट कलेचा उत्तम नमुना असलेल्या रुक्मिणी मंदिरात दीपोत्सव रंगला. मंदिराची पूर्ण सफाई करून २५०० दिव्यांच्या रोषणाईने मंदिरात चारचांद लावले. अरण्य एवढय़ावर थांबलेली नाही. मंदिराचा इतिहास इतरांनाही कळावा म्हणून काही सांस्कृतिक कार्यकमांचेही आयोजन त्या परिसरातच केले जाते. यात भारुड, भजन, पोवाडे यांची मैफल रंगते. काही नवकलाकार गिटारच्या ताराही छेडतात. अशा सांस्कृतिक मेजवानीतून त्या पुरातन वास्तूचा इतिहास आणि समाजामध्ये तिचे आकर्षण वाढविण्याचे काम अरण्य करते. आता दिवाळी म्हटले की फराळ आलाच. पण पालकांच्या प्रेमाला पोरके झालेल्या अनाथांना, परिस्थितीने खचलेल्या परिवारांना दिवाळीसारखा तेजोमय उत्सवही अन्य दिवसांसारखाच असतो. त्यामुळे अशा पोरके झालेल्या अनाथ, वंचितांना फराळ आणि लहानशी भेटवस्तू देऊ न त्यांनाही दिवाळी तेजोमय करण्याचे कामही अरण्य करते.

विद्यार्थ्यांचा प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प

राज्यात दिवाळीत फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आता शालेय शिक्षण विभाग पुढे सरसावला आहे. यानिमित्ताने होणारे वायूप्रदूषण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीने दिवाळीत ‘प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊ न ठेपलेल्या दिवाळीसाठी सगळे सज्ज झाले आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून दिवाळीदरम्यान वाढलेल्या फटाक्यांच्या वापरामुळे प्रदूषणाचे प्रमाणही वाढले आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे मोठय़ा शहरांमध्ये आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असून वाढते प्रदूषण कमी करण्याचे प्रमुख आव्हान आपल्या सगळ्यांसमोर आहे. त्यामुळे याप्रकरणी जनजागृती करण्याचे राज्य सरकारने निश्चित केले असून त्यानुसार विद्यार्थ्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्याचे शालेय शिक्षण विभागाने निश्चित केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती झाल्यास प्रदूषणाचे प्रमाण नक्कीच कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जाते आहे. सर्व सण-उत्सवांचे निसर्गाशी अतूट नाते आहे. त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करताना निसर्गाचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. दैनंदिन जीवनात प्लास्टिकमुळे प्रदूषण होते. त्यामुळे प्लास्टिकचा वापरही टाळणार. तसेच दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, त्यामुळे फटाके उडवून पर्यावरणाचा ऱ्हास करणार नाही, अशी शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली.

वंचितांच्या दिव्यातील वात ‘उपाय’ झाली

फुटपाथवर अनेक कुटुंब उघडय़ावर आयुष्य जगताना त्यांच्यासोबत त्यांची मुले राहात असतात. ही लहान मुले चौकातील सिग्नलवर भीक मागत असतात. अशा फुटपाथवर जीवन जगणाऱ्या आणि शिक्षणापासून वंचित असणाऱ्या या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या आठ वर्षांपासून ‘उपाय’ नावाची संस्था काम करीत आहे. केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातसुद्धा अशा भटक्या आणि फुटपाथ किंवा रस्त्यावर जीवन जगणाऱ्या मुलांना एकत्र आणून शिक्षणासोबत या मुलांच्या वस्त्यांमध्ये दिवाळीची रोषणाई करण्याचे कामही या संस्थेच्यावतीने केले जात आहे.मौदा येथील एनटीपीसीजवळील आजूबाजूच्या गावात राहणाऱ्या आणि आर्थिकदृष्टय़ा कमजोर असलेल्या कुटुंबातील मुलांना त्या भागात शिक्षणाची कुठलीच सोय नसल्यामुळे आणि तशी त्या लोकांची आर्थिक स्थिती नसल्यामुळे तेथील मुले रस्त्यावर दिवसभर हुंदडत जीवन जगत होती. खडकपूर येथून आयआयटी करून एनटीपीसीमध्ये कामाला असलेल्या वरुण श्रीवास्तव यांनी त्या भागातील रस्त्यावरील भटकणाऱ्या मुलांची दशा बघितली आणि त्यांनी त्या भागात १५ मुलांना सोबत घेऊ न त्यांना शिक्षण देणे सुरू केले. केवळ शिक्षण नाही त्यांच्यावर चांगले संस्कार घडावे, या दृष्टीने त्यांनी स्वत: जवळचा पैसा खर्च करीत मुलांना वेगवेगळ्या शैक्षणिक वस्तूचे वाटप करीत त्यांना शिक्षण देणे सुरू केले. दिवाळीसारखा सण या संस्थेत मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो.

शाळेसह विद्यार्थ्यांच्या वस्त्यांमध्येही दिव्यांची रोषणाई करण्याचे काम ‘उपाय’चे स्वयंसेवक मोठय़ा उत्साहाने करतात. केवळ गोडधोड, फराळच नाही तर या मुलांच्या बालसभा घेत दिवाळीसारख्या सणाचे महत्त्व समजावले जाते. दिवे तयार करणे, त्यात रंग भरणे असे उपक्रमही विद्यार्थ्यांकडून केले जातात.

दुसऱ्यांना देता देता सहज आनंदाने जगण्याचे धडेही येथे या मुलांना दिले जातात.  साधारण शहरातील सिग्नलवर भीक मागणारी जी मुले असतात, त्यांना पैसे मागण्याच्या सवयी लागू नये, यासाठी त्यांच्या पालकांचे सुद्धा मार्गदर्शन ही ‘उपाय’ची चमू करीत असतात आणि त्याचा परिणाम म्हणून शंभरपेक्षा अधिक रस्त्यावर भीक मागणारी मुले शाळेत जाऊ  लागली आहेत. उपाय संस्थेच्या माध्यमातून नागपुरात नऊ केंद्रे सुरू आहेत. याअंतर्गत फुटपाथवरील ५५० मुलांना शिक्षण दिले जात आहे.