रमेश विष्णू पाटील, पीक , पालघर

माझ्या पीक या गावाला १२५ वर्षांचा नाटय़ परंपरेचा इतिहास आहे. दरवर्षी हनुमान जयंतीला गावातीलच कलाकार नाटय़प्रयोग सादर करीत असतात. परिसरातील व लांबचे नातेवाईक असे एक-दीड हजार नाटय़रसिक या नाटय़प्रयोगांस हजेरी लावतात. आमच्या गावातील प्रत्येक जण नाटय़वेडा आहे.  मीदेखील दरवर्षी होणाऱ्या गावातील नाटय़प्रयोगांमध्ये सात ते आठ वेळा कलाकार म्हणून सहभागी झालो आहे. लहानपणापासून नाटकाची आवड असल्याने नाटक पाहाणे माझ्यासाठी जीव की प्राण, पण रोजच्या धावपळीत गेली अनेक वर्षे नाटक पाहाण्यापासून वंचित राहावे लागले होते. करोनामुळे गेले काही दिवस घरात स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ आली आहे. अजून बरेच दिवस स्वत:ला कोंडून घ्यावे लागणार आहे, पण मी आता  रोज मराठी नाटय़भूमीवर गाजलेल्या नाटकांचा आस्वाद घेत आहे. यूटय़ूबवर रोज तीन-चार नाटके बघून मनमुरादपणे हसत आहे. दिवस कधी संपतो कळतच नाही. पंधरा दिवस घरात पुरेल इतका किराणा सामान घेऊन ठेवले आहे. दारात येणाऱ्या पालेभाज्या व फळभाज्या घेत आहे. मुलगा टीव्ही, मोबाइलमध्ये दंग आहे. मुलगी मेडिकलच्या शेवटच्या वर्षांला असल्याने ती अभ्यासात गर्क आहे. बायको स्वयंपाक, टीव्ही मालिकांमध्ये गर्क आहे आणि मी मोबाइलमधील यूटय़ूबवर मराठी नाटकांमध्ये स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यामुळे घरात आम्हा कुणाला कोंडून घेतले आहे असे वाटतच नाही.

संगीताचा छंद जपतेल्ल  अश्विनी आत्माराम कांबळे

२१ दिवस संचारबंदी ही आपल्या सर्वासाठी एक संधी आहे, करोना विषाणूला कायमचे हरवण्याची.  गेल्या कित्येक वर्षांपासून आपण आपल्याच कुटुंबाला कामानिमित्त असो किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे वेळ दिलेलाच नाही.. तो वेळ भरून काढण्याची.. आधी शाळा, कॉलेज, पुढे उच्च शिक्षण, नोकरी, लग्न आणि नंतर संसार या सर्व गोष्टींमध्ये एवढं गुंततो की, आपल्याच जवळच्या व्यक्तीला आपण वेळ देऊ शकत नाही, आईवडिलांशी नीट संवाद साधू शकत नाही. आता त्यांच्याकडेही स्मार्ट फोन आले आहेत, त्यामुळे तेदेखील त्या फोनमध्ये गुंतलेले असतात. आता या दिवसांत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्व एकत्र आले आहेत. मग कित्येक काळ जो आपण त्यांच्याशी संवाद साधलेलाच नाही, तो या काळात साधण्याची संधी आहे ना.. खरं तर आपल्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहणाऱ्यांना आपल्यापेक्षा आयुष्याचे बरेच बारकावे माहिती असतात. एखाद्या संकटाशी खमकेपणाने मात करावी यासाठीचे अगणित अनुभव त्यांच्या गाठीशी असतात. त्यांच्याकडून या गोष्टी आपण नक्कीच ऐकू शकतो. यामुळे त्यांच्याही मनातल्या गोष्टी आपल्याला कळतील आणि त्यांनाही त्यांनी जगलेला काळ नव्याने पुन्हा आठवणीच्या माध्यमातून जगता येईल. आम्ही सारेच असे वागण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत.  समाजमाध्यमांवरून अनेक गमतीशीर संदेश येत राहतात- एक किलो डाळीत, तांदळात किती दाणे.. किं वा मीम्स फिरतात; पण तरुणांनी हे उद्योग करण्यापेक्षा घरातच असलेल्या आई-बहीण-पत्नी यांना स्वयंपाक करण्यात मदत करावी, त्यांनाही बरे वाटेल. हेही नाहीच जमले तर किमान त्यांनी बनवलेल्या जेवणाला नावे न ठेवता, भरभरून स्तुती तर करा. त्यांनाही गेल्या कित्येक वर्षांत अशा कौतुकाची पावती मिळाली नसणार. आपल्या अडगळीत पडलेल्या छंदांना वर काढण्यासाठी तर हा रिकामा वेळ अगदी योग्य आहे. मला गाण्याचा छंद आहे. माझी ही आवड मी सध्या मोठय़ा उत्साहाने जपते आहे. नवनवीन गाणी, संगीतरचना ऐकते आहे आणि माझा वेळ सत्कारणी लावत आहे.