22 September 2020

News Flash

अपकेंद्री बल

कितीही पाऊस असला तरी कपडे धुणे हे अटळ आहेच!

घरातलं विज्ञान : सुधा मोघे-सोमणी,मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग

कितीही पाऊस असला तरी कपडे धुणे हे अटळ आहेच! हे धुतलेले कपडे सततच्या पावसामुळे २-३ दिवस झाल्याशिवाय वाळत नाहीत व दमट राहतात. त्यामुळे ‘फंगल इन्फेक्शन’ होण्याचा संभव वाढतो. अशा वेळी वॉशिंग मशिन अत्यंत उपयोगी ठरते. वॉशिंग मशिनच्या ‘ड्रायर’ यंत्रणेमुळे धुतल्यानंतर कपडे अंशत: कोरडे होतात व नंतर लवकर वाळतात. त्यामुळे पावसाळय़ात ‘ड्रायर’ आपल्याला खूप उपयोगी पडतो.

ड्रायर हा अपकेंद्री बल (सेट्रिफ्युगल फोर्स) या तत्त्वावर काम करतो. वॉशिंग मशिनचा ड्रम सच्छिद्र असतो. जेव्हा तो ड्रम मोटरमुळे फिरतो तेव्हा त्यातील कपडे व पाणी मोटारीने दिलेल्या गतीने फिरतात. अशाप्रकारे फिरत असताना पाणी व कपडे दोहोंवर अपकेंद्री बल कार्यरत असतो. सच्छिद्र ड्रममधून पाणी बाहेर निघून जाते. पाणी निघून गेल्यामुळे हे कपडे कमी वेळेत वाळून निघतात. जेव्हा आपण कोणत्याही वस्तूला वेगाने गोल गोल फिरवतो, तेव्हा अपकेंद्री बल कार्यान्वित होते. अशा वेळेस ती वस्तु या बलामुळे केंद्रापासून लांब फेकली जाते. या अपकेंद्रीय बलावर आधारित सेंट्रिफ्युज मशिन (पंप) हे तयार केले गेले. त्यांचा उपयोग घरापासून ते अणूउर्जाक्षेत्रापर्यंत होतो. औद्योगिक क्षेत्रात खासकरून केमिकल उद्योगांमध्ये सेंट्रिफ्युज पंपचे अनेक फायदे आहेत. या मशिनच्या सहाय्याने द्रव पदार्थ ठरावीक वेगाने गोल फिरवले जातात. हा फिरण्याचा वेग १००००-२३००० आरपीएम इतका असू शकतो. तसे करताना द्रवातील घटक त्यांच्या घनतेनुसार वेगळे होतात. अपकेंद्री बल आपल्याला अनेक वेळा मदत करीत असतो. दह्यापासून लोणी काढतानादेखील याच बलाचा वापर होतो. दह्यातील स्निग्ध पदार्थाचे हलके रेणू वेगळे होऊन वर येतात व ताक खाली राहते. पूर्वी रवीच्या साह्याने दही घुसळून लोणी काढले जाई. आजकाल मिक्सरमुळे ही प्रक्रिया अगदी सोपी आणि वेगवान झाली आहे.

दुधापासून साय (क्रीम) वेगळे करण्याकरिता देखील अपकेंद्री बलाचा वापर केला जातो. सेंट्रिफ्युज मशिनमध्ये हलकी असलेली साय (क्रीम) अपकेंद्री बलामुळे वर येते व दूध खाली राहते. हे स्किम मिल्क मग बाजारात येते व क्रीम वेगळी विकली जाते.

रक्ताची तपासणी करताना देखील या तत्त्वाचा वापर केला जातो. अनेक वेळा रोग्याला रक्त द्यावे लागते. डेंग्यूच्या रुग्णाला पूर्ण रक्त न देता केवळ प्लेटलेट्स द्यावे लागतात. रक्तातून त्यातील विविध घटक वेगळे करण्याकरिता सेंट्रिफ्युजचा उपयोग होतो. वेगाने रक्त फिरवल्यास घनतेप्रमाणे त्यातील विविध घटक जसे प्लाझमा, प्लेटलेट्स इत्यादी वेगळे होतात. अणुऊर्जेच्या क्षेत्रात जो युरेनिअम इंधन म्हणून वापरतात तो नैसर्गिकरित्या आढळणऱ्या युरेनिअम (व238) मध्ये केवळ ०.७१ टक्के असतो. त्यातून इंधन (व235) हा घटक वायुरूप अवस्थेत सेंट्रिफ्युज मशिनमध्ये वेगळा केला जातो. हे वेगळे केलेले युरेनिअम मग अणु भट्टीत पुरवले जाते.

अशा प्रकारे अपकेंद्री बल लोणी काढण्यापासून ते रोग्याचे जीव वाचवण्यापर्यंत आपल्याला मदत करते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 5:03 am

Web Title: dryer washing mission fngal infection akp 94
Next Stories
1 पितृपक्षातले समाजभान
2 मेडिकल कॉलेजमधल्या सांस्कृतिक चळवळी
3 स्वादिष्ट सामिष : फिश फिंगर
Just Now!
X