युरोपीय देशांत कार अपघातानंतर तात्काळ अत्यावशक मदत उपलब्ध करुन देणाऱ्या ‘ई कॉल’ सोल्यूशन सेवेमुळे तेथील अपघातातील मृतांच्या संख्येत घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली सेवा आता भारतातही विकसित होत आहे. बॉश या आंतरराष्ट्रीय कंपनीने या सेवेचा शुभारंभ केल्याचे जाहीर केले आहे. यामुळे पुढील काळात भारतभर ही सेवा उपलब्ध होणार आहे.

अपघातानंतर तात्काळ अत्यावशक मदत

अपघातात मृत्यू होण्याच्या घटनांत भारत जगात आघाडीवर आहे. केंद्रीय रस्ते मंत्रालयाने २०१८ या वर्षांत अपघातांच्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात ४ लाख ६७ हजार ४४ अपघात झाले. यात १ लाख ५१ हजार ४१७ जणांचा मृत्यू झाला. २०१७ या वर्षांत १ लाख ४७ हजार ९१३ जणांचा, तर २०१६ या वर्षांत १ लाख ५० हजार ७८ जणांचा अपघातात मृत्यू झाला होता. म्हणजे आपल्याकडे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. २०१८च्या आकडेवारीनुसार दुचाकी अपघातात २८ हजार ६१६, तर कार आणि टॅक्सी अपघातात २५ हजार ११५ जणांचा मृत्यू झाला होता. यात भरधाव वाहन चालविण्यामुळे झालेल्या अपघातात २८ हजार ६१९ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी पाहता भारतात ही गंभीर समस्या असून यावर उपाययोजना महत्त्वाची आहे. यात वेळीच जखमींना मदत न मिळाल्यामुळे मृतांचे प्रमाणही लक्षणीय आहे.

आपल्याकडे अपघात किंवा दुर्घटना घडल्यानंतर अत्यावशक मदत मिळते. पण ती कधी व काय मदत मिळेल याचा नेम नाही. १०० किंवा १०८ क्रमांकावर अशाप्रसंगी संपर्क केल्यानंतर जवळच्या मदत केंद्रातून मदत पोहोचविण्याचा प्रयत्न होतो. पण अपघात किंवा दुर्घटनास्थळाची तात्काळ माहिती या मदत केंद्रांना मिळत नाही. तशी व्यवस्थाच आपल्याकडे नाही. त्यात माहिती मिळाली तर घटनास्थळी नेमकी काय मदत हवी याची माहिती मदत करणाऱ्यांना नसते. या सर्व वेळखाऊ प्रक्रियेमध्ये तुटपुंजी मदत कधी तरी पोहोचते, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. असे अनेक घटनांमध्ये समोर येते. त्यामुळे अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करताना वाहनचालकांच्या सुरक्षेसाठीही काही नियम बंधनकारक करणे गरजेचे असून अपघातस्थळी अत्यावशक मदत तात्काळ कशी पोहचेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

मोबिलिटी सव्‍‌र्हिसमधील देशातील आघाडीची कंपनी ‘बॉश’ने भारतात यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्यांनी कारमधील ‘इ कॉल’ सेवेचा शुभारंभ केला आहे. ‘ई कॉल’ म्हणजे कारमधील ऑटोमॅटिक कॉल सिस्टीम. यामुळे अपघातानंतर तात्काळ अग्निशमन दल, पोलीस पथक व अ‍ॅम्बुलन्स या अत्यावशक सेवेला संपर्क होत असून तात्काळ मदत मिळते. त्यामुळे जखमींना तात्काळ मदत मिळून त्यांचा जीव वाचतो. प्रथम हे तंत्रज्ञान युरोपमधील देशांनी आत्मसात केले. तेथील सरकारने कारमध्ये ही यंत्रणा बसविणे बंधनकारक केले आहे. यामुळे तेथील मृतांची आकडेवारी कमी झाल्याचे सांगितले जाते.

या कंपनीकडून ही ई कॉल सेवा ५० देशांत १८ विविध भाषांमध्ये दिली जात आहे. त्यांनी आता भारतातही ही यंत्रणा विकसीत करण्याचे ठरविले आहे. भारतात२७ राज्य व पाच केंद्रशासित प्रदेशात ३६५ दिवस २४ तास इंग्रजी व हिंदीमध्ये ही सेवा देण्याचा कंपनीचा प्रयत्न राहणार आहे.

अशी मिळते तात्काळ मदत

  •  ‘ई कॉल’ म्हणजे ऑटोमॅटिक कॉल सिस्टीम. कारमध्ये ही यंत्रणा एक्ससरीज म्हणून बसविली जाते.
  •  कारचा अपघात होतो. अशा वेळी कारमध्ये लावलेला इम्पॅक्ट सेन्सर हा अत्यावशक मदत केंद्रांना तात्काळ संपर्क करतो.
  •  कारमध्ये आसनव्यवस्थेलाही एक सेन्सर लावलेला असतो. तो गाडीत चालकाव्यतिरिक्त आणखी कोण होते का याची माहिती संगणकाला पुरवतो. सीट बेल्ट लावला होता की नाही, बसलेला प्रवासी किंवा चालक किती वजनाचा होता आदी माहिती याद्वारे यंत्रणेला मिळते.
  •  कारमध्ये जीपीएस यंत्रणा लावलेली असते. याद्वारे ही कार कोणत्या रस्त्याने किती अंतर व कोणत्या ठिकाणापर्यंत गेली. अपघात झाला ते स्थळ नेमके कोणते आहे. याची माहिती या द्वारे मिळते.
  •  गाडीत एक कॅमेराही लावलेला असतो. तो अपघातानंतर गाडीची सद्य:स्थितीचे फोटो काढून संगणकाला पाठवतो.
  •  त्यानंतर अत्यावशक मदत केंद्रातून अपघातग्रस्त गाडीत परत संपर्क केला जातो. जर गाडीतील चालक किंवा सहप्रवाशाने त्याला प्रतिसाद दिला तर त्याच्याकडून आवश्यक माहिती घेत अपघातस्थळी नेमकी काय व कोणाची मदत गरजेची आहे, हे समजते. आणि त्यानुसार पोलीस, अग्निशमन दल किंवा अ‍ॅम्ब्युलनसची अत्यावशक मदत तात्काळ अपघातस्थळी पोहोचविली जाते.

कार सुरक्षेसाठी इतर पर्याय

सध्या अत्याधुनिक तंत्राने विकसित व सुरक्षेची हमी देणाऱ्या वाहनांना ग्राहक पसंती देत आहेत. गेल्या वर्षभरात देश-विदेशातील काही कंपन्यांनी या कनेक्टिव्हिटी असलेल्या कार बाजारात आणल्या आहेत. यात नवनवीन तंत्र वापरले जात असून सुरक्षेबाबतही विशेष काळजी घेताना मोटार कंपन्या दिसत आहेत. शासनानेही काही उपाय बंधनकारक केले आहेत.

टायर प्रेशर मॉनिटरिंग

टायर प्रेशर मॉनिटरिंग यंत्रणा कारच्या टायरमध्ये हवेचा दाब किती आहे, याची चालकाला कल्पना देते. त्यामुळे वेळीच दखल घेतल्यामुळे अपघात टळतो. हवा कमी असल्याने अचानक टायर पंक्चर होऊन गंभीर अपघाताची शक्यता असते.

एअर बॅग

यात एअर बॅग.. हे एक महत्त्वाचे सुरक्षा कवच आहे. अपघातप्रसंगी वाहनात असलेली एअरबॅग तात्काळ उघडते. यामुळे चालक किंवा प्रवासी गंभीर जखमी होण्यापासून वाचतो. अलीकडे कारमध्ये पाच ते सहा एअरबॅग असतात. शासनानेही एअरबॅग बंधनकारक केले आहे.

एंटी लॉक ब्रेकिंग

एंटी लॉक ब्रेकिंग यंत्रणा अचानक ब्रेक लावल्यानंतर कारचे ब्रेक लॉक होण्यापासून वाचवते. त्यामुळेही अपघात टळतो.

पार्किंग सेन्सर व कॅमेरा

वाहन पार्किंग करताना मागील गोष्टींचा अंदाज न आल्याने अपघाताची शक्यता असते. अशा वेळी रिअर पार्किंक सेन्सर महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच कॅमेऱ्यामुळे मागील गोष्टीचा अंदाज येतो.

सीटबेल्ट सेन्सर

सीटबेल्ट न लावल्यामुळे अपघातात अनेकांना जीव गमवावा लागतो. सीटबेल्ट सेन्सर जोपर्यंत चालक सीटबेल्ट लावत नाही तोपर्यंत आवाज येत राहतो. यापूर्वी ज्या देशांत ही यंत्रणा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी अशा पद्धतीने काम होत असते. भारतात नेमकी ही सेवा कशी दिली जाईल याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कंपनी किंवा सरकारनेही याबाबत काही धोरण जाहीर केलेली माहिती नाही. पण ही महत्त्वपूर्ण सेवा पुढील काळात भारतात विस्तारणार आहे आणि ती गरजेचीही आहे.