25 January 2020

News Flash

‘अ‍ॅप’मधले शिक्षक

विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासाशी संबंधित शंका, प्रश्न यांचे निराकरण करण्यासाठी ‘मेरिटनेशन’ हे अ‍ॅप उपयुक्त आहे.

(संग्रहित छायाचित्र)

आज शिक्षक दिन. विद्यादानासारखे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना वंदन करण्याचा दिवस. शिक्षण हे केवळ शाळेतल्या चार भिंतींपुरतंच मर्यादित नसतं. बालवयापासूनच आपल्याला प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे गुरू भेटत असतात. आई, वडील, भावंडे, मित्र, इतकंच काय, पण अनुभवही आपल्याला पावलोपावली काही तरी नवीन शिकवत असतात, नवं ज्ञान देत असतात. तंत्रज्ञानाचंही तसंच आहे. विशेषत: गेल्या काही वर्षांत स्मार्टफोनशी आपली जवळीक वाढली असल्यामुळे या माध्यमातूनही आपल्याला जगातील नवीन घडामोडी, गोष्टी समजतात. पण स्मार्टफोनवरून मिळणाऱ्या या ज्ञानाला तुम्ही प्रत्येक वेळी खात्रीशीर आणि सत्य मानू शकत नाही. उलट अलीकडे स्मार्टफोनवरून ज्ञानाचा प्रसार करण्याऐवजी अफवा, असत्य यांचा प्रचार करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. असे असले तरी, स्मार्टफोनवरून खरेखुरे शिक्षण घेणेही सहजशक्य बनले आहे.

अँड्रॉइड आणि आयओएस यासारख्या ऑपरेटिंग सिस्टीमवर अनेक असे अ‍ॅप आहेत, जे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील विषय अधिक सखोलपणे आणि प्रभावीपणे शिकवतात. एक तर स्मार्टफोनच्या माध्यमातून हे विषय मांडण्यात येत असल्याने त्यांचा प्रभाव जास्त असतो आणि दुसरं म्हणजे, या विषयांची मांडणीही अतिशय सुटसुटीत आणि विद्यार्थ्यांना पटकन समजावी, अशा पद्धतीने केलेली असते. अगदी इंग्रजी मुळाक्षरांपासून इंजिनीअरिंगच्या क्लिष्ट गणितांपर्यंत विविध विषय या अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवले जातात. अशाच काही शैक्षणिक अ‍ॅपविषयी आपण आज, शिक्षक दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊ यात.

मेरिटनेशन (Meritnation)

विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासाशी संबंधित शंका, प्रश्न यांचे निराकरण करण्यासाठी ‘मेरिटनेशन’ हे अ‍ॅप उपयुक्त आहे. या अ‍ॅपमध्ये सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या सहावी ते बारावीपर्यंतच्या इयत्तांमधील विद्यार्थ्यांसाठीच्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. सध्या दीड कोटी डाऊनलोड असलेल्या या अ‍ॅपचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो.  या अ‍ॅपमध्ये अभ्यासक्रम, गृहपाठ मदत आणि परीक्षा मार्गदर्शन पुरवले जाते. परीक्षा मार्गदर्शनासाठी नमुना प्रश्नपत्रिका, उजळणी अभ्यास आणि आधीच्या वर्षीच्या प्रश्नसंचांचा वापर करता येतो. यामध्ये ‘एनसीईआरटी’च्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तरे स्वरूपात अभ्यासक्रम उलगडून दाखवण्यात आला आहे. यात ‘आस्क अ‍ॅण्ड आन्सर’ अशी सुविधा पुरवण्यात आली आहे, ज्याद्वारे विद्यार्थ्यांना कठीण विषयांशी संबंधित प्रश्नांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळते. तसेच यामध्ये दीड हजारांच्या आसपास शैक्षणिक अ‍ॅनिमेशन चित्रफितीही पुरवण्यात आल्या आहेत.

‘बायजूज’ (BYJU’S – The Learning App)

‘बायजूज’च्या अ‍ॅपबद्दल गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चा होते. या अ‍ॅपच्या जाहिरातीही टीव्हीवरून प्रसारित केल्या जातात. कोणताही विषय साध्या- सोप्या भाषेत चित्रफिती आणि अ‍ॅनिमेशनच्या मदतीने उलगडून दाखवण्यात ‘बायजू’चे कौशल्य चांगले आहे. सहावी ते बारावी इयत्तांपर्यंतच्या गणित आणि विज्ञान या विषयांखेरीज जेईई, कॅट, आयएएससारख्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठीही हे अ‍ॅप उपयुक्त आहे. यामध्ये आयसीएसई, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी नमूना प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. त्याखेरीज यात सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तज्ज्ञ शिक्षकांकडून दिले जाणारे लेक्चर्स, व्हिडीओ लेसन, धडय़ांवर आधारित सराव चाचणी, मॉक टेस्ट यांचाही या अ‍ॅपमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे. आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी अ‍ॅपवरून तयारी करता येऊ शकते.

विकिपीडिया (Wikipedia)

विकिपीडियाच्या संकेतस्थळाचा वापर विद्यार्थ्यांपासून तज्ज्ञ मंडळींपर्यंत अनेक जण करत असतात. हे अ‍ॅपही त्याचेच मोबाइल रूप आहे. यामध्ये जगभरातील ३०० भाषांमधील चार कोटी लेख व मजकुराचा समावेश करण्यात आला आहे. जागतिक घडामोडी, दिनविशेष, चर्चेतले मुद्दे, ऐतिहासिक घटना, शास्त्रीय संदर्भ, जीवशास्त्रीय संशोधन अशा सर्वच विषयांवरील मूलभूत माहिती जाणून घेण्यासाठी हे अ‍ॅप उपयुक्त आहे. त्यामुळे अभ्यासाखेरीज ज्ञानवर्धनासाठीही हे अ‍ॅप फायद्याचे ठरते. शिवाय संकेतस्थळापेक्षा वेगळे वैशिष्टय़ म्हणजे आवाजी सूचनेद्वारेही आपण एखाद्या संज्ञेचा विकिपीडियावरून शोध घेऊ शकतो.

टेड (TED)

टेड हे मोबाइल अ‍ॅप तुम्हाला थेट अभ्यासासाठी उपयोगी नसले तरी जगभरातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांची अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी भाषणे ऐकायची, पाहायची असतील तर या अ‍ॅपला पर्याय नाही. तुम्हाला विविध विषय, अभ्यासक्रमाशी संबंधित तीन हजारांहून अधिक तज्ज्ञांची भाषणे, मते या अ‍ॅपच्या माध्यमातून जाणून घेता येतात. यामधील बहुतांश चित्रफिती इंग्रजी भाषेत असल्या तरी त्याखाली १०० भाषांमध्ये तुम्हाला ‘सबटायटल्स’ उपलब्ध होतात.

मायसीबीएसई गाइड (myCBSEguide)

‘माय सीबीएसई गाइड’ हे अ‍ॅप नावाप्रमाणे एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. यामध्ये तुम्हाला सीबीएसईच्या नमुना प्रश्नपत्रिका, उजळणी अभ्यास, प्रकरणाधारित प्रश्नोत्तरे, अभ्यासाशी संबंधित चित्रफिती अशा अनेक गोष्टी शिकायला मिळतात. सीबीएसईच्या इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम यात आढळतो.

डय़ुओलिंगो (Duolingo)

आजकाल केवळ मातृभाषा आणि इंग्रजी भाषा जाणून चालत नाही, तर तुम्हाला अन्य भाषांचे ज्ञानही असणे आवश्यक ठरते. विशेषत: तुम्ही शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे बेत करत असाल तर त्या देशाची किंवा प्रांताची भाषा आपल्याला समजली पाहिजे. अगदी पर्यटनाला गेल्यानंतरही तुम्हाला त्या त्या भागाची भाषा जुजबी तरी माहीत असली पाहिजे. यासाठी ‘डय़ुओलिंगो’ हे अ‍ॅप उपयुक्त आहे. स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, इटालियन, रशियन, पोर्तुगीज यांसह अनेक परदेशी भाषा शिकण्याची सोय या अ‍ॅपमध्ये आहे. केवळ भाषेचे ज्ञान न देता तुम्हाला सराव करण्यासाठीही हे अ‍ॅप उपयुक्त आहे.

First Published on September 5, 2019 7:54 am

Web Title: education app meritnation smart phone abn 97
Next Stories
1 घरातलं विज्ञान : निसर्ग आपला गुरू
2 ऑफ द फिल्ड : विंडिज दौऱ्यावरील अवांतर क्षण
3 टेस्टी टिफिन : फिरंगी निवगऱ्या
Just Now!
X