20 October 2019

News Flash

‘ई धूम्रपान’ आरोग्याला हानीकारकच!

परदेशात उदयास आलेल्या या ई सिगारेटकडे अधिकाधिक तरुण वर्ग वळल्याच्या काही अभ्यासांमध्ये नोंदी आहेत.

शैलजा तिवले

सध्या ‘ई’ जगाकडे तरुणाईचा कल वाढत असून याचे प्रतिबिंब ‘ई धूम्रपाना’मध्येही दिसते. सिगारेट सोडवण्यासाठी पर्यायी म्हणून दावा केल्या जाणाऱ्या ई सिगारेट किंवा ई-हुक्का यांच्याकडे तरुण वर्ग अधिक आकर्षिला जात आहे. हा दावा फसवा असून ई धूम्रपान आरोग्याला हानीकारक असल्याचे स्पष्ट करत केंद्र आणि राज्य सरकारनेही या निकोटीनयुक्त ई उत्पादनांवर बंदी आणली आहे.

एकदा हाती घेतलेली सिगारेट आणि झुरके मारण्याची नशा सोडवणे अवघड असते. नशेपासून मुक्ती मिळविण्यासाठी सिगारेटऐवजी ई सिगारेटचा पर्याय जगासमोर काही कंपन्यांनी आणला. निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी या पडद्याखाली निकोटिनचे व्यसन सोडवण्यासाठी म्हणून आणल्या गेलेल्या या ई सिगारेटमध्ये सिगारेटच्या तुलनेत निकोटिनची मात्रा कमी असल्याने आरोग्यासाठी सिगारेटइतकी हानीकारक नाही, असा प्रचार सुरू केला गेला. परदेशात उदयास आलेल्या या ई सिगारेटकडे अधिकाधिक तरुण वर्ग वळल्याच्या काही अभ्यासांमध्ये नोंदी आहेत. याचा बोलबाला अर्थातच आता भारतापर्यंतही पोहोचला आहे.

ई सिगारेट म्हणजे नेमके काय

ई सिगारेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगारेट. पेनासारखे दिसणाऱ्या या उपकरणामध्ये सिगारेटमधील तंबाखूऐवजी द्रव्यरूपातील निकोटिनचा समावेश असतो. याला काडेपेटी किंवा लाइटरने पेटवण्याची आवश्यकता नसते. ही सिगारेट बॅटरीवर चालते. यामधील बटन सुरू केले की द्रव्यरूपातील निकोटिनची वाफ बनते आणि ती सिगारेटप्रमाणे तोंडावाटे ओढली जाते. सिगारेटसारखी पेटवली जात नसल्याने याची राख तयार होत नाही. यामध्ये द्रव्यरूपातील निकोटिन भरण्याची सोय असते. याचा सिगारेटप्रमाणे वासदेखील येत नाही. विविध प्रकारच्या फ्लेव्हर म्हणजे चवीमध्ये ही मिळते.

ई  धूम्रपान म्हणजे?

द्रव्यरूपातील निकोटिनची विद्युत उपकरणाच्या माध्यमातून वाफ बनवली जाते आणि याचा धूम्रपानासाठी वापर केला जातो याला ई धूम्रपान असे म्हटले जाते. यामध्ये ई सिगारेट, फ्लेवर हुक्का, ई शिशा इत्यादी निकोटिनयुक्त उपकरणांचा समावेश आहे.

निकोटिन रिप्लेसमेंट थेरपीचा दावा फसवा

निकोटिन हा व्यसन लावणारा घटक आहे. हे व्यसन सोडवण्यासाठी निकोटिन रिप्लेसमेंट थेरपीअंतर्गत एका निकोटिनयुक्त पदार्थाच्या तुलनेत कमी हानीकारक निकोटिनचा पर्याय दिला जातो. यामध्ये सध्याच्या घडीला निकोटिन च्युइंगम, स्प्रे, पॅचेस इत्यादी उपलब्ध आहेत. ई सिगारेटमध्ये निकोटिनचे प्रमाण तितकेच असते. त्यामुळे ई सिगारेट हा निकोटिन रिप्लेसमेंट थेरपीअंतर्गत असलेले औषध असा दावा चुकीचा असल्याचे अनेक संशोधन अभ्यासांतून सिद्ध झाले आहे. म्हणूनच मग या निकोटिनयुक्त ई उपकरणांना नवीन औषधे अशी मान्यता केंद्रीय औषध नियंत्रक विभागानेही दिलेली नाही. याउलट याचा वापर, विक्री आणि वितरणावर या विभागाने औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायद्याअंतर्गत बंदी आणली आहे.

ई सिगारेटच्या वापराबाबत झेनमल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. अरविंद काटे सांगतात, ‘‘सिगारेटवरून ई सिगारेटवर आलेल्या व्यक्तीने काही एका ठरावीक मर्यादेनंतर ई सिगारेट सोडणे अपेक्षित आहे; परंतु याचे दुष्परिणाम कमी असा गैरसमज करून लोक सिगारेटऐवजी ई सिगारेटच्या व्यसनाला बळी पडल्याचे दिसून येते. माझ्याकडे येणारा एक रुग्ण गेली १५ ते १६ वर्षे सिगारेट ओढते आहे. हे व्यसन सोडविण्यासाठी ई सिगारेट घ्यायला सुरुवात केली आणि गेल्या पाच वर्षांत आता ई सिगारेटच्या आहारी गेला आहे. निकोटिनच्या सततच्या वापरामुळे त्याच्या फुप्फुसामध्ये छोटे फुगे तयार होऊन फुटून बाहेर हवा आल्याने तो माझ्याकडे आला होता. त्यामुळे सिगारेटचे व्यसन सोडवण्यासाठी ई सिगारेट ही कल्पना फसवी आहे.’’

गैरसमजामुळे युवा वर्गाचा वाढता कल

सिगारेटच्या तुलनेत ई सिगारेटचे दुष्परिणाम कमी असल्याचा दावा उत्पादक कंपन्यांकडून केला जातो. हे काही अंशी खरे जरी असले तरी एखादा व्यक्ती दिवसाला चार ते पाच सिगारेट ओढत असेल आणि ई सिगारेट सुरू केल्यानंतर दिवसातून दहा वेळा ओढत असेल, तर ते धोकादायकच आहे. सिगारेट घेण्याचा आनंद आणि दुष्परिणाम कमी या गैरसमजातून सिगारेटऐवजी ई सिगारेटकडे वळण्याकडे हल्ली कल वाढत आहे. विशेषत: किशोर वयातील किंवा महाविद्यालयीन मुले ई सिगारेट ओढली तर चालेल ना, असा थेट प्रश्न विचारतात तेव्हा आम्हीच बुचकळ्यात पडतो, असेही डॉ. काटे यांनी सांगितले.

ई धूम्रपानाचे शरीरावरील परिणाम

निकोटिनयुक्त विद्युत उपकरणांमध्ये निकोटिनपासून वाफ निघत असल्याने याला व्हेपिंग म्हटले जाते. ई सिगारेटमध्ये ई ज्यूस असून यात प्रोपेलीन ग्लायकॉल, व्हेजिटेबल ग्लिसरीन आणि निकोटिन यांचे मिश्रण असते. निकोटिन कितीही प्रमाणात शरीरात घेतले तरी त्याचे दुष्परिणाम नक्कीच आहेत. कमी प्रमाणात घेतले तरी मळमळणे, पोटात दुखणे, डोळ्याला जळजळ होणे असे धोके असतात, तर अतिप्रमाणात घेतल्यानंतर रक्तदाब वाढणे, हृदयाचे ठोके वाढणे, काही जणांना आकडी येण्यासारखेही त्रास होण्याची शक्यता असते. ई सिगारेट आणि सिगारेटचे प्रत्यक्ष माणसांवर केलेल्या अभ्यासांची संख्या मोजकीच असली तरी प्राणी किंवा अन्य घटकांवर केलेल्या अभ्यासातून ई सिगारेटमधील ई ज्यूसमुळे श्वसनयंत्रणा पोखरत जाते. भविष्यात सीओपीडी, ब्रॉन्कायटिस यांसारखे श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता असते.

ई सिगारेटचे फुफ्फुस, हृदय, मूत्रपिंड आणि यकृतावर गंभीर परिणाम होतात, तसेच यामुळे डीएनएसुद्धा बाधित होतात. श्वसननलिकेवरील आवरणावर परिणाम होऊन विविध घातक घटकांपासून संरक्षण करण्याची क्षमता कमी होते. अशा रुग्णांमध्ये न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. फुफ्फुसांचे कार्य बिघडते. तसेच निकोटिनसह ई सिगारेटमध्ये असलेल्या अन्य घटकांमुळे कर्करोग होण्याचीही शक्यता असते.

फुफ्फुसांवर घातक परिणाम करणारा डायअ‍ॅसिटाईल घटक हा ई सिगारेटमध्ये असल्याच्या अभ्यासामध्ये नोंद आहे. ५१ ब्रँण्डच्या ई सिगारेटचा अभ्यास केलेल्या या शोधनिबंधामध्ये ३९ सिगारेटमध्ये हा घटक आढळल्याचे नमूद केले आहे. या घटकाचे सेवन केल्याने पॉपकॉर्न लंग्ज म्हणजेच ब्रॉनकायटिस होण्याची शक्यता अधिक असते. यामध्ये खोकला होणे, दम लागणे ही लक्षणे दिसून येतात.

पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजेच प्रत्यक्ष सिगारेट न ओढता ओढणाऱ्या व्यक्तीने सोडलेला धूर श्वासावाटे शरीरात जाऊन होणारे दुष्परिणाम ई सिगारेटच्या बाबतही लागू आहेत. कारण ई सिगारेटमधून सोडलेल्या धुरामध्येही सिगारेटमधून सोडलेल्या धुराइतकेच हानीकारक घटक असल्याचे मत डॉ. काटे यांनी मांडले.

सिगारेटच्या तुलनेत एकचतुर्थाश प्रमाणात निकोटिन हे ई सिगारेटमधून शरीरात जाते, असा दावा या उत्पादकांकडून केला जात असला तरी निकोटिन हे कोणत्याही प्रकारामध्ये आणि कितीही प्रमाणात घेतले तरी त्याचे शरीरावर घातक परिणाम आहेतच. ई सिगारेट किंवा ई हुक्का यांमध्ये विविध फ्लेव्हर आणण्यासाठी वापरली जाणारी रसायनेही शरीरासाठी हानीकारक आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने याला निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी म्हणून अद्याप मान्यता दिलेली नाही, असे ग्लोबल रुग्णालयाचे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. उन्मील शाह यांनी सांगितले.

तर सावधान..

ई सिगारेटचा वापर करत असाल आणि तुम्हाला पुढील त्रास होत असेल तर वेळीच जागृत व्हा. डोळ्यांना जळजळ होणे, वारंवार खोकला येणे, दम लागणे, चिडचिड होणे, भूक कमी होणे, खाण्याची इच्छा कमी होणे, मळमळणे ही लक्षणे दिसत असतील डॉक्टरांच्या सल्ल्याने फुफ्फुसाच्या कार्याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

First Published on April 23, 2019 3:04 am

Web Title: effects of electronic cigarette smoking on human health