|| बापू बैलकर

प्रदूषण नाही.. एकदा चार्ज केले की ९० ते १०० किलोमीटपर्यंत चिंता नाही.. कसलाही आवाज नाही.. गती ताशी ६० ते ७० किलोमीटपर्यंत, अशा इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या काही स्कूटर अलीकडे बाजारात आल्या आहेत. यापूर्वीही काही स्कूटर बाजारात आहेत. मात्र वेग, चार्जिग क्षमता यामुळे त्यांना मागणी नव्हती. मात्र आता काही कंपन्या यात बदल करीत असून या इलेक्ट्रिक स्कूटरच्या वेगाची स्पर्धा आता सुरू झाली आहे.

सध्या भारताबरोबर इतर देशांनाही कच्चे तेल आणि पर्यायाने इंधन समस्या ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. पेट्रोल, डिझेलवरील वाहनांचा जागतिक प्रदूषणातही मोठा वाटा आहे. त्यामुळे अनेक देशांनी पुढील कालावधीत स्वच्छ ऊर्जा आणि बॅटरीचलित वाहन बाजारात आणण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. आपल्या केंद्र सरकारने २०३० पर्यंत कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व ३० टक्क्यांपर्यंत कमी करणे, यासाठी नैसर्गिक वायूचा पर्यायी इंधन म्हणून मोठय़ा प्रमाणावर वापर वाढवणे, तसेच २०३० पासून सर्व वाहने, विजेवर आधारित करणे अशा अनेक योजना आखल्या आहेत. ही वाहने खरेदीला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाने या धोरणात वाहनधारकांसाठी अनुदान, रस्ते व नोंदणी शुल्कातून माफी आदी सवलतीही जाहीर केल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर कार, दुचाकी व स्कूटर ही ई वाहने सध्या बाजारात येत आहेत. गेल्या वर्षभरात पाच सहा कार बाजारात आल्या आहेत. मात्र, पायाभूत सुविधा व किमती जास्त असल्याने ग्राहक अजूनही सावध पवित्र्यात आहे.

स्कूटरसाठी कर्जावर १.५ लाखांची करसवलत, जीएसटीच्या दरात ७ टक्के कपात आणि ईव्हींसाठीच्या चार्जर व चार्जिंग स्टेशन्सवरील जीएसटी दरांत १८ टक्कय़ांपासून ५ टक्कय़ांपर्यंतची कपात अशा सवलतींमुळे अनेक कंपन्या दुचाकी व स्कूटर बाजारात आणत आहेत. स्कूटरच्या बाबतीत थोडी स्पर्धा वाढताना दिसत आहे. या दुचाकी वाहनांच्या श्रेणीतील ग्राहकवर्ग आपलासा करण्यासाठी या कंपन्या पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटरइतकेच कार्यक्षम असेल, किंमत, सौंदर्य व दणकटपणाही त्या तोडीस देण्याचा दावा कंपन्यांकडून होत आहे. अलीकडे एकदा चार्ज कले की ९० ते १०० किलोमीटपर्यंत धावणाऱ्या, ताशी १०० किलोमीटपर्यंत वेग मर्यादा असलेल्या स्कूटर बाजारात आल्या आहेत.

ऑप्टिमा एफ, एनवायएक्स : वेग ताशी ४२ किलोमीटर

हिरो इलेक्ट्रिकने ऑप्टिमा एफ आणि एनवायएक्स एफ या दोन नव्या ई-स्कूटर भारतीय बाजारात आणल्या आहेत. ६८ हजार ७२१ रुपये आणि ६९ हजार ७५४ रुपये इतकी किंमत आहे. या एक्स-शोरूम किमती असून ईशान्य भारतवगळता देशभरात सर्वत्र या किमती लागू असतील. हिरो इलेक्ट्रिकच्या ऑप्टिमा ईआर आणि एनवायएक्स ईआर नावाच्या इलेक्ट्रिक स्कूटर आधीपासूनच बाजारात आहेत. पण, आता कंपनीने याच्या दोन नवीन आवृत्त्या आणल्या आहेत.

या दोन स्कूटर्समधील ऑप्टिमा एनवायएक्स एफ स्कूटर खास ऑफिसला जाणारे मध्यमवर्गीय आणि कॉलेजचे विद्यार्थी यांना डोळ्यांसमोर ठेवून तयार करण्यात आली आहे. एनवायएक्स एफ ची निर्मिती छोटे व्यावसायिक, व्यापारी, ई-कॉमर्स डिलिव्हरी कर्मचारी आणि भाडय़ाने दिल्या जाणाऱ्या ई-बाइक्सच्या मागणीनुसार होईल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. दोन्ही स्कूटर्समध्ये अ‍ॅलॉय व्हील्स, एलईडी हेडलाइट्स, डिजिटल स्पीडोमीटर, टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

ऑप्टिमा एफ  या स्कूटरच्या नावामध्ये एफ  चा अर्थ एक्सटेंडेड रेंज म्हणजेच आधीपेक्षा जास्त अंतर धावेल असा आहे. रेंज वाढविण्यासाठी यामध्ये डय़ुअल लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. ४ ते ५ तासांमध्ये दोन्ही स्कूटरची बॅटरी चार्ज होईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ऑप्टिमा ११० किलोमीटर आणि एनवायएक्स १०० किलोमीटपर्यंतचं अंतर कापू शकते असा दावा कंपनीने केला आहे. ४२ किलोमीटर प्रतितास इतका या दोन्ही स्कूटरचा वेग आहे. योग्य काळजी घेतल्यास बॅटरी पाच वर्षांपर्यंत कार्यरत राहील असंही कंपनीने म्हटलं आहे.

अ‍ॅस्ट्रिड : वेग ताशी ६५ किलोमीटर

गोरीन ई मोबिलिटी आणि ओपाई इलेक्ट्रिक यांच्या संयुक्त विद्यमाने जेमोपाई इलेक्ट्रिकने भारतात अ‍ॅस्ट्रिड लाइट नावाने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. याची किंमत ७९,९९९ (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. डीलरशिप ओलांडून प्री-बुकिंगवरही कंपनीला प्रस्तावात्मक ऑफर आहेत. पाच रंगांमध्ये स्कूटर उपलब्ध असेल. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात या स्कूटरचे वितरण सुरू होईल. पूर्ण टचा एलईडी लाइटचा वापर केला आहे.

जेमोपाई अ‍ॅस्ट्रिड लाइटला १.७ किलोवॅट क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी आहे. आपण निवडलेल्या रायडिंग मोडवर अवलंबून त्याची ७५ ते ९० किमीची श्रेणी मिळते. स्कूटरचा अव्वल वेग ६५ किमी प्रतितास आहे. तीन रायडिंग मोड आहेत जे सिटी, स्पोर्ट आणि इकॉनॉमी आहेत. स्कूटरमध्ये एक अतिरिक्त बॅटरी स्थापित करण्यात आली आहे. अ‍ॅस्ट्रिड लाइटला एलईडी लाइट, स्वयंचलित स्टार्ट आणि यूएसबी पोर्टसह कलर एलईडी डिस्प्ले आहे. मागील बाजूस ड्रम ब्रेकसह समोर स्कूटरला डिस्क ब्रेक देखील मिळतो.

ओकिनावा ‘प्रेझप्रो’ :  वेग ताशी ६५ ते ७० किमी

‘फेम दोन’ची सर्वप्रथम मान्यता मिळविणारी ओकिनावा स्कूटर्स ही ‘मेक इन इंडिया’ या तत्त्वावर लक्ष केंद्रित करत इलेक्ट्रिक दुचाकी बनविणारी भारतीय कंपनी आहे. ओकिनावाची नवी ई-स्कूटर प्रेझप्रो बाजारात दाखल होत आहे. ही स्कूटर ७१,९९० इतक्या एक्स शोरूम किमतीमध्ये उपलब्ध असेल. ग्लॉसी रेड ब्लॅक आणि ग्लॉसी स्पार्कल ब्लॅक अशा दोन रंगांत उपलब्ध असणारी ओकिनावाची ही नवी स्कूटर भारतीय ग्राहकांची मागणी पूर्ण करणारी, जनसामान्यांकडून वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या गटाला आपलेसे करणारी व आपला वेगळा थाट जपणारी असल्याचा दावा नुकताच कंपनीकडून करण्यात आला आहे.

संपूर्ण देशभरातील डीलरशिप्समध्ये या ई-स्कूटरची आधीच मोठय़ा प्रमाणात नोंदणी झाली आहे. भारताच्या डोंगराळ भागांमध्ये ओकिनावाने नेहमीच चांगली कामगिरी करून दाखवली आहे. या भागांमध्येही या नव्या स्कूटरला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचेही कंपनीचे म्हणणे आहे. भारतभरातील सर्व डीलरशिप्समध्ये प्रेझप्रो उपलब्ध आहे.

गाडीची वैशिष्टय़े

  • प्रेझप्रोमध्ये १००० वॅट बीएलडीसी वॉटरप्रूफ मोटर बसविण्यात आली आहे, जिला २.० केडब्ल्यूएच क्षमतेच्या काढता येण्याजोग्या लिथियम-इयॉन बॅटरीचे बळ लाभले आहे. या स्कूटरची सर्वाधिक ऊर्जा साठवणूक क्षमता २५०० वॅट्स इतकी आहे.
  • प्रेझप्रो स्कूटर २ ते ३ तासांच्या चार्जिगवर एआरएआयनुसार स्पोर्टस् मोडमध्ये ९० किमी/प्रति चार्जिग तर इको मोडमध्ये ११० किमी/प्रति चार्जिग इतकी रेंज देऊ शकते. याच्या डिजिटल स्पीडोमीटरमध्ये तीन मोड्स आहेत : पहिल्या इकॉनॉमी मोडमध्ये स्कूटर ताशी ३० ते ३५ किमीचा वेग गाठते, स्पोर्ट्स मोडमध्ये तिला ताशी ५० ते ६० किमीचा वेग मिळतो आणि टबरे मोडमध्ये ताशी ६५ ते ७० किमीचा वेग मिळतो. ही ई-स्कूटर १५ अंशांपर्यंतचा चढ चढू शकते.
  • ही ई-स्कूटर ग्लॉसी रेड ब्लॅक आणि ग्लॉसी स्पार्कल ब्लॅक अशा दोन रंगांत उपलब्ध आहे व तिची लोडिंग क्षमता १५० कि.ग्रॅ. इतकी आहे. स्कूटरमध्ये सीटखाली वस्तू ठेवण्यासाठीची जागाही देण्यात आली आहे.