डॉ.अविनाश सुपे

आपल्या पोटात अनेक अवयव असतात आणि पोटात दुखण्याची अनेक कारणे असतात. नेहमीच्या चाचण्या, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय या चाचण्या पचनमार्गात काही बिघाड झाला असल्यास निदान करण्यास तोकडय़ा पडतात. अशा वेळी एण्डोस्कोपी (दुर्बिणीद्वारे तपासणी) शरीराच्या आतील भागात जे डोळ्यांना दिसू शकत नाहीत, तिथे नळीद्वारे आतपर्यंत जाऊन आजाराचे निदान करते.

एण्डोस्कोपी म्हणजे तोंड किंवा गुद्द्वार यातून नळी आत घालून कॅमेऱ्याद्वारे व दुर्बिणीद्वारे पचननलिकेच्या आत डोकावणे आणि शरीराच्या आतील भागातील छायाचित्र घेणे, त्यामुळे आत दिसणाऱ्या विविध गोष्टी व्हिडीओच्या साहाय्याने पडद्यावर पाहणे आणि त्याद्वारे योग्य निदान करता येणे. तपासासाठी बायोप्सी काढून घेणे आणि तपासाबरोबर विविध उपाययोजना करणे हे पोट न फाडता सहज करणे शक्य झाले आहे.

एखाद्या व्यक्तीच्या सारखे पोटात दुखत असेल किंवा उलटीतून वा संडासातून रक्त पडत असेल तर त्यानुसार तोंडातून वा गुदद्वारातून ही दुर्बीण आत घातली जाते. या दुर्बिणीच्या टोकाला दिवे असतात ज्यामुळे प्रकाशकिरण आत जाऊन उजेडात आतील अवयव दिसतात. या प्रकाशामध्ये अजिबात उष्णता नसते, शिवाय या दुर्बिणीमध्ये कॅमेऱ्याची सोय असते आणि हल्ली प्रगत तंत्रामुळे शरीरातील अवयवांच्या प्रतिमा मोठय़ा दिसतात. त्यामुळे निदान कारणे सोपे होते. या दुर्बिणीची नळी इतकी लवचीक असते की, पचनमार्गातील विविध पोकळ्यांतून ती कशीही वळते आणि विविध अवयवांचे निरीक्षण व त्यानुसार उपाययोजना या दुर्बिणीद्वारे करता येतात.

दुर्बिणीद्वारे चिकित्सा

अन्ननलिकेत अडकलेला माशाचा काटा, नाणे वगैरे यांसारख्या गोष्टी दुर्बिणीद्वारे सहज काढता येतात. शरीराच्या आतील वाढलेला मांसाचा गोळा या दुर्बिणीने काढता येतो. शरीराच्या आतील वाढलेला वा अन्ननलिका, जठर, मोठे आतडे कुठेही खूप रक्तस्राव होत असेल तर तो थांबविता येतो. अन्नमार्गातील वा लघवीच्या मार्गातील अरुंद झालेला भाग रुंद करण्यासाठी व त्यात नळी टाकण्यासाठी दुर्बिणीचाच वापर करतात. त्यामुळे व्यक्तीला अन्न खाता येते. पित्तशयाच्या नलिकेत अडथळे निर्माण झाल्याने अवरोधक कावीळ होते. तेथे नळी टाकून ती कावीळ दुर्बिणीद्वाराच बरी करता येते.

जठराची एण्डोस्कोपी

तोंडातून नळी घालून अन्ननलिका, जठर अगदी लहान आतडय़ांपर्यंत (सुरुवातीचा भाग) आत जाऊन डोळ्यांनी ते ते अवयव तपासता येतात. ज्या रुग्णांना अपचन, आम्लपित्त, गॅस किंवा रक्ताच्या उलटय़ा इत्यादी लक्षणे असल्यास एण्डोस्कोपीचा उपयोग होतो.

एण्डोस्कोपिक अल्ट्रासाऊंड

एण्डोस्कोपच्या टोकास अल्ट्रासाऊंड प्रोब बसवलेला असतो. स्वादुपिंड, बाइल डक्ट, पित्ताशय, जठर, डय़ुओडेनम (लहान आतडय़ाचा सुरुवातीचा भाग) याचे सर्व आजार याने निदान करता येतात.

एण्डोस्कोपी र्रिटोग्रेड कोलँजिओ पँक्रिऑटोग्राफी (ईआरसीपी)

* या तपासणीने पित्तनलिका व स्वादुपिंड यांच्या आजाराचे निदान करता येते पण त्याहीपेक्षा पित्तनलिकेतील खडे काढणे, स्वादुपिंड नलिकेमधील अडथळा दूर करणे, जर कोठे अडथळा असेल, तर ती नळी रुंद करणे हेही करता येते.

*  घशाच्या मागच्या भागात दुर्बीण घालून ती अन्ननलिकेतून, जठरात आणि तेथून डय़ुओडेनममध्ये घातली जाते. तिथे पित्तनलिका आणि स्वादुपिंड नलिका जिथे उघडते तिथे दुर्बीण घालून प्लास्टिकची नळी आत घातली जाते. या नळीतून कॉन्ट्रास्ट घातला जातो. त्याद्वारे क्ष-किरण तपासणीने अवयव पाहिले जातात आणि या दोन्ही नलिका तपासल्या जातात. जर अडथळा असेल तर तो काढून टाकला जातो.

कॅप्सूल एण्डोस्कोपी

कॅप्सूलमध्ये अगदी छोटा व्हिडीओ कॅमेरा असतो. ही वायरलेस कॅप्सूल अन्नमार्गात जाऊन तेथे आठ तासाला  यातून सतत हजारो छायाचित्रे बाहेर पाठवली जातात. शरीरावर स्पेशल खास अँटिना पॅडमार्फत हे छायाचित्रे रेकॉर्ड केले जातात आणि त्यामुळे लहान आतडय़ातील रोग, रक्तस्राव याचे निदान करता येते.