राजेंद्र भट

बागेत आपण तीन प्रकारे झाडे लावू शकतो. फांद्या लावून, बी लावून आणि रोपे किंवा कंद लावून लागवड करता येते.

फांद्या लावून

भारतात अनेक झाडांना बी येत नाही. त्याच्या फांद्या किंवा काडय़ा लावून बी तयार केले जाते. काही झाडांना बी येते, मात्र त्यापासून झाडे तयार होण्यास वेळ लागतो. फुले येण्यास वेळ जातो. अनेक देशी गुलाब जास्वंद, कण्हेर, मोगरा, जाई-जुई, चमेली अशी फुलझाडे आपण फांद्यांपासून तयार करू शकतो. मूळ झाडाच्या फांद्या काढताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. फांदी जून असावी. कापताना ती चिरली, चेपली जाणार नाही, याची काळजी घ्यावी. फांदी लावताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वातावरणातील आद्र्रता किमान ८० टक्के तरी असणे आवश्यक आहे. योग्य आद्र्रता असल्याशिवाय झाडांना मुळे फुटत नाहीत. वातावरणात उष्णता आणि हवेत आर्द्रता ८०-९० टक्के असल्याशिवाय मुळे फुटत नाहीत. जून फांद्या घेऊन त्यांची पाने काढून टाकावीत. माती सैल करावी. त्यात या कापलेल्या काडय़ा लावाव्यात. कृषिकेंद्रात फांद्यांना मुळे फुटण्यासाठीचे संजीवक कॅरडेक्स मिळते. चमचाभर कॅरडेक्स कपभर पाण्यात मिसळून कापलेल्या फांदीचे खालचे टोक त्यात बुडवून नंतर मातीत लावावे. कॅरडेक्स पावडरमध्ये टोक बुडवून नंतर झटकूनही रोप लावता येते.