देठाइतक्या दांडीने पेललेल्या काचेच्या चषकात निम्म्यावर हिंदूकाळणाऱ्या रक्तवर्णीय वाइनचे दोन घुटकेही क्षणार्धात चित्तलहरींना उल्हसित करतात. त्यातच तिला बोचणारी थंडी, समोर पेटवलेली शेकोटी आणि तरल संगीताने भारलेल्या वातावरणाची जोड मिळाली तर..! बेधुंद करणारं हे ‘थ्रिल’ अनुभवयाचं असेल तर नाशिकच्या ‘सुला फेस्ट’ला एकदा तरी भेट द्यायलाच हवी!

जगातील युवा वर्गात लोकप्रिय असलेला ऑस्ट्रेलियातील ‘पारोव्ह स्टिलर’ असो की, पारंपरिकता जपत संगीताला वेगळा आयाम देणारा ‘क्रिस्टल फायटर’ अथवा ‘जिप्सी हिल’ हे बॅण्ड असोत.. परतीच्या मार्गावर असलेल्या थंडीत अशा लाइट बॅण्डच्या तालावर ‘वाइन संगे दिन-रात रंगे’ या नव्या धूनवर बेधुंद होऊन थिरकण्याची संधी देशात एकाच ठिकाणी मिळते. ती, म्हणजे नाशिकच्या वाइन महोत्सवात. त्याचे ‘काऊंट डाऊन’ सुरू झाले आहे. महोत्सवास काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना तरुणाईला थिरकवण्यासाठी माहोल तयार झाला आहे. वर्षांगणिक या महोत्सवात नानाविध रंग भरले जात असल्याने यंदा ३ आणि ४ फेब्रुवारीला होणाऱ्या ‘सुला फेस्ट’मध्ये नवीन काय, अशी विचारणाही युवा वर्गाकडून होत आहे.

देशाची वाइन राजधानी म्हणून ओळख निर्माण करणारा नाशिकमधील वाइन महोत्सव देशातील नव्हे तर, परदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. नाशिकमध्ये वाइनरीजची संख्या ४०च्या आसपास आहे. द्राक्षांपासून वाइन निर्मिती करण्याचा श्रीगणेशा एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. पारंपरिक पद्धतीने वाइन बनविण्याची प्रक्रिया आता यंत्राधारित बनली आहे. मात्र, उत्सवाचा तो धागा पकडून देशात वाइन संस्कृती रुजविण्यासाठी ‘वाइन फेस्ट’ अर्थात वाइन महोत्सवाची संकल्पना मांडली गेली. तिला वाइन प्रेमींकडून ओसंडून प्रतिसाद मिळत आहे. एरवीतेरवी इतर मद्यप्रकारांना पाहून नाक मुरडणारे वाइनला मात्र, ‘फॅमिली ड्रिंक’ म्हणून पाहतात.

देशात या महोत्सवाची संकल्पना सुला वाइनरीजने प्रथम प्रत्यक्षात आणली. वाइनच्या प्रचार आणि प्रसारात त्याचे महत्त्व ओळखत पाठोपाठ वाइन उत्पादक संघटना शासनाच्या सहकार्याने ‘इंडिया ग्रेप हार्वेस्ट’अंतर्गत ‘वीन अ‍ॅॅण्ड वाइन फेस्टिव्हल’चे आयोजन करीत आहेत. काळानुरूप महोत्सवात वेगळेपण, युवा वर्गासह संपूर्ण कुटुंबाला आकर्षित करण्यासाठी विविध तंत्राचा अवलंब करण्यात येत आहे. त्याकरिता वाइनच्या बाटलीच्या लाकडी पद्धतीच्या झाकणात बदल झाला आहे. भारतीय आणि पाश्चात्त्य संगीताचा आस्वाद घेता यावा, याकरिता स्वतंत्र व्यासपीठ तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. वाइनरीजमध्ये कुठेही भटकंती केली तरी संगीताची धून सोबत राहील, याची काळजी घेतली जाईल. गुलाबी थंडीत वाइनरीज्मध्ये तंबू ठोकून मुक्कामी राहता येते. ‘इंडिया ग्रेप हार्वेस्ट’अंतर्गत ग्रॅण्ड फिनालेसह भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन आहे. वाइन महोत्सव यंदा ३ व ४ फेब्रुवारी रोजी आहे. त्यानुसार नाशिकच्या सुला वाइन यार्ड्समधील तयारील आणि तरुणाईच्या उत्सुकतेला उधाण आले आहे.

या महोत्सवात बेधुंद होत ‘एन्जॉय’ करण्याची प्रत्येकाची धडपड असते. त्यात ‘कपल्स’ असतात, तसेच सहकुटुंब सामील होणारेही. दहा वर्षांपूर्वी २०० ते ३०० जणांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या ‘सुला फेस्ट’मध्ये गेल्या वर्षी सहभागी झालेल्यांच्या आकडेवारीने १४ हजारांचा टप्पा ओलांडला. त्यात स्थानिकांचे प्रमाण ३० टक्के होते. तब्बल ६५ टक्के देशातील वेगवेगळ्या भागांतील आणि पाच टक्के परदेशी पर्यटक असतात. ‘इंडिया ग्रेप हार्वेस्ट’मधूनदेखील प्रथमच सहा आठवडे हा आनंद मिळणार आहे. वाइनवरील वाढते प्रेम पाहता सहभागी होणाऱ्यांची संख्या या वर्षी अधिक विस्तारेल, असेच चित्र आहे.

‘ग्रेप स्टॉम्पिंग’ची मजा

तापमानाचा पारा खाली-वर होत असतानाच महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. या निमित्ताने पर्यटकांना पारंपरिक पद्धतीने वाइन निर्मिती प्रक्रियेतील आनंद लुटता येतो. म्हणजे, बागेतून स्वत: द्राक्षे तोडणे, लाकडी भांडय़ात टाकून ती विशिष्ट बूट घालून पायदळी तुडविणे या प्रकाराला ‘ग्रेप स्टॉम्पिंग’ असे म्हणतात.

वाइनचे अनेक प्रकार

सर्वसाधारणपणे रेड आणि व्हाइट असे वाइनचे दोन प्रकार आपल्याला ज्ञात असतात. परंतु, स्पार्कलिंग, रोज, वाइन कूलर, पोर्ट, डेअरी वाइन, उशिराने काढणी झालेल्या द्राक्षांची वेगळी आदी वाइनचे अनेक प्रकार आहेत. त्यांची चव अर्थात ‘वाइन टेस्टिंग’चा आनंद महोत्सवात मिळतो.

वाइन आणि संगीत

वाइन आणि संगीत यांना एकत्र गुंफणारा देशातील हा एकमेव महोत्सव. वाइनच्या तोलामोलाचे संगीत ही त्याची खासीयत बनली. याबाबत दर वर्षी या महोत्सवांचे आयोजन करणाऱ्या सुला वाइनरीज्चे निरीक्षण महत्त्वाचे आहे. या ठिकाणी कोणी वाइनसाठी येते तर कोणी संगीतासाठी. त्याकरिता जागतिक पातळीवरील प्रसिद्ध बॅण्डला निमंत्रित केो जाते. जोडीला भारतीय संगीतही असतेच. या वेळी प्रसिद्ध इंग्लिश इलेक्ट्रॉनिक ब्रॅण्ड किस्ट्ल फायटर्स, ब्रिटिश बॅण्ड द बीट फीट, बॅण्ड जिप्सी हिल, ‘व्होकल ग्रूव्ह कलेक्टिव्ह’- बाऊचक्लांग असे बॅण्ड आपली कला सादर करणार आहेत. ‘इलेक्ट्रो स्विंग’ या शैलीचा संस्थापक पॅरोव्ह स्टेलरची उपस्थिती या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे. संगीत, वाइन, विविध देशांतील खाद्य पदार्थ, फॅशन आदींनी महोत्सव रंगतदार ठरतो.