माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचे जुने छायाचित्र फेसबुकवर ‘व्हायरल’ झाले आहे. या छायाचित्राखाली छापलेली ओळ अशी आहे, की दुर्मीळ छायाचित्र.. डावीकडून- चाचा नेहरू, इंदिरा गांधी, त्यांचे सासरे युनूस खान आणि त्यांचे पती फिरोज खान..

अर्थात फेसबुकवर प्रसारित छायाचित्राखालील मजकूर पूर्ण खोटा आहेच, पण तो बदनामीच्या उद्देशाने लिहिलेला आहे. मूळ छायाचित्रात जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यासोबत विख्यात रशियन चित्रकार निकोलस रोरीच आणि भारतीय विदेश सेवेतील मुत्सद्दी मोहम्मद युनूस खान दिसत आहेत. १९४२ मध्ये हिमाचल प्रदेशचे काँग्रेसचे नेते दिवंगत दिलाराम शबीब यांनी ‘कुलू : हिमालयीन अबोड ऑफ द डिवाइन’ हे पुस्तक लिहिले होते. या वेळी नेहरू आणि गांधी यांनी कुलू येथे भेट दिली होती. या भेटीत त्यांनी रशियन चित्रकार आणि लेखक निकोलस रोरीच यांची भेट घेतली होती. या प्रसंगी युनूस खानही उपस्थित होते. मध्यंतरी हेच छायाचित्र चुकीच्या मजकुरासह समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. त्या वेळी एका इंग्रजी नियतकालिकाने त्याविषयीचे सत्य सांगितले होते. राजकीय अभिनिवेषातून समाजमाध्यमांवर एखाद्या बडय़ा नेत्याच्या किंवा कलाकाराच्या बदनामीसाठी बनावट ध्वनिचित्रफिती, छायाचित्रे आणि मजकूर सातत्याने व्हायरल केला जात असतो. त्यातीलच हा एक प्रकार आहे.