राजेंद्र श्रीकृष्ण भट

घरच्या घरी ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे, हे पाहिले. संकुलांमध्ये जागा असल्यास खतनिर्मिती प्रकल्प उभारणे शक्य आहे.

सर्वप्रथम प्रत्येक घरात कचऱ्याचे तीन डबे ठेवावे लागतील. एका डब्यात ओला, दुसऱ्यात सुका आणि तिसऱ्या डब्यात पुनर्वापरायोग्य कचरा टाकावा. कुजण्यासाठी हवा (प्राणवायू), ओलावा आणि उष्णता योग्य प्रमाणात आवश्यक असते. जे घटक कुजवायचे आहेत, ते जितके बारीक करून टाकू तेवढी प्रक्रिया जलद होते. ओला कचरा कुजवण्यासाठी यंत्रे उपलब्ध आहेत. ५० घरांच्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी डायनिंग टेबलएवढे यंत्र उपलब्ध आहे. या यंत्रांना वीजपुरवठा करावा लागतो.

नैसर्गिक पद्धतीने कचऱ्याचे विघटन करायचे असल्यास विटांची तीन फूट रुंद आणि अडीच फूट उंच टाकी बांधावी. लांबी कचऱ्याच्या प्रमाणात ठेवावी. यावर एक छत बांधावे, म्हणजे पावसाचे पाणी आत येणार नाही. टाकीची लांबी १० फूट गृहीत धरली, तर तिचे तीन भाग करावेत. ते साधारण तीन बाय तीन फुटांचे होतात. ओल्या कचऱ्यात ओलावा जास्त असेल, तर आवारातील झाडांची सुकलेली पाने कचऱ्यातील नारळाच्या शेंडय़ा मिसळाव्यात. म्हणजे ओलावा कमी होईल. असेच एकावर एक थर रचावेत. त्यावर कंपोस्टिंग कल्चर टाकावीत. ती बाजारात मिळतात. तसेच ट्रायकोडर्मा पावडर टाकावी. ती शेतकी सामानाच्या दुकानांत आणि अ‍ॅमेझॉनवर मिळते. ती कुजण्याच्या प्रक्रियेस हातभार लावते.

कचऱ्यात योग्य ओलावा राखणे एवढीच काळजी घ्यावी लागते. कधी कधी चिलटे आणि मुंग्या होतात. अशा वेळी पाण्यात िहग किंवा हळद मिसळून त्यावर शिंपडावी. आणखी काही सहसा करावे लागत नाही. वातावरणातील आद्र्रतेनुसार साधारण दोन-तीन महिन्यांत कचऱ्याचे खतात रूपांतर होते. आपण तयार केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही आपलीच जबाबदारी आहे. ती पार पाडून आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो.