07 March 2021

News Flash

ओदिशातील महोत्सव

भुवनेश्वर हे ओदिशाचे राजधानीचे शहर मंदिरांची नगरी म्हणूनच ओळखले जाते.

|| आशुतोष बापट

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरामध्ये शांतपणे पाय सोडून बसलेला प्रदेश म्हणजे ओदिशा. निसर्गाने आपल्या दोन्ही हातांनी या प्रदेशाला भरभरून दान दिले आहे. जगन्नाथपुरी, कोणार्क, भुवनेश्वर इथली भव्यदिव्य मंदिरे, पिपली आर्ट, पट्टचित्रसारख्या विविध कला, संस्कृती यांची रेलचेल या प्रदेशात पाहायला मिळते. या प्रदेशाचं आणखी एक आकर्षण म्हणजे इथे होणारे विविध कला महोत्सव. या महोत्सवांविषयी..

भुवनेश्वर हे ओदिशाचे राजधानीचे शहर मंदिरांची नगरी म्हणूनच ओळखले जाते. नोव्हेंबर-डिसेंबरचा काळ म्हणजे पर्यटकांसाठी सुगीचे दिवस. या दिवसांत अनेक पर्यटक ओदिशामध्ये येतात. हेच निमित्त साधून ओदिशा सरकार विविध उत्सवांचे आयोजन करते. त्यातले अत्यंत महत्त्वाचे आणि सर्वाधिक लोकप्रिय म्हणजे १ ते ५ डिसेंबर या कालावधीत होणारे कोणार्क ‘डान्स फेस्टिव्हल’ आणि कोणार्कच्याच चंद्रभागा किनाऱ्यावरवरचा ‘सॅण्ड आर्ट फेस्टिव्हल’. या दोन्ही उत्सवांसाठी भारतातून तसेच परदेशातूनही विविध कलाकार येऊन आपली कला सादर करतात.

सॅण्ड आर्ट म्हणजेच वाळूची शिल्पे. ओदिशामधील सुदर्शन पटनायक या कलाकारामुळे हा प्रकार सगळ्या जगभर ओळखला जाऊ  लागला. सुदर्शन पटनायक यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवले आहे. जगन्नाथ पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर वेगवेगळ्या विषयांवर वाळूची शिल्पे करणे यात सुदर्शन पटनायक यांचा हातखंडा आहे. सामाजिक, राजकीय किंवा जागतिक पातळीवर एखादी महत्त्वाची घटना घडली की त्या घटनेवर आधारित अत्यंत देखणे असे वाळूशिल्प सुदर्शन पटनायक तयार करतात. या कला प्रकाराला उत्तेजना मिळावी म्हणून ओदिशा सरकारतर्फे आता दरवर्षी सॅण्ड आर्ट फेस्टिव्हल साजरा केला जातो. हा महोत्सव म्हणजे वाळुशिल्पे करणाऱ्या कलाकारांसाठी एक पर्वणीच असते. भारताच्या विविध प्रांतांतून आलेले कलाकार इथे आपली कला सादर करतात. समुद्रकिनाऱ्यावर एकाशेजारी एक सलग अशी वेगवेगळ्या कलाकारांची वाळुशिल्पे पाहायला मिळतात.

पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात रोज एक संकल्पना घेऊन वाळूचे शिल्प करायचे असते. गेल्या वर्षी भुवनेश्वरमध्ये विश्वचषक हॉकीचे सामने खेळले गेले. त्यामुळे तिथे वारसा, महिला सक्षमीकरण, प्लास्टिकचा भस्मासुर यासोबत हॉकी हीसुद्धा संकल्पना ठेवलेली होती. प्रत्येक कलाकाराने या संकल्पनेनुसार शिल्प करायचे असते. त्यांना त्यासाठी पाच तासांचा वेळ दिला जातो. वाळुशिल्पे करताना ती भुसभुशीत होऊ नयेत म्हणून अधूनमधून त्यावर पाणी शिंपडले जाते. त्यासाठी अनेक स्वयंसेवक कलाकारांना मदत करत असतात. पर्यटकांनासुद्धा वाळुशिल्पे कशी तयार केली जातात याचे प्रात्यक्षिक तिथे पाहता येते.

कोणार्क इथला नृत्य महोत्सवसुद्धा याच पाच दिवसांत भरवला जातो. नृत्य महोत्सव आणि त्याचबरोबर होणारा हा सॅण्ड आर्ट फेस्टिव्हल या दोन्ही उत्सवांची जगभरात नोंद घेतली जाते. भारतीयांसोबतच परदेशी पर्यटकसुद्धा या काळात इथे आवर्जून उपस्थित राहतात. नृत्य महोत्सव बघायला आलेल्या रसिकांना तिथून दोनच किलोमीटरवर असलेला सॅण्ड आर्ट फेस्टिव्हलसुद्धा बघता येतो. दुपारपासून वाळुशिल्पे करण्याचे काम सुरू होते आणि ते जवळजवळ सूर्यास्तापर्यंत पूर्ण होते. या कलाकारांची कला मनसोक्त अनुभवून आपण तिथेच २ किलोमीटरवर असलेल्या डान्स फेस्टिव्हलला जाऊ  शकतो, नव्हे जायचेच असते. हे दोन्ही उत्सव हाच तर ओदिशाच्या कलेचा मोठा खजिना आहे. नृत्य महोत्सव हा संध्याकाळी ६ वाजता सुरू होतो. कोणार्कच्या सूर्यमंदिराच्या पाश्र्वभूमीवर हा महोत्सव होतो. मोठय़ा हिरवळीवर रंगमंच उभारलेला असतो आणि त्याच्यासमोर स्टेडियमसारखी बसण्याची व्यवस्था केलेली असते. देशभरातून कलाकार या उत्सवात आपली नृत्यकला सादर करण्यासाठी येतात. शिवाय खास ओडिसी नृत्याचा कार्यक्रम तर ठरलेला असतोच. या कार्यक्रमासाठी तिकीट आहे. ही तिकिटे अनेक हॉटेल्समध्येही मिळतात, नाही तर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपलब्ध असतातच. संपूर्ण अंधार आणि दिव्यांच्या रचनेमुळे उजळत जाणारे सूर्यमंदिर आणि त्याच्यासमोर होत असलेला हा नृत्य महोत्सव पाहून डोळ्याचे पारणे फिटते. ड्रोनद्वारे त्याचे होणारे चित्रीकरण आणि बाजूलाच असलेल्या दोन मोठय़ा पडद्यांवरची दृश्ये संस्मरणीय असतात.

सॅण्ड आर्ट म्हणजे वाळू शिल्पकला हळूहळू भारताच्या विविध प्रांतांत प्रसिद्ध होऊ  लागली आहे. दरवर्षी इथल्या उत्सवामध्ये गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ इथल्या कलाकारांचा सहभाग असतो. त्याचसोबत श्रीलंका, जपान, इटली, जर्मनी, स्पेन, नॉर्वे या देशांतील कलाकारसुद्धा इथे हजेरी लावतात आणि आपली वाळू शिल्पकला सादर करतात. आपल्याकडे कोकण पर्यटनात वेंगुर्ला, देवगड, विजयदुर्ग, कुणकेश्वर इथल्या समुद्रकिनाऱ्यावरसुद्धा वाळुशिल्पे साकारली जाऊ  शकतात. मात्र आपल्याकडे सर्व थरांत असलेली कमालीची उदासीनता याच्या मुळावर आलेली दिसते.

समुद्रावर वाळूत किल्ला करणे किंवा घर बांधणे हा प्रत्येकाचा अगदी आवडीचा खेळ असतो. कधी ना कधी आपण हा सुंदर खेळ वाळूत खेळलेला असेलही; पण याच खेळाचे शास्त्रोक्त आणि भव्य स्वरूप आपल्याला ओदिशा इथे या सँड आर्ट फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळते. वाळुशिल्प ही कला त्यानिमित्ताने जागतिक पातळीवर गेलेली दिसते. ओदिशा सरकारच्या या उपक्रमामुळे कलाकारांना प्रोत्साहन आणि उत्तेजन दिले जाते. त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.

कोणार्कच्या चंद्रभागा बीचवर एका सलग रांगेत उभी असलेली ही वाळुशिल्पे पाहताना तिथून पाय हलत नाहीत. प्रत्येक वाळुशिल्पावर रंगीत छत्रीचे आच्छादन असते. समोर समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा, त्यावर डोलणाऱ्या नौका आणि त्या पार्श्वभूमीवर वाळूत साकारलेली अत्यंत देखणी शिल्पे.. सगळा परिसर कलेच्या या अलौकिक आविष्काराने भारावलेला असतो. निसर्गाने आधीच नटलेल्या ओदिशाचे सौंदर्य, या उत्सवांमुळे आणि तो पाहायला आलेल्या पर्यटकांमुळे अधिकच खुलून दिसते.

ashutosh.treks@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2019 5:15 am

Web Title: festival in odisha akp 94
Next Stories
1 कोरबाचिक
2 गच्चीवरील वेलभाजीसाठी
3 घरगुती बिस्कीट
Just Now!
X