दिवाळीनंतर येणाऱ्या कार्तिकी पौर्णिमेला अनेक ठिकाणी वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात. राजस्थानातील पुष्कर तलावाकाठी याच वेळी पुष्कर यात्रेचे आयोजन केले जाते. पुष्करच्या काठावरील ब्रह्मदेवाचे देऊळ हे या यात्रेचे केंद्रस्थान, मात्र या यात्रेचे खरे प्रयोजन हे जनावरांच्या सर्वात मोठय़ा बाजारात आहे.

पुष्कर यात्रा ही जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेच्या आधी सात दिवस हा बाजार सुरू असतो. पौर्णिमेच्या आधीपासूनच राजस्थानातील अनेक ठिकाणांहून उंट आणि घोडय़ांचे तांडे पुष्करच्या बाहेर जमा होतात. नजर जाईल तेथपर्यंत वाळूमध्ये ठोकलेले तंबू आणि उंट दिसतात. ऐन उत्सव काळात पौर्णिमेला तर तलावाकाठी भाविकांची गर्दी, पारंपरिक वस्तू आणि कला सादर करण्याची ठिकाणे आणि जनावरांचा बाजार असा माहोल असतो.

या वर्षी हा उत्सव २२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या काळात राजस्थान पर्यटन विकास महामंडळातर्फे अनेक कार्यक्रम सादर केले जातात. तर स्थानिक पातळीवर सर्वाधिक लांब मिशी, मटकाफोड स्पर्धादेखील होतात.