‘फेस्टिव्हल सीझन’च्या निमित्ताने ऑनलाइन बाजारात सध्या सवलतींचा वर्षांव होत आहे. कुठे निम्म्या किमतीत वस्तू तर कुठे खरेदीइतक्या मूल्याचे ‘कॅशबॅक’, कुठे एका वस्तूवर दुसरी वस्तू मोफत तर कुठे अगदी ९० टक्क्यांपर्यंत सवलत अशा ऑफर्सनी ग्राहकांच्या तोंडाला पाणी सुटले नाही तर नवलच. स्वस्ताईच्या या महोत्सवात प्रत्येकालाच आपले हात धुऊन घ्यावेसे वाटतात. मात्र हे करताना सावधगिरी बाळगली नाही तर हात पोळण्याचाही धोका असतो.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ऑनलाइन बाजारपेठेत सध्या खरेदीचे महोत्सव भरवले जात आहेत. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट या आघाडीच्या ईकॉमर्स संकेतस्थळांसह सर्वच छोटय़ा मोठय़ा संकेतस्थळांवर आकर्षक सवलतीत वस्तू उपलब्ध करून दिल्या जात आहेत. दुसरीकडे, प्रत्यक्ष बाजारपेठेतही मोठमोठी रिटेल व साखळी दुकाने ग्राहकांसाठी सवलतींच्या पायघडय़ा अंथरताना दिसत आहेत. आपल्याला हवी ती वस्तू खरेदी करण्यासाठी हा अतिशय योग्य हंगाम आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने हा खरेदी व्यवहार ग्राहकांच्या पथ्यावर पडणारा आहे. मात्र तरीही अशी खरेदी करताना संभाव्य धोके लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यासोबतच खरेदी करताना काही गोष्टी विचारात घेणे अत्यावश्यक आहे. अशाच धोक्यांबाबत आणि त्यादृष्टीने घ्यावयाच्या खबरदारीबाबत आपण जाणून घेणार आहोत.

  • अनावश्यक खरेदी : भव्य सवलत, पैसे परतावा (कॅशबॅक), डिस्काऊंट सेल, लिमिटेड पीरियड ऑफर, ‘लास्ट डे’ हे शब्द आपल्याला प्रत्येक ईकॉमर्स संकेतस्थळावर जवळपास प्रत्येक वस्तूच्या खाली दिसतात. ग्राहकांना अशा शब्दांचा मोह आवरत नाही. बऱ्याचदा आपण अशा सवलतींच्या मोहात अडकून आपल्याला आवश्यक नसलेल्या वस्तूची खरेदी करतो. हा एकप्रकारचा तोटाच आहे.
  • घाईचे काम..’ : एखाद्या ईकॉमर्स संकेतस्थळावर निम्म्या किमतीत वस्तू उपलब्ध असल्याचे पाहून आपण लगेच तिच्या खरेदीसाठी तुटून पडतो. संबंधित वस्तूची अन्य संकेतस्थळांवर किंवा बाजारात काय किंमत आहे, हे जाणून घेण्याची तसदीही आपण घेत नाही. मागाहून अन्य ठिकाणी ती वस्तू आणखी स्वस्त दरात उपलब्ध असल्याचे पाहून आपल्याला पश्चाताप होतो. अनेकदा अशा खरेदी हंगामातील ऑफर गमावल्याबद्दलही आपल्याला हळहळ वाटते. पण इतके वाईट वाटण्यासारखे काहीच नाही. दिवाळीतील सवलती गमावल्या तर नवीन वर्षांच्या स्वागताच्या सवलती तुमची वाट पाहाताहेत, हे लक्षात ठेवा. ईकॉमर्स संकेतस्थळांवर वर्षभरात अनेक वेळा असे ‘सेल’ आणि ‘फेस्टिव्हल’ सुरू असतात. त्यामुळे खरेदीची घाई करू नका.
  • फुकट ते पौष्टिकनव्हे : एका वस्तूच्या खरेदीवर दुसरी वस्तू मोफत मिळत आहे, हे समजताच ग्राहकांच्या खरेदीवर उडय़ा पडतात. मात्र बहुतेकदा त्या मोफत वस्तूचा आपल्याला काहीच फायदा नसतो. पण केवळ ती वस्तू मोफत मिळतेय, या आमिषाने आपण मूळ वस्तू खरेदी करतो. हे करणे टाळले पाहिजे.
  • छुपे शुल्क : हे स्पष्ट करण्यासाठी विमान कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या तिकिटांच्या जाहिरातींचे उदाहरण पुरेसे आहे. ‘मुंबई ते दिल्ली प्रवास ५०० रुपयांत’ अशी जाहिरात वाचून प्रवासी एकदम आनंदाने बुकिंगसाठी घाई करतात. पण प्रत्यक्षात जेव्हा तिकिटाची किंमत समोर दिसते तेव्हा त्यांचा भ्रमनिरास होतो. कारण जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे तिकिटाचे दर ५०० रुपये असले तरी त्यावर नाना तऱ्हेचे शुल्क आकारून तिकिटाची एकूण किंमत ही सर्वसाधारण तिकीट दराएवढी केली जाते. असाच प्रकार ईकॉमर्स संकेतस्थळांच्या बाबतीत घडतो. एखाद्या वस्तूची जाहिरातीतील किंमत कमी असली तरी, प्रत्यक्ष किंमत त्याहून जास्त असू शकते. तेव्हा आंधळेपणाने कोणत्याही जाहिरातीवर विश्वास न ठेवता निर्णय घेणे आवश्यक आहे. अनेकदा ‘९० टक्क्यांपर्यंत सवलत’ अशा जाहिरातीही केल्या जातात. यातील ‘पर्यंत’ हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. असा ‘शब्दभ्रम’ निर्माण करून कंपन्या ठरावीक वस्तू ९० टक्के सवलतीत विकतात आणि त्या श्रेणीतील अन्य वस्तू मात्र मूळ किमतीतच खरेदी कराव्या लागतात.

खरेदी महोत्सवांचा लाभ कसा घ्याल?

  • वरील धोके लक्षात ठेवून केलेली खरेदी फायदेशीर ठरू शकते. सवलतींचा वर्षांव करणारे हे ऑनलाइन हंगाम फसवेच असतात, असे नाही. डोळसपणे खरेदी केल्यास ग्राहकाला त्या खरेदीतून खूप बचत करता येऊ शकते. हे करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा.
  • केवळ एकाच ठिकाणी दिलेल्या सवलतीच्या मोहात पडून खरेदी करू नका. संबंधित वस्तू अन्यत्र किती किमतीत उपलब्ध आहे, हे तपासून पाहा. त्याची मूळ किंमत आणि सवलतीची किंमत यातील फरक किती आहे, हेदेखील पडताळून पाहा.
  • ईकॉमर्स संकेतस्थळांवरून अनेक विक्रेते आपल्या मालाची विक्री करत असतात. यातील काही विक्रेत्यांबाबत ग्राहकांचे पूर्वानुभव वाईट असू शकतात. मालाचा दर्जा, डिलिव्हरी, विक्रीपश्चात सेवा याबाबतीत तक्रारी असू शकतात. तेव्हा खरेदी करताना संबंधित विक्रेत्याबाबत अन्य ग्राहकांच्या प्रतिक्रिया नक्की पाहा.
  • ‘ऑनलाइन’ खरेदी करताना शक्यतो ब्रॅण्डेड वस्तूच खरेदी करा. ज्या ब्रॅण्डबाबत पुरेशी माहिती नसेल त्या ब्रॅण्डच्या वस्तूंचा दर्जा खराब असू शकतो. त्यामुळे अशा वस्तू, कितीही स्वस्त असल्या तरी टाळा.