‘जीप’ हा वाहन जगतातील सर्वाधिक ओळख असणाऱ्या ब्रॅण्डपैकी एक आहे. तिचे चाहते जगभर पसरले आहेत. ‘जीप’चा भारतातील पुनप्र्रवेश म्हणावा तितका चांगला नव्हता. भारतामध्ये रुपयाची किंमत घसरल्याने फियाट-क्रिसलरने (एफसीए) महत्त्वाचे ब्रॅण्ड बाजारात उतरवण्याचे थांबवले होते. रुपयाची किंमत कमी झाल्यामुळे जीपच्या वाहन उत्पादनाची किंमत वाढली होती. मात्र त्यानंतरही जीपने भारतीय वाहन क्षेत्रात धडाक्याने पावले टाकत पूर्ण विदेशी बनावट असलेल्या ग्रॅण्ड चिरोकी आणि रँग्लर या गाडय़ा भारतात दाखल केल्या. त्याची किंमत अधिक असल्याने वाहनप्रेमींचा त्याला कमी प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मात्र सध्या स्थिती अतिशय वेगळी आहे. जीपचे देशात मोठय़ा प्रमाणात वितरक असून, त्यासाठी कम्पासची भूमिका मोठी आहे. कंपनीसाठी हे लहान एसयूव्ही मॉडेल असेलही, मात्र या मॉडेलने आपल्या विक्रीची क्षमता दाखवून दिली आहे. या मॉडेलला बाजारात सादर होऊन चार महिने होत नाहीत तोवरच १२ हजारपेक्षा अधिक बुकिंग तिने मिळवली आहेत. फियाट-क्रिसलरचे भारतातील हे सर्वात यशस्वी मॉडेल म्हटले तरी यामध्ये वावगे ठरणार नाही.

रचना

जीप कम्पासची अंतर्गत आणि बाह्य़ रचना अतिशय आकर्षक आहे. कम्पासच्या केबिनची रचना मनाला सुखद धक्का देणारी आहे. तिची लांबी सरासरी ह्य़ुंदाई क्रेटा अथवा टक्सन इतकी आहे. सात क्रोमापासून तयार करण्यात आलेली स्लॉटची ग्रिल इतर स्पर्धकांच्या तुलनेत वेगळी वाटते. शार्प जेनन हेडलाइट्समुळे ती चिरोकीसारखी भासते. क्रोम एडिशनमुळे गाडीला प्रीमियम लुक प्राप्त होतो. गाडीपुढे असलेल्या हेडलाइट्समुळे ती अतिशय सुंदर दिसते. अतिशय पातळ बोनेट आणि लांबीला मोठी केबिन तसेच चाके मोठी आहेत. कम्पासची ७० टक्के बॉडी ही स्टीलपासून बनवण्यात आली असल्याने ती अतिशय दणकट आहे.

अंतर्गत रचना

कम्पासच्या केबिनमधील आसनांना आवश्यक ती उंची देण्यात आली आहे. मात्र खिडकीच्या चौकटीचा आडवा भाग जरा रुंद असल्याने प्रवासामध्ये थोडा त्रास जाणवतो. तुम्ही प्रथम डॅशबोर्डवरून गाडीला नावे ठेवण्याची शक्यता आहे. मात्र गाडीमधील अधिक मोकळी जागा तुम्हाला वेगळाच आनंद प्राप्त करून देईल. आसनांवर अतिशय मऊदार कापड वापरण्यात आल्याने आपल्याला प्रवासाचा उच्चतम अनुभव घेता येतो. पुढील आसने रुंदीला थोडी अधिक आहेत. त्यामुळे अधिक आरामशीर बसता येते. तसेच चालकालाही यामुळे वाहन चालवण्याची वेगळीच अनुभूती येते. कम्पासमध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकही देण्यात आले आहेत. गाडीच्या मागील सीटवर जागा असली तरी ती पुरेशी वाटत नाही. मागील आसनांसाठी एअर व्हेन्ट, यूएसबी देण्यात आली आहे. ०.५ लिटरचे बॉटल होल्डर, कप होल्डर देण्यात आले आहेत. कम्पासमध्ये सामान ठेवण्यासाठी ४३८ लिटर बूट स्पेस देण्यात आली असून, दोन मोठय़ा बॅग ठेवण्यासाठी ही जागा पुरेशी आहे. जर तुम्ही मागील आसने दुमडून ठेवली तर यामुळे आणखी जागा उपलब्ध होऊ शकते.

चालवण्याचा अनुभव

मुंबई-पुणे हायवे, शहरातील प्रचंड वाहतुकीमध्ये तसेच खडबडीत रस्त्यावर पेट्रोल कम्पासची टेस्ट ड्राइव्ह घेण्यात आली. या तीनही ठिकाणी कम्पास आपली क्षमता पूर्णपणे सिद्ध करते. सुरक्षा, वेग यासह इतर सर्व मानकांवर ती पूर्णपणे उतरते. ज्या वेळी ती १३० किमी प्रति तास या वेगात चालते त्या वेळीही ती अतिशय स्थिर वाटते. स्टीअरिंग हलके असल्याने हाताळण्यास सुलभ जाते. खडबडीत रस्त्यावर कम्पास चालवताना गाडीचे इंजिन अतिशय दमदारपणे काम करते. या वेळी आतमध्ये बसलेल्यांना कोणताही त्रास होत नाही. गाडीची ब्रेकिंग प्रणालीही उत्तम असल्याचे दिसून येते.

इंजिनची कामगिरी

कम्पास तुम्हाला इंजिनचे दोन पर्याय समोर ठेवते. यात १.४ लिटर मल्टी एअर टबरे पेट्रोल आणि २.० लिटर मल्टिजेट दोन टबरे डिझेल इंजिनचा पर्याय उपलब्ध होतो. यामुळे गाडीला वेग घेण्यास मदत होते. १.४ लिटर पेट्रोल इंजिन १६० बीएचपी ऊर्जा तयार करते. त्याचा टॉर्क २५० एनएम आहे. याच्यासह ७ स्पीड डय़ुअल क्लच असणारी ऑटोमॅटिक कम्पासही दमदार कामगिरी करते. शून्य ते १०० किमी प्रति तासाचा वेग ती १०.२९ सेकंदांमध्ये घेते. वेग कमी घेत असल्याने कार ओव्हरटेक करताना समस्या निर्माण होऊ शकते. या ठिकाणी अनेकांची निराशा होऊ शकते. ज्या वेळी गाडी वेग घेते त्या वेळीही इंजिन आवाज न करता आपली योग्य भूमिका पार पाडते.

सुरक्षा

कम्पासमध्ये सुरक्षिततेसाठी ५० पेक्षा अधिक वैशिष्टय़ांचा समावेश करण्यात आला आहे.

आमचे मत

जीप कम्पासबाबत खूप मोठय़ा अपेक्षा होत्या आणि त्या पूर्ण करण्यात कम्पासला यश आले आहे. अखेरीस ती परिपूर्ण म्हणता येणार नाही. यामध्ये काही वैशिष्टय़ांचा समावेश नाही. मात्र वाढत्या प्रतिसादामुळे ती सर्वाधिक पुरस्कार विजेती एसयूव्ही ठरली आहे. चढ-सपाटी असो, खाचखळगे असोत किंवा नदीनाले तुडवीत जाणारी वाट असो, दणकट, दमदार रूप असलेल्या तरीही चित्तग्राही ठरलेल्या जीप या ब्रॅण्डला कम्पासमुळे नवीन ओळख मिळेल, यात शंका नाही.

chandrakantdadas@gmail.com