|| ऑफ द फिल्ड: ऋषिकेश बामणे

इटलीच्या ला स्काला ओपेरा हाऊस येथे प्रतिष्ठित ‘फिफा’ फुटबॉल पुरस्कार सोहळा मंगळवारी थाटात पार पडला. या सोहळ्यातीलपुरस्कार विजेत्यांबरोबरच अन्य रंजक घडामोडींविषयी समाज माध्यमांवर रंगलेल्या चर्चेचा घेतलेला हा आढावा.

सलाहला वगळल्याने फुटबॉलप्रेमी नाराज

इजिप्तच्या मोहम्मद सलाहने यंदाच्या हंगामात लिव्हरपूलसाठी सर्वाधिक २२ गोल करून संघाला १४ वर्षांनंतर चॅम्पियन्स लीगच्या जेतेपदावर मोहोर उमटवण्यात सर्वाधिक योगदान दिले. परंतु ‘फिफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम ११ खेळाडूंच्या संघातून सलाहला वगळल्यामुळे क्रीडा चाहत्यांनी ट्विटरवर संताप व्यक्त केला. मेसी, रोनाल्डो, किलियान एम्बापे, लुका मॉड्रिच या सर्वाचा त्या संघात समावेश आहे. मात्र सलाहला डावलल्यामुळे काहींनी ‘फिफा’ खेळाडूंमध्ये भेदभाव करते, त्यांना फक्त नामांकित खेळाडूंचीच कामगिरी दिसते, अशा आशयाचे ट्वीट केले. मुख्य म्हणजे सलाहला सवरेत्कृष्ट खेळाडूच्या शर्यतीत चौथे स्थान मिळाले, परंतु सर्वोत्तम ११ खेळाडूंतून त्याला कसे काय वगळण्यात आले, असा प्रश्नही चाहत्यांनी ‘फिफा’ला केला.

मेसी, रॅपिनो सर्वोत्तम

आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्जेटिनाचे प्रतिनिधित्व करणारा बार्सिलोनाचा मातब्बर फुटबॉलपटू लिओनेल मेसीला यंदा वर्षांतील सवरेत्कृष्ट पुरुष खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. मेसीने लिव्हरपूलच्या व्हॅन डिच व युव्हेंटसमधील कट्टर प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डोला मागे टाकून कारकीर्दीत पहिल्यांदाच या पुरस्कारावर नाव कोरले. महिलांमध्ये अमेरिकेला यंदाचा विश्वचषक जिंकवून देणारी मेगान रॅपिनो सर्वोत्तम ठरली. प्रशिक्षकांमध्ये चॅम्पियन्स लीग विजेत्या लिव्हरपूलचे मार्गदर्शक जर्गेन क्लोप, तर जगज्जेत्या अमेरिकेच्या प्रशिक्षिका जिल एलिस यांनी अनुक्रमे पुरुष व महिला विभागात सवरेत्कृष्ट प्रशिक्षकाचा बहुमान मिळवला.

मेसी-रोनाल्डोमधील स्पर्धा येथेही कायम

मेसी आणि रोनाल्डो यांच्यात सर्वश्रेष्ठ कोण, याची चर्चा नेहमीच सुरू असते. त्यातच जगभरातील विविध क्रीडा संकेतस्थळांनी बुधवारी एक धक्कादायक खुलासा केल्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी गेल्या सहा वर्षांपासून कोणत्या खेळाडूने कोणाला सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी स्वत:चे मत दिले, याचा आढावा चाहत्यांपुढे सादर केला. यामध्ये तीन बॅलोन डी ओर, तर ‘फिफा’च्या पुरस्कारांचा तपशील होता. परंतु रोनाल्डोने मात्र आतापर्यंत एकदाही मेसीला सवरेत्कृष्ट खेळाडूसाठी पहिल्या तीन खेळाडूंमध्येही नामांकन दिलेले नाही. त्याउलट मेसीने मात्र गेली दोन वर्षे रोनाल्डोला स्वत:च्या प्राधान्यक्रमात अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान देऊन पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली. मेसीला पुरस्कार स्वीकारताना ईर्षां लपवता येणार नाही, म्हणूनच रोनाल्डो या पुरस्कार सोहळ्यालाही उपस्थित राहिला नसावा, अशा प्रकारेही काही चाहत्यांनी रोनाल्डोची खिल्ली उडवली.

म्हणूनच दोघांमध्ये वैर?

दोन आठवडय़ांपूर्वी झालेल्या चॅम्पियन्स लीगच्या नव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्याच्या कार्यक्रमासाठी मेसी व रोनाल्डो दोघेही उपस्थित होते. त्यावेळी रोनाल्डोने गेल्या १५ वर्षांच्या कारकीर्दीत मी आजवर एकदाही मेसीसोबत जेवणाचा आस्वाद घेतलेला नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तर मेसीनेही कधी असा योगच जुळून आला नाही, असे सांगून विषय संपवला.