भार्गवी चिरमुले, अभिनेत्री

आयुष्यातील निर्थक गोष्ट काय असेल तर ती ताण आहे. कारण देवाने इतके सुंदर आयुष्य निर्माण केले आहे की, त्याची तुलना कोणत्याच गोष्टीशी होऊ शकत नाही. मी माझा ताण हा गाणे ऐकून, योग करून दूर करते. योग म्हणजे फक्त ध्यान नाही तर योगमध्ये अनेक प्रकार आहेत जे तुमची आत्मशक्ती वाढवतात. ताण दूर करण्यासाठी मी प्रवासात वगैरे असले की लता मंगेशकर यांचे गाणे ऐकते. कारण लताजींचा आवाज मला पुन्हा ताजेतवाने करतो. कार्यक्रमासाठी निरनिराळे दौरे होतात. या दौऱ्यात अनेकदा नवीन ठिकाणे असल्यामुळे वातावरणात फरक पडतो. एकंदरीत शरीरावर त्याचा परिणाम होतो. परंतु मला कार्यक्रमासाठी फिरतीवर असताना तब्येतीची काही तक्रार जाणवली तर मी त्याकडे दुर्लक्ष करते. नृत्य करायला मला आवडते. मी माझे मन नृत्यात रमवते. कारण नृत्य हा माझा श्वास आहे. तुम्ही तुमचे आवडते काम केले की आपोआप तुमचा ताण हा हलका होतो.

मी अनेकदा ताण दूर करण्यासाठी पुस्तके वाचते. कोणत्या एकाच प्रकारातील पुस्तके मी वाचत नाही तर जे हाती येईल ते मी वाचते. कधी कधी कोणत्या कामाने अधिक थकवा आला असेल तर मी पु.ल. देशपांडे यांच्या व्याख्यानांची, अभिनयांची ध्वनिफीत ऐकते. त्यामुळे मनाला खूप समाधान मिळते. मी कधी कधी जास्तच तणावात असले की माझ्या भाचीसोबत बोलते. कारण तिच्यासोबत माझी चांगली गट्टी आहे. माझ्या मते कधी कधी आपला ताण दूर करण्यासाठी आपण इतर भलत्याच गोष्टींकडे वळतो. पण प्रामुख्याने पाहायचे झाले तर आनंद हा दुसरीकडे कुठे नसून तो स्वत:मध्येच आहे.